ज्येष्ठ संशोधक व पुरातत्त्व इतिहासाचे तज्ज्ञ डॉ. यशवंत रायकर यांचे वृद्धापकाळाने शनिवारी सकाळी ठाण्यातील वेदान्त हॉस्पिटलमध्ये निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते. डॉ. रायकर यांच्या पश्चात मुलगी सुमेधा रायकर-म्हात्रे, मुलगा सुधीर, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर ठाण्यातील विद्युतदाहिनीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
केंद्राच्या पुरातत्त्व खात्यात संशोधन म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. रायकर यांनी अरुणाचल प्रदेश व अंदमान येथे उत्खनन करीत विपुल संशोधन केले. अरुणाचल प्रदेशातील संशोधन कार्याबद्दल त्यांना आसामच्या राज्यपालांनी सुवर्णपदक देऊन गौरविले होते. केंद्र शासनाच्या नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी मुंबईतील नेहरू सेंटरमध्ये ज्येष्ठ संशोधक म्हणून काम पाहिले होते. येथे ‘भारत एक शोध’ या प्रकल्पाच्या स्थायी प्रदर्शनाच्या त्यांनी केलेल्या आराखडय़ाचे खूप कौतुक करण्यात आले होते. त्यांच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे नंतरच्या काळात अनेकांना व विशेषत: तरुणांना भारताच्या निर्मितीची गाथा समजून घेता आली. त्यांच्या मुंबईवरील मुंबई- ज्ञात व अज्ञात, दामू देवबाग्याची दुनिया, अथातो ज्ञानजिज्ञासा (भाग १ व २), अथातो धर्मजिज्ञासा आदी ग्रंथसंपदा प्रकाशित झाली आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 16, 2015 7:24 am