ज्येष्ठ खगोल अभ्यासक आणि पंचांगकर्ते दा.कृ. सोमण यांनी लोकमान्य टिळक लिखित ‘गीतारहस्य’ या गीतेतील तत्त्वज्ञानाची चिकित्सा करणाऱ्या ग्रंथावरील व्याख्यानांचे शतक गेल्या आठवडय़ात पूर्ण केले. गेल्या वर्षी चिपळूण येथील ग्रंथालयात १८ ऑक्टोबर रोजी त्यांचे पहिले व्याख्यान झाले. मुंबई, पुणे, कोल्हापूर आदी महाराष्ट्रातील विविध शहरांबरोबरच अमेरिकेतील न्यू जर्सी येथेही ते गीतारहस्यावर बोलले. यापूर्वी खग्रास सूर्यग्रहण आणि हॅलेचा धूमकेतू याविषयी प्रत्येकी शंभर व्याख्याने देऊन त्यांनी खगोलशास्त्राविषयी जनजागृती करण्यास मोलाचा हातभार लावला. खगोलशास्त्राबरोबरच पंचांग आणि दिनदर्शिकाकर्ते म्हणूनही सोमण यांची ख्याती आहे. लवकरच त्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या माथेरान येथील आकाश निरीक्षण केंद्राचे उद्घाटन होणार आहे. यानिमित्ताने वयाच्या ७६ व्या वर्षीही सतत कार्यरत असणाऱ्या या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाशी साधलेला संवाद..

 

land, industrial development, Kolhapur,
कोल्हापुरात औद्योगिक विकासासाठी उद्योगासाठी ६५० हेक्टर जमीन उपलब्ध करणार – उदय सामंत
chhattisgarh s Elephant Family, Settles in Maharashtra, female elephant, give birth to calf, gadchiroli district , gadchiroli elephant born, elephant news, gadchiroli news, marathi news, animal news,
VIDEO: छत्तीसगडच्या मादीने महाराष्ट्रात दिला पिल्लाला जन्म, ‘प्ररप्रांतीय’ हत्तींचा कुटुंबकबिला विस्तारला…
Water supply to villages by tankers in Pune Satara Sangli and Solapur districts pune news
पश्चिम महाराष्ट्र टँकरग्रस्त; सर्वाधिक झळ सातारा, पुण्याला
mpsc MPSC declared the result of Civil Engineering Pune
एमपीएससीकडून ‘स्थापत्य अभियांत्रिकी’चा निकाल जाहीर

’‘गीतारहस्य’ या ग्रंथावर व्याख्याने द्यावी, असे का वाटले?
लोकमान्य टिळकांनी समाज एकत्र यावा म्हणून गणेशोत्सवास सार्वजनिक स्वरूप दिल्याचे सर्वज्ञात आहे. मात्र ‘गीतारहस्य’ ग्रंथाविषयी त्याच्या नावापलीकडे नव्या पिढीला फारशी माहिती नाही. अनेक विद्वानांनी गीतेचा विविध प्रकारांनी अर्थ लावला. संसार त्यागून संन्यास हा मोक्षाचा मार्ग असल्याचे काही जण सांगत होते. लोकमान्य टिळकांचा कर्मवादावर विश्वास होता. ‘केल्याने होत आहे रे, आधी केलेचि पाहिजे’ हाच गीतेचा मूळ अर्थ आहे, हे त्यांना लोकांना पटवून द्यायचे होते, कारण पाश्चात्त्यांची प्रगती कर्मयोगामुळे झाली, असे टिळकांचे मत होते. गीतेतील विविध वचने उद्धृत करून त्यांनी दैववादी बनलेल्या तत्कालीन समाजाला कर्मवादी होण्याचा सल्ला दिला.
’पण आताच्या काळात हे तत्त्वज्ञान कितपत उपयुक्त आहे?
