ठेकेदाराला सव्वा दोन कोटी रुपये देऊनही अडीच वर्षांपासून काम अपूर्णच

वसई-विरार महापालिकेच्या परिवहन सेवेच्या बस डेपोचे काम गेल्या अडीच वर्षांपासून रखडल्याचे उघडकीस आले आहे. ठेकेदाराला सव्वा दोन कोटी रुपयांची रक्कम देऊनही ते काम अद्याप पूर्ण झालेले नाही. एकीकडे परिवहन सेवेला जागेची अडचण भासत असल्याने ते एसटी महामंडळाकडे जागा मागत आहेत, तर दुसरीकडे आहे त्या बस आगाराचे कामही त्यांना पूर्ण करता येत नसल्याचे दिसून येत आहे.

वसई-विरार महापालिकेची परिवहने सेवा ‘मेसर्स भगीरथी ट्रान्सपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड’ या खासगी ठेकेदारामार्फत चालवली जाते. वसईच्या ग्रामीण भागातून एसटीने आपली सेवा बंद करून महापालिकेकडे हे मार्ग हस्तांतरित केले आहेत, परंतु परिवहनच्या बससाठी जागा नसल्याचे कारण महापालिका देत आली आहे. एसटीने आपले आगार पालिकेला भाडेतत्त्वावर द्यावे, अशी मागणी पालिकेने केलेली आहे. मात्र जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान योजनेनुसार पालिकेला बस डेपो बांधण्यासाठी २०१५ मध्ये निधी मिळाला होता. त्यानुसार साडेचार कोटी रुपये खर्चून विरारच्या यशवंत नगर येथे भव्य परिवहन भवन बनवण्यात येणार होते. या कामाचे कंत्राट मे. एन. ए. कन्स्ट्रक्शन या ठेकेदारास देण्यात आले. कार्यक्रमाची अग्रीम रक्कम म्हणून दोन कोटी १८ लाख रुपयेही देण्यात आले होते, परंतु अद्याप हे काम पूर्ण झालेले नाही. या ठिकाणी बससाठी आगार बांधण्याऐवजी व्यावसायिक मॉल बांधला जात असल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते चरण भट यांनी केला आहे. २०१५मध्ये सुरू झालेले काम २०१८ आले तरी होत नाही, मग या पैशांचे काय झाले, असा सवाल त्यांनी केला आहे.

बसगाडय़ा उभ्या करण्यासाठी जागा नसल्याचे कारण देत नव्या बसची खरेदी होत नाही, असे सांगितले जाते. मग ही जागा का अडवून ठेवली आणि ठेकेदारावर कारवाई का केली नाही, असा सवाल त्यांनी केला. परिवहन भवनाच्या नावाखाली व्यावसायिक गाळे उभारण्याची गरज नसल्याचेही त्यांनी सांगितले.

विलंब का झाला?

परिवहन सभापती भरत गुप्ता यांनी हे परिवहन भवन लवकरच तयार होईल असे सांगितले. परिवहन ठेकेदार मनोहर सत्पाळ यांनी हे परिवहन भवन पालिका बांधून ते आम्हाला हस्तांतरित करणार असल्याचे सांगितले. त्याला विलंब का झाला किंवा इतर तांत्रिक बाबीबाबत अनभिज्ञ असल्याचे त्यांनी सांगितले. अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांच्याशी संपर्क होऊ  शकला नाही.