मुरबाड, भिवंडी तालुक्यातील ४९ विहिरींची कामे यशस्वी * बावीस ठिकाणी पाणी

ठाणे : पाणीपुरवठा विभागाच्या वतीने टंचाई निवारण कृती आराखडय़ाअंतर्गत विंधन विहिरींची कामे सुरू आहेत. मुरबाड आणि भिवंडी तालुक्यातील ४९ विहिरींची कामे यशस्वी झाली आहेत. त्यापैकी २२ विंधन विहिरींवर हातपंप बसविण्यात आले असून पाणीपुरवठा सुरू झाला आहे. ही कामे महिनाभराच्या कालावधीतच पूर्ण झाल्याने भिवंडी आणि मुरबाड तालुक्यातील नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

टाळेबंदीमुळे ग्रामीण भागातील पाणीटंचाईची कामे या वर्षी पूर्ण होणार की नाही याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, या संदर्भात काही दिवसांपूर्वी शासनाने दिलेल्या आदेशानुसार ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे यांनी टंचाई कामांसाठी ग्रामसभेची मंजुरी घेणे आवश्यक असलेली ग्रामसभेची अट शिथिल करण्याचे आदेश दिले.

ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ, कल्याण, मुरबाड, भिवंडी आणि शहापूर या पाच तालुक्यासाठी २०१९-२० दरम्यान २४० विंधन विहिरींना मंजुरी देण्यात आली असून १९० विंधन विहिरींच्या कामांना प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे. त्यानुसार भिवंडी आणि मुरबाड तालुक्यात ७३ विहिरींचे प्रत्यक्ष खोदकाम हाती घेण्यात आले होते. त्यापैकी ४९ विहिरी यशस्वी खोदून झाल्या असून त्यांना पाणीही लागले आहे, तर ७३ विहिरींपैकी १२ विहिरी अयशस्वी झाल्या असून १२ विहिरींचे जास्त खोलीकरण केल्यानंतर त्यांना पाणी लागले आहेत. यशस्वी झालेल्या विहिरींपैकी २२ विहिरींवर जिल्हा परिषदेतर्फे हातपंप बसविण्यात आल्यामुळे या हातपंपाद्वारे प्रत्यक्ष पाणीपुरवठा सुरू झाला आहे. त्यामुळे हातपंप बसविलेल्या ठिकाणच्या आजूबाजूच्या नागरिकांना आता, मुबलक प्रमाणात पाणी मिळणार आहे. तसेच पावसाळा सुरू होईपर्यंत विंधन विहिरी खोदण्याचे काम असेच अविरत सुरू राहणार असल्याची माहिती ग्रामीण पाणीपुरवठा विभागातर्फे देण्यात आली आहे. या विंधन विहिरींच्या कामांमुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील पाणीटंचाईवर मात करण्यास मदत होणार आहे. तर भविष्यात ग्रामीण भाग पाणीटंचाई मुक्त करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.