जनजागृतीसाठी काढलेल्या पत्रकावर नाराजी

हवामान खात्याने ९ ते ११ दरम्यान अतिवृष्टी होणार असल्याचा इशारा दिल्याने वसई-विरार महापालिकेनेही नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती होण्यासाठी विशेष पत्रके काढली. मात्र या पत्रकावरील आपत्ती व्यवस्थापनाचा टोल फ्री क्रमांक अवैध असल्याचे निदर्शनास आले आहे. या क्रमांकावरून संपर्क होत नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.

९ ते ११ जून दरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे नागरिकांनी गरज नसताना घराबाहेर न पाडण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे, तर दुसरीकडे पालिकेने आपली आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवली आहे. महापालिकेने शहरात आपत्कालीन यंत्रणेला सामोरे जाण्यासाठी ठिकठिकाणी कक्ष उघडले आहेत. यंत्रणेने मान्सूनपूर्व संपूर्ण तयारी केली असून दिवाणमान येथे असणारे मुख्य केंद्र २४ तास खुले ठेवण्यात आले आहे, तसेच जनजागृतीपर पत्रकेही वाटली आहेत. ही पत्रके शहरात जागोजागी लावण्यात आली आहेत,

तसेच समाजमाध्यमांवरही प्रसारित करण्यात आली आहे. या पत्रकात आपत्कालीन परिस्थिती असल्यास १०७७ या जिल्हा टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. मात्र या क्रमांकावर संपर्क साधला असता हा वैध नसल्याचे किंवा उपलब्ध नसल्याच्या सूचना मिळत आहेत, तर काही वेळा हा क्रमांक लागत आहे, मात्र नांदेड जिल्ह्यात संपर्क

होत आहे, असे काही नागरिकांनी सांगितले. या पत्रकामुळे पालिकेचा ढिसाळ कारभार समोर आला असून या पत्रकात तात्काळ सुधारणा करावी आणि नागरिकांपर्यंत योग्य तो क्रमांक पोहोचवण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

याबाबत अग्निशमन अधिकारी दिलीप पालव तसेच आयुक्त सतीश लोखंडे यांच्याशी संपर्क साधले असता संपर्क होऊ  शकला नाही. सभापती भरत गुप्ता यांच्याशी संपर्क साधला असता ते प्रवासात असल्याने त्यांनी दिलीप पालव यांच्याशी बोलण्यास सांगितले.

आपत्ती व्यवस्थापन केंद्राचा वैध क्रमांक

  • +९१२५०२३३४५४६
  • +९१२५०२३३४५४७