09 July 2020

News Flash

डोंबिवलीच्या स्मशानभूमीत कामगारांची मनमानी

अंत्यविधीचे काम करण्यासाठी दोन ते पाच हजारांची मागणी

अंत्यविधीचे काम करण्यासाठी दोन ते पाच हजारांची मागणी; गर्दुल्ल्यांकडून अंत्यविधी उरकण्याची वेळ

डोंबिवली : येथील शिवमंदिर परिसरातील महापालिकेच्या स्मशानभूूमीमधील विद्युतदाहिनीत करोना किंवा इतर आजाराने मृत पावलेल्या व्यक्तींचा मृतदेह ठेवण्यासाठी तेथील कामगार मृताच्या नातेवाईकांकडे दोन ते पाच हजार रुपयांची मागणी करीत आहेत. ही मागणी पूर्ण झाली नाही तर ते मृतदेहाला हात लावत नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या अडेल भूमिकेमुळे काही नातेवाईक कामगारांना मागणीची रक्कम देऊन अंत्यविधी उरकून घेत आहेत. तर इतके पैसे देण्याची ऐपत नसलेले नागरिक अंत्यविधीसाठी रेल्वे स्थानक परिसरातील गर्दुल्ल्यांची मदत घेत असून त्यासाठी पाचशे ते एक हजार रुपये देत आहेत.

शनिवारी दुपारी शिवमंदिर स्मशानभूमीमध्ये चार ते पाच पार्थिव दहनासाठी आले होते. कामगार पैशांची मागणी पूर्ण होत नाही, तोपर्यंत पार्थिवाला हात लावत नव्हते. स्मशानभूमीबाहेरील रुग्णवाहिकेत मृतदेह अंत्यविधीच्या प्रतीक्षेत होते. मात्र अंत्यविधी उरकण्यासाठी कामगार दोन ते पाच हजार रुपयांची मागणी करत असल्याचे मृताच्या नातेवाईकांनी सांगितले. पैसे देण्यास नकार दिला तर दोनपैकी एक कामगार स्मशानभूमीबाहेर निघून जातो, तर एकटा मृतदेहाला कसे उचलू,असा प्रश्न उपस्थित करून दुसरा कामगार अंत्यविधीसाठी असमर्थता दाखवतो. तसेच पैसे दिले तर बाहेर गेलेल्या कामगाराला बोलावून आणतो, असेही तो नातेवाईकांना सांगतो. अखेर कामगाराच्या अडेल भूमिकेपुढे नमते घेऊन नातेवाईक कामगारांना पैसे देऊन अंत्यविधी उरकून घेतात. असाच अनुभव आल्याची माहिती एका रहिवाशाने ‘लोकसत्ता ठाणे’ला दिली.

करोनाचा प्रादुर्भाव वाढल्यापासून पालिकेच्या स्मशानभूमींमध्ये तेथील कामगारांकडून हा अडवणुकीचा प्रकार सुरू झाला आहे. ‘मृतदेह करोनाचा असल्याने आम्हाला पण जोखीम आहे, तुम्ही रुग्णालय खर्चासाठी हजारो रुपये मोजता, मग आम्हाला थोडे पैसे द्यायला काय हरकत आहे’, असा प्रश्न कामगारांकडून बिनदिक्कत केला जातो. तर इतर आजारांनी मृत पावलेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांकडेही अशाच प्रकारे अंत्यविधीसाठी कामगार पैशांची मागणी करतात. अशा प्रकारच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत.

गर्दुल्ल्यांची मदत

कामगारांनी मागणी केलेली रक्कम देण्याची ऐपत नसल्यामुळे अनेक नातेवाईक रेल्वे स्थानकात जाऊन गर्दुल्ल्यांना शोधून आणतात. त्यांना पाचशे ते एक हजार रुपये देऊन त्यांच्याकडून अंत्यविधी उरकून घेतात. पैसे मिळत असल्याने गर्दुल्ले हे काम करण्यास तयार होतात. असाही अनुभव एका रहिवाशाने सांगितला. स्मशानभूमींमध्ये कामगारांकडून जी लूटमार, अडवणूक सुरू आहे, त्याची गंभीर दखल आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी घेण्याची मागणी डोंबिवलीतील रहिवाशांकडून केली जात आहे.

पालिका स्मशानभूमींमध्ये विद्युतदाहिनी चालविणाऱ्या खासगी संस्थेचे आणि पालिकेचे कामगार तीन पाळ्यांमध्ये काम करतात. कोणाचीही अडवणूक न करता त्यांनी मृतदेह दहनाची प्रक्रिया करायची आहे. दहनासाठी ते नातेवाईकांकडून पैशांची मागणी करीत असतील तर ते चुकीचे आहे. अशी कोणाचीही अडवणूक कामगारांनी करू नये. तसे निदर्शनास आल्यास, तक्रार आल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल.

– जगदीश कोरे, कार्यकारी अभियंता

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 30, 2020 4:45 am

Web Title: workers demand money for funeral at crematorium in dombivli zws 70
Next Stories
1 कल्याण-डोंबिवलीतील ३२ प्रभागांत निर्बंध
2 घरबांधणीला वेग
3 अश्लील संकेतस्थळाच्या आड नागरिकांची फसवणूक
Just Now!
X