लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार; आरोपीला अटक
मोबाइलवर अनेकदा राँग नंबर येत असतात. त्याकडे आपण दुर्लक्ष करत असतो. पण नालासोपाऱ्यात राहणाऱ्या एका तरुणीचे आयुष्य राँग नंबरमुळेच उद्ध्वस्त झाले आहे. धारावी येथे राहणाऱ्या अनोळखी तरुणाने केलेल्या राँग नंबरवर सातत्याने संभाषण केल्याने या तरुणीने त्याच्याशी मैत्री केली होती. पण या तरुणाने लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केला आणि पसार झाला.
नेहा दुबे (नावात बदल) ही नालासोपाऱ्याच्या ओस्वाल नगरीत राहणारी तरुणी. काही दिवसांपूर्वी नेहाला तिच्या मोबाइलवर अनोळखी क्रमांकाने एक फोन आला. तो राँग नंबर होता. शब्बीर हुसेन (२२) या तरुणाने हा कॉल केला होता; परंतु त्याने नेहाला बोलण्यात गुंतवले. नेहाने त्या अनोळखी तरुणाच्या बोलण्यात गुंतली आणि स्वत:ची माहिती दिली. शब्बीरने नंतर या तरुणीशी गोड बोलून मैत्री वाढवली. दरम्यान शब्बीर आणि नेहाचे प्रेम जुळले आणि शब्बीरने नेहाला लग्नाचे आमिष दाखवले. शब्बीर हा धारावी येथे राहत होता. नेहा बहिणीसोबत राहत होती. तिची बहीण गावी गेल्यांतर ती घरात एकटीच असायची. त्या वेळी शब्बीर तिच्या घरी यायचा. लग्नाचे आमिष दाखवून तो तिच्याशी शरीरसंबंध ठेवू लागला. दरम्यान, नेहा गर्भवती राहिल्यानंतर शब्बीर पळून गेला आणि त्याने नेहाशी संपर्क तोडला. याबाबत नेहाच्या बहिणीला समजल्यानंतर तिने तुळींज पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली. पोलिसांनी धारावीत राहणाऱ्या शब्बीरला अटक केली. त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 19, 2015 2:17 am