मुंबईप्रमाणेच ठाणे शहरसुद्धा तीन दिशांना खाडीकिनारा लाभलेले एक सुंदर बेट आहे. एका बाजूला संजय गांधी राष्ट्रीय उद्यान तर दुसरीडे पारसिकच्या डोंगररांगा अशी निसर्गश्रीमंती क्वचितच कुठल्या शहराच्या वाटय़ाला आली असेल.  खाडी परिसरातील जैवविविधता, खाडीच्या गाळ जमिनीत वर्षांनुवर्षे तग धरून खाडी किनाऱ्याचे रक्षण करणारी खारफुटी, शहराची ओळख असलेले तलाव अशा अनेक पर्यावरण राखणाऱ्या खुणा सांगता येतील. काल साजऱ्या झालेल्या जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने ठाणे शहराच्या पर्यावरणत भर घालणाऱ्या महत्त्वाच्या बाबींची उजळणी..

हिरव्यागार श्रीमंतीने नटलेल्या गावाचे आधुनिक सोयीसुविधा आल्यावर शहरात रूपांतर होते. ठाणे शहराच्या बाबतीतही असेच झाले आहे. मुंबईकडची मंडळी या शहराला पूर्वी गाव असेच संबोधत. याचे कारण असे की खेडय़ापाडय़ात अनुभवयाला मिळणारा निसर्ग ठाणे शहराने पूर्वी जपला होता. आता संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा भाग असलेला येऊर परिसर एवढाच काय तो भाग गाव म्हणून संबोधता येईल. काळानुसार संदर्भ बदलतात. त्याचप्रमाणे नवीन युगाची कास धरत ठाणे नावाच्या गावाने सातासमुद्रापार आलेल्या नागरिकांना आपल्या कुशीत सामावून घेतले. मात्र गेल्या तीन दशकात ठाणे शहराचा विस्तार अतिशय झपाटय़ाने झाला. लोकसंख्या कमालीची वाढली. त्यामुळे येथील निसर्ग सौदर्यच धोक्यात येऊ लागले. खाडीकिनारे बुजवून नव्या वस्त्या उभ्या राहू लागल्या. त्यासाठी तिवरांची कत्तल करण्यात आली. खाडीतून अनियंत्रित पद्धतीने वाळू काढून पात्र विस्कटवून टाकले. औद्योगिक आणि घरगुती सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता थेट खाडीत सोडले जात असल्याने येथील जीवसृष्टी संपुष्टात आली. ठाण्यातील पर्यावरणाचा तोल राखायचा असेल तर हे सारे रोखावे लागेल. कचरा नियोजनासाठी आणि मलनि:सारणासाठी शहरात प्रभावी उपाययोजना होणे हे वाढत्या लोकसंख्येच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहे.

ठाणे जिल्ह्य़ातील शहरांना नैसर्गिक दृष्टय़ा समृद्ध करण्यात या शहरांलगत असलेल्या वनक्षेत्राचा  महत्त्वाचा वाटा आहे. एक हजार पाचशे सव्वीस किलोमीटर एवढे वनक्षेत्र ठाणे जिल्ह्य़ाला लाभलेले आहे. मध्यंतरीच्या काळात बरीच वृक्षतोड झाली असली तरी आता सामूहिक वन पट्टे मिळालेल्या गावांनी आपापल्या वाटय़ाला आलेल्या क्षेत्रात बऱ्यापैकी जंगल राखले आहे. घनदाट जंगलाच्या ओढीने हिमाचल प्रदेश, लडाख येथून ठाणे शहराच्या जंगलात पाहुणे पक्षी दाखल होतात. त्यामुळे येथील निसर्ग श्रीमंतीत भर पडते. गेल्या वर्षी झालेल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा भाग असलेल्या येऊरमध्ये पाणवठय़ावरील प्राणी-पक्षी गणनेत श्रीलंकन फ्रॉग माऊथ हा नवा पाहुणा पक्षी आढळला. ठाणे पाणथळ जमीन क्षेत्राचा विचार केला तर साधारण १२०० हेक्टर एवढे क्षेत्र ठाणे शहरातील पाणथळ जमिनींचे आहे. वेगवेगळे स्थानिक पक्षी, स्थलांतरित पक्ष्यांचा अधिवास या ठिकाणी पाहायला मिळतो. यात भर म्हणजे ठाणे खाडी किनाऱ्यावर मोठय़ा संख्येने दाखल होणाऱ्या फ्लेिमगो पक्ष्यांची दखल घेत शासनाने ठाणे खाडी किनाऱ्याला फ्लेमिंगो अभयारण्य म्हणून घोषित केले आणि पर्यावरणाच्या दृष्टीने ठाणे शहराला आणखी महत्त्व प्राप्त झाले. १ जुलै रोजी होणाऱ्या वृक्षलागवडीच्या निमित्ताने ठाणे वनविभागाने १५ लाख वृक्षांचे उद्दिष्ट ठरवले आहे. यंदा नागरिकांचा सहभाग जास्त असल्याने हे उद्दिष्ट पार करून जास्तीत जास्त वृक्ष लागवड केली जाईल, असा विश्वास वन विभागाचे अधिकारी व्यक्त करतात.

