News Flash

महिला सक्षमीकरणाचा ध्यास व अभ्यास

ऐतिहासिक कल्याण शहरात सातत्याने कार्यरत असणाऱ्या संस्थांपैकी एक म्हणजे कल्याण महिला मंडळ.

 

कल्याण महिला मंडळ, कल्याण 

ऐतिहासिक कल्याण शहरात सातत्याने कार्यरत असणाऱ्या संस्थांपैकी एक म्हणजे कल्याण महिला मंडळ. गेली आठ दशके विविध उपक्रमांद्वारे महिला सक्षमीकरण साधण्याचा प्रयत्न करणाऱ्या या संस्थेचा पितृपंधरवडय़ातील अभ्यासवर्ग वैशिष्टय़पूर्ण असतो. ‘चूल आणि मूल’ या चाकोरीत अडकून न पडता महिलांनी समाजात आत्मविश्वासाने वावरावे, म्हणून स्थापन झालेल्या या संस्थेची उपयुक्तता अद्याप कायम आहे..

ऐतिहासिक कल्याण शहराचा आधुनिक इतिहासही तितकाच गौरवास्पद आहे. प्राचीन बंदर असल्याने या शहरातून देशविदेशात व्यापार सुरू होता. आता कल्याणच्या बंदरातून मालवाहतूक होत नसली तरी कल्याण हे देशातील महत्त्वाचे जंक्शन रेल्वे स्थानक आहे. त्याद्वारे देशभरात प्रवासी आणि मालवाहतूक होत असते. स्वातंत्र्यपूर्व काळापासून कल्याण शहरात विविध संस्था निर्माण झाल्या. त्यातील अनेक शंभर वर्षांहून अधिक काळ कार्यरत आहेत. काही शताब्दीच्या उंबरठय़ावर आहेत. अशाच जुन्या आणि सातत्याने कार्यरत असणाऱ्या संस्थांपैकी एक म्हणजे- कल्याण महिला मंडळ.

१९३४ मध्ये कल्याणमधील सुविद्य कुटुंबातील सरस्वतीबाई फडके, गंगाबाई वैद्य आणि बनुताई देशपांडे यांनी एकत्र येऊन या संस्थेची स्थापना केली. त्याला यंदा ८१ वर्षे पूर्ण होत आहेत. महिलांनी ‘चूल आणि मूल’ या चौकटीपुरते मर्यादित राहू नये. संघटित होऊन विधायक उपक्रम राबवावेत. सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत राहावे, हा संस्था स्थापन करण्यामागचा हेतू होता. आता आठ दशकांनंतरही मंडळाची उपयुक्तता कायम असून कल्याणमधील महिलांची चौथी पिढी आता संस्थेत कार्यरत आहे.

या महिला मंडळाचे वैशिष्टय़ म्हणजे त्याची स्थापना माजघरात झाली असली तरी ती माजघरापुरती मर्यादित राहिली नाही. अल्पावधीतच कल्याण शहरातील सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनात या संस्थेने महत्त्वाचे स्थान मिळविले. १९५० मध्ये सध्याच्या अत्रे रंगमंदिराशेजारी संस्थेची वास्तू उभी राहिली. या वास्तूने मंडळातील सभासदांना एक महत्त्वाचे व्यासपीठ मिळवून दिले. श्रावणात मंगळागौरीचे खेळ, दरवर्षी दिवाळीत एखाद्या अनाथालयात फराळ तसेच जीवनोपयोगी वस्तूंचे वाटप, अथर्वशीर्ष पठण, कुमारिका पूजन, कुंकुमार्चन सोहळा आदी उपक्रम मंडळाच्या वतीने राबविले जातात. यंदा ८१व्या वर्षांत पदार्पण केल्यानिमित्त मंडळाने वर्षभर विशेष उपक्रम राबविले.