निश्चितच आहे. सध्या वरवर आधुनिकीकरणाचा बुरखा पांघरलेला दिसत असला तरी समाजात फार मोठय़ा प्रमाणात असुरक्षितता आहे. एकीकडे चंगळवाद बोकाळलेला असतानाच दैववादाचाही मोठा पगडा आहे. भोंदुबाबा, बुवांचे प्रस्थ वाढले आहे. मोठय़ा संख्येने लोक त्यांच्या आहारी गेले आहेत. त्यामुळे ‘गीतारहस्य’मधील विचार निश्चितच उपयुक्त आहेत.
’व्याख्यानांना मिळणारा प्रतिसाद कसा होता?
हल्ली व्याख्यानांचे श्रोते म्हणजे ज्येष्ठ नागरिक असे समीकरणच बनू पाहत आहे. मीसुद्धा अनेकदा त्याचा अनुभव घेतला आहे. मात्र ‘गीतारहस्य’वरील व्याख्यानांबाबत वेगळा अनुभव आहे.
व्याख्यानाला येणाऱ्या श्रोत्यांमध्ये तरुण आणि महिला वर्ग मोठय़ा प्रमाणात आहे. तरुण अनेक शंका विचारतात. उदा. ‘काम करायचे, पण फळाची अपेक्षा बाळगायची नाही, हे कसे शक्य आहे?’ खरे तर गीतेत फळाचा त्याग करू नका, असे म्हटलेले नाही. फळाची आसक्ती ठेवू नका. आसक्ती दु:खाचे मूळ आहे, असे सांगितले आहे.
’एकीकडे तुम्ही कर्मवादाचा पुरस्कार करता आणि दुसरीकडे राशिभविष्य लिहिता, हा विरोधाभास नाही का?
नियतकालिकांमध्ये प्रसिद्ध होणारे राशिभविष्य फारसे गांभीर्याने घेतले जात नाही. अनेक वाचक ते सवयीने वाचतात, मात्र त्यानुसार त्यांचा दिनक्रम ठरत नाही. काही क्षण मनोरंजन इतकेच त्याचे स्वरूप असते.
’यापूर्वीही तुम्ही व्याख्यानांची शतके केली आहेत, त्याविषयी काय सांगाल?
१६ फेब्रुवारी १९८० रोजी भारतातून खग्रास सूर्यग्रहण दिसणार होते. तब्बल ८२ वर्षांनी तो योग आला होता. मात्र या दुर्लभ खगोलीय अवस्थेविषयी समाजात गैरसमज होते. ते दूर होऊन सर्वानी ही घटना पाहावी, म्हणून मी त्याआधी वर्षभर ठिकठिकाणी शंभर व्याख्याने दिली. त्यानंतर १९८६ मध्ये हॅलेचा धूमकेतू सूर्याला भेट देणार होता. दर ७६ वर्षांनी ही घटना घडते. त्यामुळे त्यामागचे खगोलीय विज्ञान समाजावून देण्यासाठी मी शंभर व्याख्याने दिली. वयाच्या साठीला साठीशांत करण्याची प्रथा आहे. मी विविध ठिकाणी ६१ विनामूल्य व्याख्याने दिली.
’खगोलशास्त्राची आवड कशी निर्माण झाली?
माझे वडील कृष्णाजी विठ्ठल सोमण निर्णयसागर पंचांग तयार करीत. त्यांनी मला खगोल विषयाची गोडी लावली. १९७२ मध्ये ते वारले. तेव्हापासून मी निर्णयसागर पंचांगाचे काम करतोय.
’पूर्णवेळ हाच व्यवसाय करीत आहात का?
नाही. टेक्सटाइल इंजिनीअरिंग केल्यानंतर मी मफतलाल मिलमध्ये २५ वर्षे नोकरी केली. त्यानंतर स्वेच्छानिवृत्ती पत्करून मी खगोल आणि पंचांग या दोन आवडीच्या विषयांकडे लक्ष केंद्रित केले. वांगणी येथे मी आकाश निरीक्षण वर्ग आयोजित करीत होतो. बुलढाणा जिल्ह्य़ातील लोणार येथील अशनी विवर पाहायला ३५ वेळा सहली घेऊन गेलो. ५२ हजार वर्षांपूर्वी ६० मीटर लांब, २० लक्ष वजनाचा अशनी (पाषाण) लोणार गावी पडला. त्या ठिकाणी दोन किलोमीटर व्यासाचे १५० मीटर खोल विवर आहे. दरवर्षी ‘आकाशदर्शन’ पुस्तिका प्रकाशित करतो.
