• वामन देशपांडे, ज्येष्ठ लेखक व संत साहित्याचे अभ्यासक

गेली ५५ वर्षे कथा, कादंबऱ्या, समीक्षा, भावगीते, भक्तिगीते, संत साहित्य अशा विविध विषयांवर विपुल लेखन करणारे डोंबिवलीतील ज्येष्ठ लेखक वामन देशपांडे यांची आतापर्यंत १०९ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. गेली २५ वर्षे विविध ठिकाणी भरणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये एक रसिक वाचक म्हणून त्यांनी हजेरी लावली. काही ठिकाणी स्मरणिका व अन्य उपक्रमांमध्ये सामील होऊन साहित्याचा वारकरी म्हणून तेथील विचार लुटले. डोंबिवलीत सुरू झालेल्या ९०व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनानिमित्त त्यांच्याशी साधलेला संवाद.. 

पूर्वी साहित्य संमेलन म्हटले की वातावरण अगदी भारून जायचे..

In Karveer taluka relatives were shocked to find another dead body in the crematorium instead of the original person
मूळ व्यक्ती ऐवजी दुसराच मृतदेह; स्मशानभूमीत पोहोचलेल्या नातेवाईकांना धक्का
ajit pawar and yugendra pawar and sharad pawar
‘अजित पवारांचं बंड कुटुंबातील सर्वांनाच आवडलेलं नाही,’ युगेंद्र पवारांचं विधान; म्हणाले, “कुटुंबात…”
Rajendra Pawar vs Ajit Pawar
“..आणि तेव्हापासून पवार कुटुंबीयात दुरावा निर्माण झाला”, बारामतीमध्ये निनावी पत्र व्हायरल; राजेंद्र पवार म्हणाले…
Raj thackeray target to sankarshan karhade over calling nickname
भर कार्यक्रमात राज ठाकरेंनी संकर्षण कऱ्हाडेचे कान टोचले, म्हणाले, “त्या दिवशी मी नाट्य संमेलनामध्ये…”

साहित्य संमेलन हे वाचकांचे संमेलन आहे, साहित्यिकांचे नाही. साहित्यविश्वात वाचकाचे स्थान खूप मोठे आहे. यापूर्वी तुल्यबळ लेखक, साहित्यिक कसदार लेखन करून ती शिदोरी वाचकांसाठी उपलब्ध करून देत होते. त्या साहित्य शिदोरीवर दर्दी रसिक वाचक तेवढय़ाच त्वेषाने तुटून पडत होते. मी संपूर्ण ‘पुलं’, ‘जीए’ वाचले. यांसह अनेक साहित्यिकांचे संग्रह वाचले, असे सांगण्याची एक स्पर्धा वाचकांमध्ये लागत होती. अनुभवविश्वातून कल्पकतेने मांडलेले कसदार साहित्य आपल्या ओंजळीत घेण्याची ताकद वाचकाची होती. साहित्यिकाने मांडलेले विचार वाचकाने वाचून काढल्यानंतर दोघांमध्ये प्रत्यक्ष संवाद नसला तरी, त्या लेखनाच्या माध्यमातून संवादाचे एक माध्यम तयार व्हायचे. कसदार साहित्य वाचन केलेली रसिक वाचक मंडळी आपल्या लेखक, साहित्यिकाला भेटण्यासाठी, त्याचे विचार ऐकण्यासाठी आसुसलेली असायची. साहित्य संमेलन हे विचारांचे आदानप्रदान, साहित्य सारस्वतांच्या भेटीगाठीचे एकमेव ठिकाण होते. त्यामुळे दिग्गज साहित्यिक या व्यासपीठावरून आपले विचार मांडत. वाचक ते विचार ऐकण्यास उत्सुक असायचे. त्यामुळेच पूर्वीची साहित्य संमेलने ही फक्त रसिक वाचक आणि साहित्यिक, लेखक, कवी मंडळींनी गजबजून गेलेली असायची.

साहित्याचा कस कमी होतोय, असे वाटते का?

यापूर्वी वाचन ही प्रत्येक व्यक्तीची विलक्षण भूक होती. वाचनावर लोक देवासारखे प्रेम करायचे. साहित्यिक, लेखक आपण ज्या रसिक वाचकासमोर जाणार आहोत, तो दर्दी असल्याने तेवढय़ा ताकदीचे लेखन साहित्य वाचकांसमोर आपल्या साहित्यामधून ठेवत होते. या लिखाणामध्ये कुठेही त्रुटी राहू नये म्हणून त्या वेळी साहित्यिक आणि वाचक यांच्यामध्ये प्रकाशक, तेथील संपादक हा एक मध्यबिंदू म्हणून उत्तमरीतीने काम पाहत होता. एखाद्या लेखकाने मासिकात, प्रकाशकाकडे आपले साहित्य, लेखन दिले तर त्या लिखाणाला जोजावणारी, त्यामधील वाङ्मयीन जाणिवा फुलविणारी राम पटवर्धन, श्री. पु. भागवत यांच्यासारखी श्रेष्ठ संपादक मंडळी होती. लेखनातील त्रुटी नेमक्या काढून लेखकाचे साहित्य अधिक उजवे, कसदार होईल याकडे त्यांचा कल होता. या प्रक्रियेमुळे वाङ्मयीन मूल्य असलेल्या लेखकाची प्रतिभा फुलविणारे कसदार साहित्य वाचकांसमोर जात होते. त्याचबरोबर या लिखाणातून एक नवलेखक घडत गेला. संपादक, प्रकाशक हे लेखकाचे दोन पंख आहेत. आता लेखन साहित्य सजविणारा, फुलविणारा श्रेष्ठ संपादक क्वचित राहिला आहे. ज्यांनी केशवसुत, मर्ढेकर, सुर्वे, पाडगावकर यांच्या प्रतिभेचा अनुभव घेतला आहे, ते वाचक आताच्या लिखाणाकडे किती वळतील, हा प्रश्न आहे.

