महामार्गावर कल्याण, पडघा, वासिंदजवळ ग्राहकांची फसवणूक

भगवान मंडलिक, कल्याण</strong>

मुंबई-नाशिक महामार्गावर भिवंडी वळण रस्ता, कल्याण पडघा नाका, वासिंद या भागात महामार्गाशेजारी कांदा विक्री करणारे टेम्पो उभे असतात. या टेम्पो चालकांकडून गोण्यांमध्ये सडका कांदा भरून तो ग्राहकांना विकला जात आहे.

या गोण्यांच्या वरच्या भागातील दोन थर चांगल्या कांद्यांचा आणि आतील थर सडक्या, नासक्या लहान कांद्यांनी लावलेले असतात. ग्राहक गोणीत चांगला कांदा आहे असा विचार करून कांदा घरी आणतो. तो कांदा मोकळ्या हवेत ठेवण्यासाठी घरात पसरला की त्यामधील बहुतांशी कांदा सडका, नासका असल्याचे ग्राहकांना आढळून येत आहे.

या प्रकरणाची शासनाच्या अन्न सुरक्षितता आणि दर्जा प्राधिकरणाकडे तक्रार करण्यात आली आहे.

गेली दोन आठवडे कांद्याचे भाव वाढल्याने स्वस्तात कांदा कोठे मिळतो का? याचा शोध ग्राहक घेत आहे. गेल्या काही दिवसांपासून भिवंडी-नाशिक महामार्गावर मोठय़ा प्रमाणावर कांदा विक्रेत्यांची रीघ लागली आहे. नाशिक येथील लासलगाव भागातून थेट कांदा आणून स्वस्त दरात विक्री केला जात असल्याचे या ठिकाणी भासविले जात असले तरी या माध्यमातून शेकडो ग्राहकांची फसवणूक सुरू आहे.

काही दिवसांपूर्वी भिवंडी जवळील तुळशी गावातील दिनेश बेलकरे या रहिवाशाने पडघा येथे उभ्या असलेल्या टेम्पो व्यापाऱ्याकडून ५० रुपये किलो दराने २० किलो कांदा खरेदी केला. बेलकरे यांनी गोणीत भरलेल्या कांद्याच्या प्रतवारीविषयी व्यापाऱ्याला विचारले असता त्यांना चांगला लालभडक कांदा वानगीदाखल दाखविण्यात आला. दर्जेदार कांदा दिसत असल्याने दिनेश यांनी एक हजार रुपयांचा कांदा खरेदी केला. काही ग्राहकांनी घरी गेल्यानंतर गोणीतील कांदा नंतर उघडू असा विचार करून गोणी अशीच ठेवली. घरात दोन दिवसांत कांदा कुजल्याची दुर्गंधी येऊ लागली. त्यांनी गोणी उघडली तर वरच्या भागात चांगले कांदे आणि पोट, तळ भागात लहान सडका, माती लागलेला कांदा भरला असल्याचे रहिवाशांना आढळले.

नाशिक, लासलगाव भागातील काही व्यापारी लबाडी करून ठाणे जिल्ह्यात येऊन रस्त्याच्या कडेला कांद्याचा टेम्पो लावून कांदा विक्री करीत आहेत. रास्त दरात कांदा मिळत असल्याने टेम्पोतील कांदा हातोहात संपत असल्याचे या भागातील रहिवाशांनी सांगितले. आपण ग्राहकांची फसवणूक केली आहे याची जाणीव असल्यामुळे हे कांदा विक्रेते दुसऱ्या दिवशी या भागात फिरकत नाहीत. अनेक फसवणूक झालेले ग्राहक त्यांच्या शोधात आहेत. कांदा काढताना शेतात राहिलेला, खळ्यावर पडलेला सडका कांदा ग्राहकांच्या गळ्यात मारला जात आहे, अशी माहिती ग्राहकांना मिळाली आहे.