पालघर नगर परिषद बैठकीत अनेक विकासकामांबाबत निर्णय

पालघर नगर परिषद निवडणुकीला अवघे सहा महिने बाकी असताना स्थानिक सत्ताधाऱ्यांनी विविध विकासकामे हाती घेतली आहेत. नगर परिषदेच्या विशेष सभेत विविध कामांसंदर्भातील निर्णय झटपट घेण्यात आले आहेत. नगर परिषद इमारत, मासळी बाजार, शहराचे सुशोभीकरण, सार्वजनिक उद्याने, पाणीपुरवठय़ासाठी नव्या टाक्या यांना विशेष सभेमध्ये मंजुरी देण्यात आली.

पालघर नगर परिषदेमध्ये सध्या शिवसेनेची सत्ता आहे. सहा महिन्यांवर निवडणूक येऊन ठेपल्याने सत्ताधाऱ्यांनी निवडणुकीत जोर लावण्यासाठी आतापासूनच तयारी सुरू केली आहे. या निवडणुकीत भाजप आपली ताकद पणाला लावेल ही भीती असल्याने सत्ताधारी शिवसेनेने विविध विकासकामे हाती घेतली आहे. नगर परिषदेच्या विशेष सभेत याबाबत विविध निर्णय घेण्यात आले. यातील अनेक निर्णयांना विविध नगरसेवकांनी विरोध केला तरी निवडणुकीच्या तोंडावर कामे झाली पाहिजेत म्हणून या निर्णयांना मंजुरी देण्यात आली.

पालघर नगर परिषद कार्यालयासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने जागेच्या अदलाबदलीचा प्रस्ताव दिला असून संबंधित जागेचे आरक्षण आणि कायदेशीर बाबी तपासून या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. स्मशानभूमीसाठी शासनाकडून प्राप्त अनुदान परत जाऊ  नये, गेल्या चार वर्षांपासून रखडलेल्या कामांना अखेरची मुदतवाढ देण्याचे ठरले. नगर परिषदेकडे पाण्याचा उपसा करण्यासाठी पाण्याचे शुद्धिकरण करण्यास मर्यादा असतात, तसेच नगर परिषदेकडे पाणीपुरवठा तांत्रिक पाठबळ नसताना २.५ आणि पाच लक्ष लिटरच्या नव्या जलकुंभाची गरज काय, असे विचारत प्रशासनाला धारेवर धरले. पाण्याकरिता यापूर्वी मंजूर एक लाख लिटरच्या टाक्यांची कामे सुरू करण्याचे सभाग्रहाने मंजूर केले. शहरातील पाणीपुरवठय़ासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून तांत्रिक साहाय्य घेण्यावर नगरसेवकांचे एकमत झाले.

पालघर येथे नवीन उद्याने बनवताना नगर परिषदेने प्रस्तावित केलेल्या नावांवर सर्वच नगरसेवकांनी जोरदार आक्षेप घेतला. उद्यानांसाठी जागेच्या उपलब्धतेप्रमाणे प्रस्ताव तयार करावे आणि निधीकरिता प्रयत्न करावे, असा निर्णय झाला. मात्र उद्यानांसाठी आणलेले बाक इमारतीमध्ये लावण्यास नगर परिषदेने विरोध दर्शवला. पालघर शहरातील मासळी बाजारासाठी उपलब्ध जागेत इमारत उभारणे शक्य आहे का याबाबत तांत्रिक सल्ला घेतल्यानंतर या विषयाला मंजुरी घेण्यात यावी, असे ठरले. इतर वेळी शांत असणारे नगरसेवक निवडणुका जवळ आल्याने आक्रमक होताना दिसले. सत्ताधारी शिवसेनेच्या नगरसेवकांनी नगराध्यक्ष उत्तम पिंपळे यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला, तर विरोधकांनी अनेक मुद्दय़ावर प्रशासनाला धारेवर धरले.

निर्णय कोणते?

* नगर परिषद कार्यालयासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने दिलेल्या जागेच्या अदलाबदलीच्या प्रस्तावास मंजुरी.

* पाण्याच्या मंजूर एक लाख लिटरच्या टाक्यांची कामे सुरू करण्यास मान्यता.

* शहरातील पाणपुरवठय़ासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून तांत्रिक साहाय्य.

* उद्यानांसाठी जागेच्या उपलब्धतेप्रमाणे प्रस्तावतयार करणे आणि निधीसाठी प्रयत्न.