अभ्यासवर्ग/व्याख्यानमाला

त्या काळात शिक्षण आणि प्रसार माध्यमांचा प्रभाव आताच्या तुलनेत अतिशय मर्यादित होता. देशात, राज्यात नेमके काय सुरू आहे, याची स्थानिकांना नीटशी माहिती नसायची. त्यांना ते भान यावे या उद्देशाने १९४४ पासून मंडळात दरवर्षी पितृपंधरवडय़ात महिलांसाठी अभ्यासवर्ग घेण्यास सुरुवात केली. पितृपंधरवडा अशासाठी की या काळात तुलनेने महिलांना घरात कमी काम असते. थोडी उसंत असते. दरवर्षी विविध विषयातील तज्ज्ञांची व्याख्याने या अभ्यासवर्गात होतात. व्याख्यानमालेची अखेर गाण्यांच्या मैफलीने होते. माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, ज्येष्ठ समाजवादी नेते मृणाल गोरे, ताराबाई वर्तक आदी अनेकांनी या व्याख्यानमालेच्या निमित्ताने कल्याणमध्ये व्यासपीठ गाजविले आहे. अभ्यासवर्गाच्या नावाने सुरू असलेला हा व्याख्यानमालेचा उपक्रम अजूनही दरवर्षी मोठय़ा प्रतिसादात सुरू आहे. यंदा ५ ते १० ऑक्टोबरदरम्यान व्याख्यानमाला होणार आहे. त्यात शरद पोंक्षे (सावरकर विचार दर्शन), धनश्री लेले (नामदेवांची अमृतवाणी), प्रा. डॉ. वैदेही दप्तरदार (विचार स्वामी विवेकानंदांचा- संदर्भ आजचा), प्रसाद चाफेकर (आचार्य प्र. के. अत्रे यांच्या विनोदी आणि भावनाप्रधान नाटकांचा गोष्ट- प्रसाद चाफेकर), विद्या पडवळ (स्वभावाची ऐशी तैशी) तसेच रेणू दांडेकर आणि डॉ. राजा दांडेकर यांची प्रकट मुलाखत आयोजित करण्यात आली आहे. या अभ्यासवर्गाचा समारोप नेहमीप्रमाणे यंदाही रविवारी ११ ऑक्टोबर रोजी आचार्य अत्रे नाटय़गृहात ‘सुहाने पल, सुहाने नग्मे’ या मैफलीने होणार आहे.

प्रशिक्षण, स्वयंरोजगार 

त्या काळात शिवणकला हे महिलांच्या रोजगाराचे प्रमुख साधन होते. त्यामुळे मंडळाने पुढाकार घेऊन शिवणकला प्रशिक्षण सुरू केले. या केंद्रात प्रशिक्षण घेऊन अनेक महिला अर्थार्जन करू लागल्या. सलग ५५ वर्षे मंडळात शिवणकला वर्ग सुरू होते. मंडळातील गरीब, गरजू महिलांना रोजगार मिळावा या हेतूने महिला मंडळाने महिला सहकारी उद्योग मंदिराची स्थापना केली. त्यामार्फत दिवाळी फराळ तसेच तत्सम उद्योग सुरू असतात.

क्रीडा केंद्र

इमारतीमुळे मंडळाला विविध उपक्रम राबविता येणे शक्य झाले आहे. त्यातलाच एक म्हणजे क्रीडा केंद्र. गेल्या चार दशकांहून अधिक काळ वास्तूत बॅडमिंटन, टेबल टेनिस हे क्रीडा प्रकार उपलब्ध करून दिले आहेत. खेळांची आवड असणाऱ्या पुरुष आणि महिला माफक शुल्क भरून या सुविधेचा लाभ घेतात. सकाळी सहा ते अकरा आणि संध्याकाळी पाच ते रात्री अकरा या वेळेत क्रीडा केंद्र सुरू असते. सध्या ५०हून अधिक जण या क्रीडा केंद्राचा लाभ घेत असल्याची माहिती क्रीडा समितीप्रमुख अनुजा पिंपळखरे यांनी दिली. आतापर्यंत हौस आणि व्यायाम यापुरताच केंद्राचा उपयोग केला जात आहे. मात्र भविष्यात सांघिक खेळांच्या स्पर्धेत मंडळ भाग घेईल, असेही त्यांनी सांगितले.

आता काळानुरूप बदल

गेली आठ दशके कार्यरत असलेल्या या संस्थेची उपयुक्तता अजूनही कायम असली तरी काळानुरूप उपक्रमात बदल केले जाणार असल्याचा मनोदय विद्यमान कार्यकारिणीने जाहीर केला आहे. मेधा आघारकर मंडळाच्या विद्यमान अध्यक्षा आहेत. वंदना पेंडसे, नेत्रा ओक, राजश्री नाईक, रजनी कोल्हटकर हे कार्यकारिणी मंडळ सध्या नव्या उपक्रमांची आखणी करीत आहेत. सध्या मंडळात आजीव शंभर तर एकूण १५० सभासद आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 3, 2015 12:29 am

Web Title: womens empowerment obsession and study
Next Stories
1 चॉकलेटमय पदार्थाच्या राज्यात!
2 प्रदूषणामुळे श्वास घुसमटला!
3 भाजपमध्ये यावे, पावन व्हावे!
Just Now!
X