खारभूमी विभागाने विरोध केल्याने पुलाच्या कामांत अडचणी; केवळ पादचाऱ्यांसाठी खुला

गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या नायगाव खाडीवरील पुलाचे काम पुन्हा एकदा लांबणीवर पडले आहे. खाडीजवळच्या खारभूमी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरित न झाल्याने पुलाला उतार मिळालेला नाही. त्यामुळे २८ सप्टेंबरला केवळ पादचाऱ्यांसाठी हा पूल अर्धवट खुला केला जाणार आहे.

नायगाव पूर्वेकडील नागरिकांना रेल्वे स्थानकात येण्यासाठी खाडी पार करावी लागते. या खाडीवरील पादचारी पूल धोकादायक बनला आहे. नायगाव खाडीवरील एकमेव पादचारी पूल अत्यंत धोकादायक असून या पावसात तो वाहून जाण्याची भीती व्यक्त होत आहे. या पुलाच्या लोखंडी प्लेट गंजल्या आहेत. खाडीचे वाढलेले पाणी, पुलावरील वाढलेली वर्दळ यांमुळे हा पूल जास्त भार सहन करण्याच्या पलीकडे गेला आहे. त्यामुळे नागरिकांना या पुलावरून जीव मुठीत धरून जावे लागत आहे.

खाडीवर सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत नवा पूल बांधण्यात येत आहे. २०१४ ते २०१८ दरम्यान चार वेळा निविदा काढण्यात होत्या. मात्र अद्याप पूल पूर्ण झाला नाही. साडेपाच कोटी रुपये खर्चाच्या या पुलासाठी महापालिकेने १ कोटी १ लाख ७४ हजार रुपयांचे सहकार्य केले आहे. मात्र पुलाचे काम संथगतीने सुरू होते. पुलासाठी शिवसेनेने नुकतेच आंदोलनही केले होते. त्या वेळी २८ सप्टेंबरला जनतेसाठी पादचारी प्रवासाठी खुला केला जाईल आणि उर्वरित काम ३१ डिसेंबर २०१८ पर्यंत पूर्ण होईल, असे सार्वजनिक बांधकाम विभागाने सांगितले होते, परंतु पुढील पुलाच्या कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला अडचणी निर्माण झाल्या आहेत.

पुलाच्या नायगाव बाजूकडील मार्गावर खारभूमी आहे. ती खारभूमी हस्तांतरित करण्यासाठी करण्याचा प्रस्ताव अजूनही त्या संबंधित खात्यास न देण्यात आल्याने जागा हस्तांतरित होऊ  शकली नाही. खारभूमी विभागाकडून जागा हस्तांतरित करण्यासाठी विरोध दर्शवला जात असल्याने पुलाचे काम लांबणीवर जाण्याची शक्यता आहे.

खारभूमीची जागा हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला असून त्यावर पाठपुरावा सुरू आहे. जागा मिळाल्यानंतर लगेचच कामाची सुरुवात करून काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल.

– राजेंद्र जगदाळे, उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम उपविभाग