दररोज वाढणारे गर्दीचे लोंढे आणि तुलनेने अपुऱ्या पडणाऱ्या सुविधा यामुळे ठाण्याहून नियमित रेल्वे प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या अक्षरश नाकीनऊ आले असताना खासदार राजन विचारे यांनी बुधवारी संसदेत पुन्हा एकदा या स्थानकाचा जागतिक दर्जाच्या स्थानकांच्या यादीत समावेश करावा अशी मागणी लावून धरली. सद्य:स्थितीत या स्थानकात असलेले दहा फलाट, पाच पादचारी पूल, सहा सरकते जिने, सहा उद्वाहक, पाच स्वच्छतागृहे अशा सुविधा कमी पडत आहेत, असा मुद्दाही विचारे यांनी या वेळी मांडला.

ठाणे स्थानकाला जागतिक दर्जाच्या स्थानकाचा दर्जा द्यावा असा मुद्दा ममता बॅनर्जी रेल्वे मंत्री असल्यापासून पुढे येत आहे. बॅनर्जी यांनी मांडलेल्या रेल्वे अर्थसंकल्पात या स्थानकाचा समावेश विशेष दर्जाच्या स्थानकांमध्ये करण्यात आला होता. मात्र, जागतिक दर्जाच्या स्थानकासाठी आवश्यक असलेल्या निधीची तरतूद इतक्या वर्षांत काही झालेली नाही. गेल्या काही वर्षांत या स्थानकातील सोयी, सुविधांसाठी रेल्वे प्रशासनाने काही कोटी रुपयांची तरतूद केली आणि पादचारी पूल, पार्किंग सुविधांची नव्याने उभारणीदेखील करण्यात आली. असे असले तरी ठाणे, घोडबंदर, कळवा तसेच आसपासच्या परिसरातील रेल्वे प्रवाशांचा भार या स्थानकावर सातत्याने पडू लागल्याने या सुविधाही आता तुंटपुज्या ठरू लागल्या आहेत. बुधवारी मध्य रेल्वे प्रशासनाने रविवारचे वेळापत्रकाची अंमलबजावणी केल्याने ठाण्यासह कल्याण, डोंबिवली, दिवा स्थानकांत प्रवाशांच्या गर्दीचा महापूर उसळला. ठाणे स्थानकात तर सकाळी आठनंतर प्रवाशांना शिरायलाही जागा नव्हती. एकीकडे हा प्रकार सुरू असताना दुसरीकडे खासदार राजन विचारे यांनी संसदेत पावसाळी अधिवेशनात या स्थानकाला जागतिक दर्जाच्या स्थानकाचा दर्जा द्यावा असा आग्रह धरल्याने या मुद्दय़ावरून पुन्हा एकदा उलटसुलट प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

‘विकासकामे सुरू’

ठाणे रेल्वे स्थानकातून रेल्वेला दररोज ५० लाख रुपयांचे उत्पन्न मिळत असल्याने केंद्र सरकारने आखलेल्या आदर्श रेल्वे स्थानक योजनेतून या स्थानकाच्या विकासासाठी भरीव आखणी केली जावी अशी मागणी विचारे यांनी केली. या स्थानकातून दररोज आठ लाख प्रवासी प्रवास करतात. तुलनेने येथील सुविधा खूपच कमी आहेत. त्यामुळे यामध्ये भर टाकावी, अशी मागणी विचारे यांनी केली. विचारे यांच्या प्रश्नावर उत्तर देताना रेल्वे राज्यमंत्री सुरेश चन्ना यांनी ठाण रेल्वे स्थानकात वेगवेगळी विकासकामे सातत्याने सुरू असून या स्थानकातील पार्किंग प्लाझाच्या इमारतीवर आणखी एक मजला वाढविण्याचे काम लवकरच पूर्ण केले जाईल, असे सांगितले.