News Flash

सहज सफर मामा-भाचा डोंगरावरील वनसफर!

ऊरच्या दक्षिणेकडे उंच डोंगर माथ्यावर मामा-भाचा दर्गा आहे.

मामा-भाचा डोंगरावरून दिसणारे ठाणे शहराचे विहंगम दृश्य. 

येऊरचे घनदाट जंगल म्हणजे ठाणे शहराचे वैभव! मुंबई आणि ठाणे शहराच्या मधोमध असलेल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा भाग असलेल्या येऊरने ठाणे शहराला विपुल वनसंपत्ती बहाल केली. त्यासोबत शुद्ध निरोगी हवा आणि हिरवेगार सौंदर्यही. याच येऊरच्या दक्षिणेकडे उंच डोंगर माथ्यावर मामा-भाचा दर्गा आहे. उंचावरील हा दर्गा पाहणे आणि तेथील निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेणे हे खरे तर जिकिरीचे काम.. पण डोंगर-दऱ्याची आवड असणाऱ्यांना आणि ठाण्याचे विलोभनीय विहंगम दृश्य डोळ्यात साठवायचे असेल, तर मामा-भाचा डोंगरांशिवाय दुसरा पर्याय नाही.

ठाण्याच्या वागळे इस्टेट-लोकमान्य नगर परिसरात जो उंच डोंगर दिसतो, तोच मामा-भाचा डोंगर. या डोंगरावर हजरत सय्यद बहाउद्दीन आणि हजरत सय्यद बद्रुद्दीन या मामा-भाच्यांचे दर्गे आहेत. हे मामा-भाचे सुफी पंथाचे होते आणि त्यांनी या डोंगरमाथ्यावर समाधी घेतली, असा तुटक इतिहास आहे. मात्र ते केव्हा आणि कसे आले याबाबत कोणतीही माहिती उपलब्ध नाही.

लोकमान्य नगरमध्ये एका बाजूला या डोंगरावर जाणारी वाट आहे. या वाटेत आधी सागाचे जंगल लागते, त्यानंतर मातीच्या व दगडांच्या कच्च्या पायऱ्यांचा रस्ता लागतो. या स्थळाला पर्यटनस्थळाचा दर्जा मिळावा यासाठी ‘मामा-भाँजा दर्गा ट्रस्ट’ स्थापन करण्यात आली असून येथील विकासासाठी या ट्रस्टचे कार्यकर्ते झटत असतात. त्यांनीच या पायऱ्यांची निर्मिती केली. या पायऱ्या चढताना आणि डोंगरातील व घनदाट जंगलातील ही वाट चालताना प्रचंड थकवा येतो, पण एकदा माथ्यावर पोहोचलात तर हा थकवा दूर पळून जातो.

या वाटेत मध्ये मस्तान दरबार लागतो. तिथेच बाजूला मोमीन मोईऊद्दीन आणि हजरत हाजी अमानुल्ला शाहसाहेब यांचा दर्गा आहे. या दोन्ही दग्र्याची निगा राखण्याचे काम मस्तान बाबा करत असतात. तिथे छोटेसे घर असून आराम करण्यासाठी व्यवस्था करण्यात आलेली आहे. येथे काही वेळ आराम करून आणि फक्कड कोरा चहा प्राशन करून पुढील प्रवासाला लागावे. पुढे पायऱ्या-पायऱ्यांचा वळणाचा रस्ता आहे. तब्बल ४०० मीटर वर चढून आल्यावर मामा-भाचा दग्र्याचे मुख्य प्रवेशद्वार लागते. त्याच्या दोन बाजूंना दोन टेकडय़ा आहेत. उजव्या बाजूवरील उंच टेकडीवर मामा यांचा दर्गा आहे, तर डाव्या बाजूला भाचा दर्गा आहे. या दोन्ही दग्र्यावर जाण्यासाठी ट्रस्टने विशेष सोय केली आहे. उंचावरील मार्मा दग्र्यावर गेल्यावर अंगाला झोंबणारा सोसाटय़ाचा वारा लागतो. दोन्ही दग्र्यावरून ठाणे शहराचे विलोभनीय विहंगम दृश्य मन प्रसन्न करतेच पण देहभानही विसरायला लावते. उंच-उंच इमारती, काही चाळी, मैदाने, तलाव.. संपूर्ण ठाणे शहराचेच दर्शन या टेकडीवरून होते. नवी मुंबई, मुलुंड परिसर आणि ठाणे खाडी आदी नजाराही येथे डोळ्यात साठवता येतो. भाचा दग्र्याच्या मागच्या बाजूस डोंगराच्या रांगा दिसतात. याच डोंगरांमधून डोकावणारा तुळशी तलावही आपले हलकेसे दर्शन देतो.

घनदाट जंगल आणि उंच माथ्यावरील या परिसरात फेरफटका मारायला आणि मामा-भाचा दग्र्याचे दर्शन घ्यायला सर्व जाती-धर्माचे लोक येतात. ट्रेकर्सचे तर हे आवडते ठिकाण आहे. मात्र हे धार्मिक स्थळ असल्याने काही नियम पाळावे लागतात, असे ट्रस्टचे सदस्य अमित जाधव यांनी सांगितले. जंगलात वन्यप्राण्यांचा वावर असल्याने संध्याकाळी सहानंतर येथे येण्यास मनाई आहे. संध्याकाळनंतर बिबटे, वानर काही पक्षी येथे दर्शन देतात, असे ट्रस्टच्या सदस्यांनी सांगितले.  निसर्गसौंदर्य अनुभवयाचे असेल, तर मामा-भाचा डोंगराला अवश्य भेट दिली पाहिजे.

मामा-भाचा डोंगर, ठाणे

कसे जाल?

  • ठाण्याहून लोकमान्य नगरला जाण्यासाठी रिक्षा, टीएमटीच्या बस मिळतात. येथूनच या डोंगरावर जाण्यासाठी वाट आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 2, 2016 1:41 am

Web Title: yeoor forest the glory of thane
टॅग : Thane
Next Stories
1 ठाण्यात क्लस्टरला मंजुरी.. मीरा-भाईंदरला का नाही?
2 मराठीच्या परीक्षेत ६१ रिक्षाचालक नापास!
3 पाणजू दुर्घटनाप्रकरणी गुन्हा दाखल नाही
Just Now!
X