दक्षिण आफ्रिकेतून आयात करण्यात आलेल्या ‘सेवन’ लाकडाच्या बुंध्यातून बनविण्यात आलेली आणि गुजरातमधील नडियाद शहरातील मिस्त्री बंधूंनी साकारलेली गणेशमूर्ती कल्याणातील श्रीमंत बाल मित्र गणेश मंडळाच्या वतीने यंदाच्या वर्षी गणेशभक्तांच्या भेटीला येणार आहे.
कल्याण पश्चिमेतील कासारहाट परिसरात असणाऱ्या श्रीमंत बाल मित्र गणेश मंडळाच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त विविध सजावटीचे आयोजन करण्यात येते. मंडळाचे यंदाचे सुवर्णमहोत्सवी वर्ष असल्याने ‘सेवन’ या लाकडी प्रकारातून श्रींची मूर्ती साकारण्यात आली आहे. यासाठी दक्षिण आफ्रिकेतून ‘सेवन’ लाकडाचा १० बाय ८ फूट आकाराचा लाकडी ओंडका आयात करण्यात आला. गुजरातमधील नडियाद शहरातील पुरणभाई मिस्त्री आणि जीवनभाई मिस्त्री यांनी या लाकडी ओंडक्यातून ७ फूट उंची आणि ५ फूट रुंदी असणारी सुरेख गणेश मूर्ती तयार केली. लाकडातून मूर्ती साकारण्यासाठी मिस्त्री बंधूंना अडीच महिन्यांचा अवधी लागला. श्री गणेशाची मूर्ती लाकडी चौरंगावर साकारण्यात आली आहे. त्यामुळे लाकडी चौरंगापासून ते गणेश मूर्तीपर्यंत सर्वत्र या सेवन लाकडाचा वापर करण्यात आला आहे. संपूर्ण लाकडी गणेशमूर्ती साधारण ४५० किलो वजनाची असून लाकडी चौरंग ८० किलो वजनाचा आहे. गणेशमूर्तीसाठी वापरण्यात आलेल्या लाकडाला गुजराती आणि मराठीमध्ये ‘सेवन’ तर संस्कृतमध्ये ‘श्रीपर्णी’ आणि हिंदीमध्ये ‘खुमार’ या नावाने संबोधले जाते. सेवन लाकूड विशेषत: लाकडी देवघर आणि लाकडाच्या मूर्ती बनविण्यासाठीच वापरण्यात येते. श्रीमंत बाल मित्र गणेश मंडाळाच्या या मूर्तीचे रंगकाम कल्याणातील स्थानिक कारागिरांकडून करण्यात येणार आहे. ऑगस्ट अखेपर्यंत हे काम पूर्ण होईल, असे मंडळाच्या वतीने सांगण्यात आले. लाकडी गणेशमूर्तीला आलिशान राजमहलामध्ये ठेवण्यात येणार आहे.

विविध शहरांमध्ये असणारे बडे नामांकित गणपती हे लाकडापासून बनविण्यात आले आहेत. त्यामुळेच बडय़ा नामांकित गणपतींचा आदर्श समोर ठेवत आपलाही गणपती लाकडापासून बनविलेला असावा, अशी कल्पना आम्हाला सुचली. दिवसेंदिवस निसर्गचक्रामध्ये होणारा बिघाड आणि वाढती महागाई लक्षात घेऊन यंदा साकारण्यात आलेली लाकडी गणेशमूर्ती मंडळ आवारात कायम ठेवण्यात येणार आहे. जेणेकरून गणेशभक्तांना वर्षभर गणेशमूर्तीचे दर्शन घेता येईल आणि मंडळाचा प्राथमिक खर्च वाचविण्यास मदत होईल.
– चारुहास गुप्ते, सदस्य, श्रीमंत बाल मित्र गणेश मंडळ, कल्याण</strong>