चेंदणी कोळीवाडा येथील जोगळेकरांकडे १८० देशांच्या चलनाचा संग्रह

प्रत्येक माणूस हा आपल्या गरजांची पूर्तता करण्यासाठी पैशांच्या मागे धावत असतो. पैसे कमविणे आणि खर्च करणे ही जगण्याची नियमित प्रक्रिया. ठाण्यातील चेंदणी कोळीवाडा येथे राहणारे मंगेश जोगळेकर यांनी मात्र पैसे कमवितानाच जगभरातील नोटा जमविण्याचा आगळावेगळा छंद जोपसला आणि त्यातून एक भला मोठा दुर्मीळ असा संग्रह त्यांनी केला आहे. जोगळेकरांकडे जगातील १९३ देशांपैकी १८० देशांची चलने, नाणी व नोटांचा संग्रह आहे.

जोगळेकर १९७८ पासून परदेशात नोकरीच्या निमित्ताने प्रवास करत आहेत. या प्रवासादरम्यान त्यांना विविध आकर्षक नोटा, नाणी आणि शिक्के हाताळण्याची संधी मिळाली आणि या प्रवासातून त्यांना जगभरातील चलनांचा संग्रह करण्याचा छंद जडला.  त्यांनी वैशिष्टय़पूर्ण पद्धतीने चलनांचे वर्गीकरण केले आहे.

जोगळेकर यांच्या संग्रहातून दोन विरुद्ध देशांच्या एकतेचे पुरावे देणारी नाणी व नोटांची उदाहरणे पुढे आली आहेत. नाण्याच्या एका बाजूला पाकिस्तान सरकारचे चिन्ह आणि दुसऱ्या बाजूला बांगलादेशी भाषेत नाण्याची लिहिलेली किंमत, असे अत्यंत दुर्मीळ नाणे त्यांच्या संग्रही आहे. भारताच्या स्वातंत्र्यानंतरच्या सर्व गव्हर्नरच्या स्वाक्षऱ्या असलेल्या नोटा त्यांच्या माहितीसह त्यांनी संग्रहामध्ये जपून ठेवल्या आहेत. त्यामध्ये भट्टाचार्य, नरसिंहम, सी.डी. देशमुख आदी गव्हर्नरच्या स्वाक्षऱ्या असलेल्या नोटा आहेत.  त्यांनी केलेला नाण्यांचा संग्रहही उल्लेखनीय आहे. त्यामध्ये १९४२ सालचे हिटलरच्या काळातील स्वस्तिक चिन्ह असलेले एक नाणे, तुर्की देशाचे एक लाख दीनारचे नाणे, असा वैविध्यपूर्ण नाण्याचा संग्रह त्यांच्याकडे आहे.

आकर्षक जादूई अंकाच्या नोटा

सलग क्रमांक असणाऱ्या नोटा, एकच अंकाच्या, अशा नोटा या क्वचितच कोणाला तरी मिळतात. जोगळेकर यांच्या संग्रहात १ रुपयापासून ते १००० रुपयांपर्यंतच्या एकाच आकडय़ाच्या सहा क्रमांक (११११११, ३३३३३३) असलेल्या नोटा आहेत.  तसेच चढत्या क्रमाने असलेल्या अंकांच्या नोटा त्यांच्या संग्रहात आहेत. विशेष म्हणजे, त्यांनी या अंकांची जादू वापरून विविध प्रयोग केले आहेत.