चार महिने उलटूनही संरक्षक भिंत न बांधल्यामुळे दुर्घटनेची भीती; महापालिका, वन विभागाचे दुर्लक्ष

ठाण्यात निसर्ग पर्यटनासाठी कायम आकर्षण ठरलेल्या येऊर येथील तलावाला संरक्षक भिंत नसल्याने पर्यटकांसाठी येऊरचे पर्यटन धोक्याचे ठरू लागले आहे. पर्यटन विकासाचा आराखडा आखत मध्यंतरी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे मुख्य वनसंरक्षक विकास गुप्ता आणि ठाणे महानगरपालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी एकत्रितपणे केलेल्या दौऱ्यात एअर फोर्स तलावाचे सुशोभीकरण करण्याचे आणि संरक्षक कठडा बांधण्याचे निश्चित केले होते. मात्र अनेक महिने उलटूनही जयस्वाल यांच्या घोषणेतील संरक्षक भिंत अजूनही प्रत्यक्षात उतरलेली नाही. परिणामी पर्यटकांच्या दृष्टीने हे ठिकाण धोक्याचे बनले आहे.

येऊरचे नैसर्गिक सौंदर्य पर्यावरणप्रेमी आणि पर्यटकांसाठी कायम आकर्षणाचे केंद्र ठरले आहे. मधुबन गेट येथून येऊर गावात जाताना एअर फोर्सच्या बाजूला तलाव आहे. या ठिकाणी काहीशा उंच अंतरावरून खाली पाहिल्यास दाटीवाटीने लागवड केलेल्या वृक्षांच्या गर्दीत हा तलाव दिसतो. पर्यटनासाठी हे येऊरमधील उत्तम ठिकाण आहे. येऊरमध्ये दररोज मोठय़ा प्रमाणात दाखल होणारे पर्यटक आडवाटेने या तलावाजवळ जाऊन पाटर्य़ा करत असल्याच्या तक्रारी या भागातील प्राणीप्रेमींनी यापूर्वीही नोंदविल्या आहेत. उंच ठिकाणावर विश्रांती घेत पर्यटक या ठिकाणी सेल्फी काढण्याचा प्रयत्न करतात. पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने या ठिकाणी वन विभागातर्फे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. या ठिकाणच्या धोक्याची पूर्वसूचना वन विभागातर्फे पर्यटकांना दिली जाते. असे असले तरी सेल्फी काढताना पर्यटकांना अपघात ओढवण्याची भीती पर्यावरणप्रेमींकडून व्यक्त केली जात आहे. यासंबंधी वन विभागाशी संपर्क साधला असता वन विभागातर्फे ठाणे महानगरपालिकेकडे तलाव सुशोभीकरण आणि संरक्षक कठडा बांधण्यासाठी प्रस्ताव पाठवण्यात आल्याचे सांगण्यात आले. पर्यटनाचा सुरक्षित अनुभव पर्यटकांना घेता यावा आणि सुशोभीकरण न्याहाळता यावे यासाठी तलावाच्या ठिकाणी सर्वसाधारणपणे शंभर मीटपर्यंत संरक्षक कठडा बांधण्याची मागणी, वन विभागाने ठाणे महानगरपालिकेकडे केली आहे.

पर्यटकांच्या दृष्टीने तलावाच्या काठी आणि पर्यटक ज्या ठिकाणाहून तलावात उडय़ा मारतात त्या ठिकाणी संरक्षक कठडा बांधण्याची गरज आहे. यामुळे मासे, कासव यांसारखे जलचर प्राणी सुरक्षित राहतील. येऊरला मुळातच नैसर्गिक सौंदर्य लाभलेले आहे. सुशोभीकरण केले तरी मानवी उपद्रवामुळे तलावाजवळ अस्वच्छता होईल. पावसाळ्यात पर्यटक मोठय़ा प्रमाणात या ठिकाणी पाटर्य़ासाठी जमतात. अनेक वेळा पर्यटक तलावाच्या काठावर मद्यपान करतात. प्लास्टिक पिशव्या, कचरा तलावाच्या काठी पडलेला असतो. तलावाजवळ संरक्षक कठडा बांधणे आवश्यक आहे. मात्र सुशोभीकरण केल्यास पर्यटकांच्या हस्तक्षेपामुळे प्राण्यांच्या अधिवासास धोका पोहोचेल.

– आदित्य सालेकर, येऊर एनव्हायर्न्मेंटल सोसायटी.

तलावाजवळ संरक्षक कठडा बांधण्याच्या मागणीचा प्रस्ताव वन विभागाकडून ठाणे महानगरपालिकेकडे आला आहे. त्यानुसार योजना करून लवकरात लवकर प्रस्ताव मंजुरीसाठी वन विभागाकडे पाठवण्यात येईल. संरक्षक कठडा, सुशोभीकरणामुळे वन्यजीवांना धोका पोहोचणार नाही याची शाश्वती वन विभागकडून मिळाल्यास तात्काळ संरक्षक कठडा बांधण्याचे काम सुरू होईल.

 – नितीन पवार, कार्यकारी अभियंता, ठाणे महानगरपालिका.