मराठी भावसंगीत परंपरेत स्वतंत्र शैली निर्माण करणारे ज्येष्ठ संगीतकार-गीतकार यशवंत देव यांच्या चरित्रग्रंथाचे प्रकाशन येत्या ७ जून रोजी ठाण्यात होत आहे. यानिमित्ताने सध्या वृद्धापकाळामुळे सार्वजनिक समारंभ टाळणाऱ्या देवांचे दर्शन घडण्याचा दुर्लभ योग ठाणेकरांसाठी जुळून आला आहे.     शब्द आणि सुरांवर सारखेच प्रभुत्व असणाऱ्या यशवंत देव यांची ‘या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे’, ‘जीवनात ही घडी अशीच राहु दे’, ‘तेच स्वप्न लोचनात रोज रोज अंकुरे’, ‘स्वर आले दुरूनी’, ‘कोटी कोटी रूपे तुझी’, ‘भेट तुझी माझी स्मरते’ आदी अनेक गीते अजरामर ठरली आहेत. त्या सर्व आठवणींना या चरित्रग्रंथ प्रकाशनाच्या निमित्ताने उजाळा मिळणार आहे. अशोक चिटणीस यांनी लिहिलेले त्यांचे हे चरित्र नवचैतन्य प्रकाशनाच्या वतीने प्रकाशित केले जाणार आहे. आकाशवाणीवरील नोकरी, तिथे जमलेले गणगोत, अनेक गाजलेल्या गाण्यांच्या हकिकती, पुनर्विवाह करून लगेच ओशो रजनीश यांच्या प्रभावाखाली येत घेतलेला संन्यास आदी देवांच्या आयुष्यातील अनेक घटनांचा परार्मश या चरित्रात घेण्यात
आला आहे.
दिग्गजांच्या उपस्थितीत ‘देवगाणी’
मुग्धा चिटणीस-घोडके कला सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने मुग्धा चिटणीस यांच्या स्मृतिदिनानिमित्त सहयोग मंदिर सभागृहात संध्याकाळी आयोजित या समारंभास ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक, शिक्षणमंत्री विनोद तावडे, डॉ. विनोद इंगळहळ्ळीकर आणि डॉ. विद्याधर विशेष पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्यात पद्मजा फेणाणी जोगळेकर,
योजना शिवानंद आणि अनुजा वर्तक ‘देवगाणी’ सादर करणार आहेत.
असाही एक योग    
या सोहळ्याच्या निमित्ताने अशोक चिटणीस यांनी त्यांच्या महाविद्यालयीन जीवनात लिहिलेल्या ‘पंखामधले गीत संपले’ या कादंबरीच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन होणार आहे. डायरी पद्धतीने लिहिलेली मराठीतील ही पहिली कादंबरी. १९६४ मध्ये मॅजेस्टिकने घेतलेल्या स्पर्धेत ही कादंबरी उत्तेजनार्थ ठरली होती. या स्पर्धेत जयवंत दळवी यांच्या ‘चक्र’ कादंबरीस पहिले, मनोहर तल्हार यांच्या ‘माणूस’ला दुसरे, तर मधु मंगेश कर्णिकांच्या ‘देवकी’ला तिसरे पारितोषिक मिळाले होते.