संमेलनाबाबत समाजात उदासीनता आहे असे वाटते का?

साहित्यिक, लेखक, समीक्षक, कवी या साहित्यविश्वाने २०वे शतक भारून गेले होते. या काळात वाचकांनी साहित्यिकांची युगे पाहिली. ‘किलरेस्कर’, ‘हंस’, ‘सत्यकथा’, ‘मौज’ या मासिकांनी वाचकांची वाचनाची भूक वाढविली. या साहित्य व्यवहारात लेखक वाचकांचे एक दृढ असे नाते निर्माण झाले. चित्र हे साहित्याचा भाग आहे. चित्र कसे वाचावे या मासिकांच्या संपादकांनी शिकवले. डोंबिवलीच्या संमेलनात ज्येष्ठ चित्रकार बाळ ठाकूर यांचा प्रथमच सन्मान होतोय ही आनंदाची घटना आहे. म्हणजे लेखनविश्वाबरोबर साहित्यात चित्राचे महत्त्व पटवून देणारे संपादक त्या वेळी होते. आता साहित्यविश्व फुलविणारी मराठी भाषा मागे पडली. २१वे शतक इंग्रजी शिक्षण, माहिती तंत्रज्ञान, सॉफ्टवेअर, समाजमाध्यम यांचे युग मानले जात आहे. माहितीपर, ज्ञानात भर घालणाऱ्या प्रॅक्टिकल प्रवाहाच्या मागे समाज धावत आहे.

संमेलनातील राजकीय राजकारण वाढण्याचे कारण?

साहित्य विचारांचा उत्सव करण्यापेक्षा भव्य भपकेबाजपणाकडे संमेलने वळू लागली आहेत. भव्यतेमुळे संबंध थेट अर्थकारणाशी येऊ लागला. अर्थकारण आले की तिथे राजकारण आले. जो मोठा देणगीदार त्यांचा संमेलनावर पगडा. साहित्यविश्वाशी संबंधित नसलेले फक्त संमेलनाच्या भपकेबाजपणात अडकून पडतात. या ठिकाणी लेखन, साहित्य, साहित्यिक विचार मागे पडतो. हे चित्र संमेलनाला साहित्य प्रेमाचा वारकरी म्हणून येणाऱ्या विचारी वाचकाला अस्वस्थ करते. यामध्ये संमेलन संयोजक, समाज, साहित्यिक यांचा दोष आहे, असेही म्हणता येणार नाही. कारण सगळे वातावरण आणि परिस्थितीच तशी बदलली आहे.

संमेलन कसे असावे असे वाटते?

संमेलने साधी असावीत. त्यात भपकेबाजपणा नसावा. त्यामुळे खर्चासाठी मिनतवाऱ्या कराव्या लागणार नाहीत. फार प्रायोजक असले की त्याआडून येणारी उपकाराची ओझी कमी होतील आणि लेखक विचारवंतांना मोकळेपणाने आपले विचार मांडता येतील. लेखक मानधनाची अपेक्षा करणार नाहीत. भोजनावळींपेक्षा तिथे विचारयज्ञच मोठय़ा प्रमाणात होतील. कविवर्य भा. रा. तांबे यांच्या कवितेमधून बोलायचे तर  ‘पहा पांखरे चरोनि होती झाडावर गोळा, कुठें बुडाला पलीकडिल तो सोन्याचा गोळा?’ अशा निरागस वातावरणातील संमेलने आपण भरवू शकलो तरच साहित्य व्यवहारात वाढ झाली असे म्हणता येईल.

साहित्य संमेलन हा फक्त रसिक वाचक आणि साहित्यिक यांचा उत्सव आहे. आदर्श संमेलनाध्यक्ष, रसिकमान्य वाचक-साहित्यिक, वाचकांना हवाहवासा वाटणारा संमेलनाचा अध्यक्ष या त्रिवेणी संगमावर यापूर्वीची साहित्य संमेलने साधेपणाने आयोजित केली जात होती. साहित्याने ओथंबलेला संमेलनाध्यक्ष काय बोलतोय, कोणता विचार मांडतोय या एकमेव केंद्रबिंदूकडे लक्ष ठेवून लेखक, साहित्यिक, कवी संमेलनाच्या ठिकाणी यायचा. तिथे राजकारणाची थोडीशीही झुळुक नसल्यामुळे एका वेगळ्या उंचीवर साहित्याचा तो उत्सव जायचा. आता साहित्य संमेलनात राजकीय लुडबुड वाढली आहे.