’कॅलेंडर्स विश्वात तुमचे नाव प्राधान्याने घेतले जाते. सध्या किती दिनदर्शिकांचे काम करता?
सुरुवातीच्या काळात सूर्यसिद्धांत, मग ग्रहलाघव आणि करणकल्पकता या तीन ग्रंथांच्या आधारे कालगणना केली जात होती. आता आधुनिक युगात ते काम संगणक करतो. त्यामुळे त्यात कमालीची अचूकता आली आहे. ‘महाराष्ट्र दर्शन’, ‘भाग्योदय’, ‘साईनिर्णय’, ‘निर्णयसागर’, ‘महालक्ष्मी’ आणि ‘वनवासी कल्याण आश्रम’ यांचे कॅलेडर्स मी तयार करतो. याशिवाय ‘निर्णयसागर’ आणि ‘ढवळे पंचांग’चे काम माझ्याकडे असते. याशिवाय मी खिशात मावण्याजोगे नॅनो पंचांग प्रसिद्ध करीत असतो. कॅलेंडर्स हा महाराष्ट्रीय संस्कृतीचा अविभाज्य घटक आहे. पूर्वी घरोघरी किमान एक कॅलेंडर्स असायचे. आता वेगवेगळी दोन-तीन कॅलेंडर्स असतात.
’ग्रामीण भागातील शाळांच्या अंगणात केला जाणारा ‘तारांगण आपल्या दारी’ हा उपक्रम बंद का झाला?
ठाण्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी आबासाहेब जऱ्हाड यांनी ही कल्पना मांडली होती. ग्रामीण भागातील मुलांना तारांगण पाहता येत नाही. त्यांच्यासाठी हा उपक्रम होता. त्यासाठी स्वतंत्र वाहन होते. एक माहितीपटही आम्ही तयार केला होता. या प्रकल्पाची अंमलबजावणी मी केली होती. खरे तर तो उपक्रम सुरू राहायला हवा होता. जिल्हा प्रशसनाची तयारी असेल तर पुन्हा हा उपक्रम सुरू करता येईल. त्यासाठी आवश्यक ती सर्व मदत करायला मी तयार आहे.
’सध्या तुम्ही कोणत्या प्रकल्पावर काम करीत आहात?
‘गीतारहस्य’ ग्रंथावर आधारित मी जी शंभर व्याख्याने दिली, त्यावर आधारित पुस्तक लिहीत आहे. त्यामुळे व्याख्याने ऐकू न शकलेल्या लोकांपर्यंत ते विचार पोहोचतील. माथेरान पलिकेतर्फे तारांगण प्रकल्प साकारण्यात आला आहे. तिथे दरवर्षी लाखो पर्यटक येतात. त्यांना संध्याकाळी आकाशदर्शन करता यावे म्हणून तेथील ‘पे मास्टर पार्क’ येथे ३६ आसन क्षमता असणारे थ्रीडी थिएटर उभारण्यात आले आहे. तिथे माहितीपट दाखविण्यात येतील. या इमारतीच्या गच्चीवर १४ इंची व्यासाची दुर्बीण बसवली जाणार आहे. त्यातून शनीची वलये, गुरूचे चंद्र आदी आकाशातील घटक पाहता येतील. याशिवाय खगोलशास्त्राची माहिती देणारे एक कायमस्वरूपी प्रदर्शन या ठिकाणी मांडण्यात येणार आहे. माझ्या मार्गदर्शनाखाली साकारण्यात येत असलेल्या या प्रकल्पाचे उद्घाटन नोव्हेंबर महिन्यात होईल.
– प्रशांत मोरे