अध्यक्षांनी केलेल्या भ्रष्टाचारामुळे उर्वरित विश्वस्तांचा निर्णय; श्रीकांत देशपांडे यांची हकालपट्टी
अंबरनाथमधील सर्वात जुनी शिक्षणसंस्था म्हणून प्रसिद्ध असलेल्या दि एज्युकेशन सोसायटीमधील भ्रष्टाचार नाटय़ावर अखेर पडदा पडला आहे. सोसायटीच्या नुकत्याच झालेल्या सभेत अध्यक्ष श्रीकांत देशपांडे यांची अध्यक्षपदावरून हकालपट्टी करीत या अध्यक्षांची कार्यकारिणीही अखेर बरखास्त करून त्यांचे सर्व अधिकार संस्थेच्या सदस्यांनी सर्वानुमते गोठवले आहेत. तसेच सोसायटीच्या कारभाराची सूत्रे विश्वस्त केशव देशपांडे आणि चंद्रशेखर देऊस्कर यांच्याकडे सोपविण्यात आली आहेत.
अंबरनाथमधील नावाजलेली शिक्षणसंस्था म्हणून परिचित असलेली दि एज्युकेशन सोसायटी गेल्या काही दिवसांपासून अध्यक्षांवरील भ्रष्टाचारांच्या आरोपांमुळे चर्चेचा विषय ठरली आहे. या संस्थेच्या महात्मा गांधी शाळेच्या नूतन बहुमजली इमारतीच्या बांधकामासाठी मागील काही वर्षांपासून निधी संकलनाचे काम सुरू होते. लाखो रुपयांचा निधी संकलित होऊनही तीन वर्षांपासून शाळेच्या इमारतीचे बांधकाम अर्धवट अवस्थेत आहे. त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत होती. त्यामुळे संस्थेतील उर्वरित सदस्यांनी पदाधिकारी व अध्यक्षांवर पैशाचा गैरव्यवहार होत असल्याचा आरोप केला होता. याबाबत काही सदस्यांनी आवाज उठविल्याने संस्थेचे अध्यक्ष श्रीकांत देशपांडे वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. १० जानेवारीला पार पडलेल्या संस्थेच्या सर्वसाधारण सभेत महत्त्वाचे विषय सभेने बहुमताने नामंजूर केल्यावर अखेरीस अध्यक्ष देशपांडे यांची कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली. संस्थेच्या कार्यालयाचे जुने टाळे बदलून नवीन टाळेही लावण्यात आले असून त्याच्या चाव्या नेमण्यात आलेल्या विश्वस्तांकडे देण्यात आल्या आहेत.
दि एज्युकेशन सोसायटीची स्थापना १९३६ मध्ये भाऊसाहेब परांजपे यांनी अंबरनाथमध्ये केली. संघाची छाप असलेल्या या संस्थेच्या भाऊसाहेब परांजपे विद्यालय, पी.डी. कारखानीस महाविद्यालय, महात्मा गांधी विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय, बाल भवन प्राथमिक शाळा, सुशीलाताई दामले विद्यालय, शिवाजी आबाजी कोळकर विद्यालय, गुरुकुल, आदिवासी माध्यमिक विद्यालय, डोलारे, आदिवासी माध्यमिक विद्यालय, आंदाड आदी शाळा व महाविद्यालये आहेत. या संस्थेची महात्मा गांधी विद्यालय ही सुप्रसिद्ध शाळा जुनी झाल्याने त्या जागी पाच मजली नवीन इमारत बांधण्याच्या कामाला २०१२ मध्ये सुरुवात करण्यात आली. त्यासाठी विविध माध्यमांतून निधी जमा करण्याचे करण्यात आले होते. मात्र जमलेल्या पैशांचा विनियोग विद्यमान अध्यक्ष श्रीकांत देशपांडे यांच्याकडून होत नसल्याचे सदस्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी जाब विचारण्यास सुरुवात केली. मात्र पदाधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने सदस्यांमध्ये असंतोष पसरला होता. त्यामुळे देशपांडे यांना पदावरून हटविण्यासाठी सर्वसाधारण सभेत अविश्वास ठराव मांडून देशपांडे यांना आपल्या पदाचा राजीनामा देण्यास भाग पाडून त्यांची कार्यकारिणी अखेर बरखास्त करण्यात आली. सभेत अजित म्हात्रे, अजित पटवर्धन, जयंत देशपांडे, डॉ. श्रीकृष्ण पाटगावकर, धनंजय जठार, संतोष आदक आदींनी चर्चेत भाग घेऊन बरखास्तीसाठी हातभार लावला.
याप्रकरणी सध्या मी कोणतेही मत व्यक्त करणार नसून येत्या एक-दोन दिवसांत या सभेबाबतची खरी परिस्थिती स्पष्ट होईल, तेव्हाच मी माझी योग्य भूमिका सर्वापुढे मांडणार आहे.
– श्रीकांत देशपांडे, बरखास्त कार्यकारिणीचे अध्यक्ष