News Flash

अतिरिक्त भिंतीमुळे येऊरच्या जंगलात ‘प्रवेशबंदी’?

ठाणे शहराला लाभलेल्या येऊरच्या निसर्गसौंदर्यामुळे पर्यटकांचा ओढा कायम येऊरच्या जंगलाकडे असतो.

अतिरिक्त भिंतीमुळे येऊरच्या जंगलात ‘प्रवेशबंदी’?

वनविभागाच्या निर्णयाचा आदिवासी, निसर्गमित्रांना फटका

वन्यजीव आणि मानवी वसाहत यांच्यातील संघर्ष टाळण्यासाठी वन विभाग आणि पर्यावरण संस्थांकडून येऊर परिसरात निरनिराळ्या उपाययोजना वेळोवेळी राबविण्यात येतात. त्याचाच एक भाग म्हणून सध्या अतिरिक्त संरक्षक भिंत उभारली जात आहे. वनविभागाच्या हद्दीत येऊर गावाच्या सीमेवर पूर्वी संरक्षक भिंत बांधण्यात आलेली आहे. आता सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे आणखी एक हजार मीटर भिंत बांधण्याच्या कामाला वनविभागानेमंजुरी दिली आहे. त्यानुसार येऊरच्या जंगलात एअर फोर्सजवळ ही संरक्षक भिंत बांधण्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र येऊरच्या जंगलात असलेल्या जैवविविधतेचा अभ्यास करण्यासाठी येणारे निसर्गमित्र आणि स्थानिक आदिवासींची त्यामुळे मोठी पंचाईत होणार आहे. त्यांनाही जंगलात प्रवेश करता येणार नाही. त्यामुळे मर्यादित वेळेत जंगलात प्रवेश मिळावा, अशी निसर्गमित्र आणि आदिवासींची मागणी आहे.

ठाणे शहराला लाभलेल्या येऊरच्या निसर्गसौंदर्यामुळे पर्यटकांचा ओढा कायम येऊरच्या जंगलाकडे असतो. येऊरला लागूनच पाटोणापाडा, वनीपाडा, जांभूळपाडा अशा भागात आदिवासी नागरिकांची वस्ती आहे. जंगलात आढळणाऱ्या वस्तूंवर आदिवासींची उपजीविका अवलंबून असल्याने त्यांना रोज जंगलात जावे लागते. काही पर्यटकही पर्यावरणाची तमा न बाळगता बिनदिक्कत येऊरच्या जंगलात प्रवेश करतात. त्यामुळे गेल्या काही वर्षांत येऊरच्या जंगलात मानवी हस्तक्षेपाचे प्रमाण वाढलेले दिसते. नागरिक राजरोसरीत्या जंगलात प्रवेश करत असल्यामुळे नागरिकांना अडवणे वनविभागाच्या दृष्टीने कठीण जाते. या पाश्र्वभूमीवर काही वर्षांपूर्वी येऊरच्या सीमेवर १४०० मीटर लांबीची भिंत बांधण्यात आली आहे. आता  उर्वरित हजार मीटर वाढीव भिंत बांधण्याची परवानगी वनविभागातर्फे देण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे एअरफोर्सजवळ ही संरक्षक भिंत बांधण्याचे काम सुरू आहे. हजार मीटर भिंतीपैकी ४३४ मीटर भिंतीचे बांधकाम पूर्ण झाल्याचे परिक्षेत्र वनअधिकारी संजय वाघमोडे यांनी सांगितले. अडीच मीटर उंचीची संरक्षक भिंत येऊर गावाच्या वेशीवर बांधण्यात येत आहे. या संरक्षक भिंतीवर पाच लोखंडी कठीण तारा बसवण्यात येत असल्याने जंगलात प्रवेश करणे कठीण जाईल. वनांची हद्द निश्चित करण्यासाठी तसेच नागरिक- वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी ही संरक्षक भिंत महत्त्वाची असल्याचे वनविभागातर्फे सांगण्यात येत आहे. जुनी संरक्षक भिंत बांधल्यानंतर जंगलात होणाऱ्या दारू भट्टय़ांना आळा बसल्याचे पर्यावरण संस्था आणि वनविभागानेही मान्य केले आहे.

सकाळी आठ ते संध्याकाळी सहा मुभा असावी

येऊरचे जंगल जैवविविधतेसाठी पोषक आहे. जंगलात अनेक निसर्गमित्र जात असतात. संरक्षक भिंत बांधल्यावर त्यांना जंगलात प्रवेश करता येणार नाही. त्यामुळे त्यांच्यामध्ये नाराजी आहे. आदिवासी नागरिकही वनौपजावर अवलंबून असतात. त्यामुळे सकाळी आठ ते सायंकाळी पाच या वेळेत संरक्षक भिंतीचे प्रवेशद्वार खुले ठेवावे

– रोहित जोशी, संयोजक, येऊर एन्व्हायर्न्मेंटल सोसायटी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 31, 2016 3:35 am

Web Title: yeoor forest entry close due to the additional walls
Next Stories
1 शिवसेनेचे ‘सुधारणा’कार्ड
2 रस्त्यासाठी चाळींवर हातोडा, बंगल्यांना अभय
3 ब्रिटिशकालीन तिजोरीत चांदीची नाणी
Just Now!
X