प्रवेशशुल्काची कठोर अंमलबजावणी करणार; रात्री ११ ते पहाटे पाचपर्यंत केवळ ग्रामस्थांनाच प्रवेश

ठाणे : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या येऊर वनपरिक्षेत्रातील मनुष्यविहारावर नियंत्रण आणण्यासाठी वन प्रशासनाने प्रभात फेरीसाठी नागरिकांकडून शुल्कवसुली करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच रात्री ११ ते पहाटे ५ वाजेपर्यंत गावकऱ्यांव्यतिरिक्त इतर नागरिकांना येऊरमध्ये प्रवेश बंदी असणार आहे.

प्रभातफेरीसाठी तसेच पर्यटनासाठी येणाऱ्या नागिरकांकडून वन्यप्राण्यांना धोका निर्माण होऊ नये याकरिता  नियमाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती येऊर वनपरिक्षेत्राचे अधिकारी राजेंद्र पवार यांनी दिली.

प्रभातफेरीसाठी दररोज येऊर परिसरात जाणाऱ्या नागरिकांच्या संख्या ही मोठी आहे. सकाळी ५ ते ९ वाजेपर्यंत या ठिकाणी वाहनांसह नागरिकांची मोठी वर्दळ असते. मात्र   प्रभात फेरीसाठी येणारे नागरिक हे रस्त्यांऐवजी जंगलात दूरवर जातात. अनेकदा वन्यप्राण्यांचा अधिवास असणाऱ्या क्षेत्रातही नागरिक प्रवेश करू लागले आहेत. गेल्या आठवडय़ात बुधवारी पहाटे येऊर येथील उद्यानात प्रभात फेरीसाठी गेलेल्या नागरिकांना हवाई दलाच्या उपकेंद्राजवळ नर बिबटय़ाचे १० ते १५ दिवसांचे पिल्लू आढळून आले होते. प्रभात फेरीसाठी गेलेल्या नागरिकांच्या वर्दळीमुळे पिल्लांना घेऊन जाणारी मादी बिबटय़ा घाबरली असेल आणि या गोंधळात पिल्लू मागे राहिले असेल, अशी शक्यता वर्तवण्यात आली होती.

या घटनांच्या पार्श्वभूमीवर येऊरमध्ये प्रभात फेरीसाठी तसेच पर्यटनासाठी येणाऱ्या नागरिकांकडून वन्यप्राण्यांना धोका निर्माण होऊ नये याकरिता संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या येऊर वनपरिक्षेत्र प्रशासनाकडून कडक पावले उचलण्यात आली आहेत. सकाळी ५ ते ८ या वेळेत प्रभात फेरीसाठी येणाऱ्या नागरिकांकडे मासिक पास असला तरच येऊरमध्ये प्रवेश देण्यात येणार आहे. रात्री ११ ते पहाटे ५ वाजेपर्यंत गावकरी तसेच बंगलेधारकांव्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीला येऊरमध्ये प्रवेश देण्यात येणार नसल्याचे येऊर वन प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. मासिक पास नसलेला व्यक्ती जंगलात दूरवर गेल्याचे आढळल्यास अशा व्यक्तीवर कारवाई करण्यात येईल.

३१ डिसेंबरलाही हाच नियम

नववर्ष स्वागतानिमित्त पूर्वसंध्येला रात्री येऊरमधील बंगले तसेच हॉटेलांमध्ये पाटर्य़ासाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या अधिक असते. मात्र येत्या दोन आठवडय़ांवर येऊर ठेपलेल्या नववर्ष स्वागतानिमित्तसुद्धा रात्री ११ ते पहाटे ५ पर्यंत प्रवेश बंदीचा नियम लागू राहणार असल्याचे येऊर वन प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

यापूर्वीदेखील शासनाच्या अध्यादेशानुसार हा नियम लागू होता, मात्र पर्यटक हे वन्यप्राणी परिक्षेत्रात अधिकाधिक प्रवेश करू लागल्याने तसेच वन्यप्राण्यांसाठी धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने खबरदारी म्हणून या अध्यादेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

– राजेंद्र पवार, येऊर वनपरिक्षेत्र अधिकारी, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान

प्रवेश शुल्क 

* प्रभातफेरी

ज्येष्ठ नागरिक (वार्षिक पास)- २३ रु.

इतर नागरिक (मासिक पास)- ५० रु.

इतर नागरिक (वर्षिक पास )- १९५ रु.

* हलकी वाहने- १९५ रु.

* अवजड वाहने- २९३ रु.

* दुचाकी-       ५० रु.