वन विभागाचे नियंत्रण हवे

ठाणे खाडी किनारी असलेल्या कांदळवन क्षेत्रात होणारे मानवी अतिक्रमण रोखण्यासाठी महसूल विभागाने हे कांदळवन क्षेत्र वनविभागाकडे सुपूर्द करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने यापूर्वीच दिलेले आहेत. मात्र अद्याप हे कांदळवन क्षेत्र महसूल विभागाच्याच ताब्यात असल्याने मोठय़ा प्रमाणात या कांदळवनांवर भराव टाकण्याचे कृत्य काही भूमाफियांकडून सर्रासपणे होत आहेत.खाडी किनारच्या कांदळवनांवर होणाऱ्या अतिक्रमणाविषयी अनेक याचिका दाखल असूनही बांधकामांसाठी ठाणे महानगरपालिकेतर्फे परवानगी दिली जात असल्यास ठाणे शहराच्या पर्यावरणाच्या ऱ्हासाकडे आपण जात आहोत ही बाब लक्षात घ्यायला हवी.

स्वयंसेवी संस्थांचे योगदान

ठाणे शहराला लाभलेला पर्यावरणाचा हा वसा असाच टिकून राहावा, यासाठी ठाणे शहरातील अनेक पर्यावरण संस्था अभ्यासपूर्ण सहभाग नोंदवत आहेत. येऊरचे निसर्गसौंदर्य जपण्यासाठी प्रयत्नशील असणारी येऊर एन्व्हायर्नमेंटर सोसायटी, होप, वनशक्ती, हरियाली, फर्न, पर्यावरण दक्षता मंडळ अशा अनेक संस्थांतर्फे ठाणे शहराचे पर्यावरण सदाहरित ठेवण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबविले जातात. ठाणेकर असलेल्या प्रत्येक नागरिकांनी या संस्थांच्या बरोबरीने शहराचे पर्यावरण जपण्यासाठी प्रयत्न केल्यास पर्यावरण संवर्धनाचे मोठे कार्य घडेल. आजच्या पिढीसोबतच भावी पिढीलाही या शहराचे पर्यावरणाचे सौंदर्य अनुभवता येईल. या संस्थांच्या स्वयंसेवकांसोबतच पर्यावरणाविषयी आपुलकी मनात ठेवून पर्यावरण संवर्धनाच्या कार्यात तरुणही मोठय़ा संख्येने सहभागी झाले तर या शहराचे पर्यावरण अबाधित राहील.

कांदळवन टिकवणे गरजेचे

ठाणे खाडी किनारी लाभलेले कांदळवन हे या शहराच्या पर्यावरणात आणखी भर घालतात. पाण्यातील क्षारतेसमोर टिकाव धरत खाडी किनारपट्टय़ाचे रक्षण करण्याचे सामथ्र्य या कांदळवनांमध्ये असल्याने हे कांदळवन वर्षांनुवर्षे ठाणे खाडी किनारी तग धरून आहेत. मात्र गेल्या काही वर्षांत शहराच्या खाडी किनारी टाकण्यात येणारा मातीचा भराव या कांदळवनांचे आयुष्य संपवण्याच्या मार्गावर आहे. पर्यावरणाला सर्वार्थाने समृध्द करणाऱ्या आणि विशेषत: आपल्या गुणांमुळे खाडी किनारपट्टीचे रक्षण करणाऱ्या या कांदळवनांवर अशाच प्रकारे मानवी अतिक्रमण होत राहिले तर एक दिवस कांदळवनांची ही श्रीमंती संपुष्टात येईल आणि ठाणे शहराच्या पर्यावरणाच्या शिरपेचातील ही महत्त्वाची बाब नाहीशीच होईल, याचा गांभीर्याने विचार व्हायला हवा.