संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा भाग असलेले येऊरचे जंगल ही ठाणे शहराची हिरवी श्रीमंती आहे. पर्यटनासाठी येऊर पोषक असले तरी शासनाच्या धोरणानुसार ते पर्यटन क्षेत्र घोषित करणे शक्य नसल्याने घराजवळ जंगल असूनही वन पर्यटनाच्या शोधात ठाणेकरांना मुंबईचे संजय गांधी जंगलाच्या वेशीवर तिष्ठत रहावे लागत आहे. येऊर जंगलातील प्राण्यांच्या अधिवासाला धोका पोहचू नये यासाठी येथील जैवविविधता पर्यटकांसाठी खुली करता येणार नाही, असे वन विभागाचे म्हणणे आहे. एका अर्थाने या निर्णयाचे स्वागतच करायला हवे. मात्र, जैवविविधता न्याहाळू पहाणाऱ्यांना प्रवेश बंदी करणारा वन विभाग येथील धनदांडग्यांच्या बंगल्यांमध्ये चालणाऱ्या पाटर्य़ाकडे मात्र दुर्लक्ष करते. हे चित्र निश्चितच सुखावणारे नाही.

प्राण्यांसाठी घनदाट जंगल, जैवविविधतेसाठी पोषक वातावरण, शहरातील उंची राहणीमानापासून दूर असलेले आदिवासी, जंगल परिसरालाच आपले घर मानणाऱ्या या आदिवासींचे पाडे, निसर्गाची शांतता यामुळे येऊरच्या नैसर्गिक सौंदर्यात भर पडते. येऊरला लाभलेले हे नैसर्गिक सौंदर्य ठाणेकर नागरिकांना पर्यटनासाठी खुणावत असते. माथेरान, लोणावळा या पर्यटनस्थळांप्रमाणेच येऊरमध्ये देखील पर्यटनाच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी अनेक पर्यावरण संस्था, प्राणीमित्र प्रयत्नशील आहेत. यासाठी सातत्याने प्रयत्नही सुरू आहेत. मात्र, शासन स्तरावरून मानपाडय़ाला पर्यटनस्थळाला दर्जा दिला जात असताना येऊरची वाट पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आली आहे.
दर दहा वर्षांनी जंगलक्षेत्राशी संबंधित असलेली योजना शासनातर्फे जाहीर करण्यात येते. जंगल परिसरात वनविभागाच्या मार्फत कोणते उपक्रम घेतले जाऊ शकतात, या उपक्रमांच्या मर्यादा काय असतील या संदर्भात शासनमान्य निर्णयानुसार कारभार चालतो. योजना जाहीर करण्यापूर्वी साधारण दोन ते तीन महिने वनस्थितीचा अंदाज घेऊन शासन निर्णय घेत असते. २०१० साली येऊर वनक्षेत्राच्या संबंधित शासनाचा विचारविनिमय सुरू झाला. पर्यटनासाठी उपयुक्त विविध मुद्दय़ांवर शासनदरबारी चर्चा झाल्यावर २०१३ साली येऊरविषयी दहा वर्षांची योजना आखण्यात आली. मात्र येऊरला पर्यटनक्षेत्र घोषित केल्यास मानवी हस्तक्षेप वाढू शकतो आणि जंगलातील प्राण्यांच्या अधिवासाला धक्का पोहचू शकतो असे कारण पुढे करत येऊरला पर्यटनक्षेत्राचा दर्जा देण्यात आला नाही. या निर्णयाचा सारासार विचार करता प्राण्यांची सुरक्षितता हा मुद्दा योग्य असला तरी येऊरमध्ये उभारण्यात आलेल्या बडय़ा नेत्यांच्या बंगल्यांमुळे होणाऱ्या मानवी हस्तक्षेपाकडे शासन आणि वनविभाग जाणूनबुजून दुर्लक्ष करताना दिसतात.
रात्री उशिरापर्यंत जंगल परिसराजवळ तळीरामांच्या होणाऱ्या पाटर्य़ा, बेधुंद नाच, क्रिकेट सामन्यांच्या वेळी होणारा धिंगाणा यावर अंकुश ठेवण्यात वनविभाग सपशेल अपयशी ठरत असल्याचे वर्षांनुवर्षे दिसत आहे. पर्यटनक्षेत्र जाहीर केल्यावर येऊरच्या जंगलात मोठय़ा प्रमाणावर पर्यटकांची गर्दी उसळेल आणि येथील कृष्णकृत्य उजेडात येण्याची भीती वन विभागातील वरिष्ठांना वाटत नाही ना, असा सवालही यानिमित्ताने पर्यावरण प्रेमी उपस्थित करत आहेत. येऊर क्षेत्राचा विचार करता वनविभाग, शासन, सुरक्षारक्षक, पोलीस यंत्रणा यांच्या एकत्रित कृतीतून नागरिकांच्या अर्निबध कृतीवर आळा बसू शकतो आणि या ठिकाणी पर्यटनाचे दालन खुले होऊ शकते.

नव्या ठाण्याचे पर्यटन केंद्र उपक्रमांविना रिते

नव्या ठाण्याच्या जवळ असलेला मानपाडा हा जंगलाकडील परिसर पर्यटनक्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला. मात्र पर्यटनक्षेत्र जाहीर झाल्यानंतरही फुलपाखरे उद्यान आणि निसर्ग माहिती केंद्र या दोन उपक्रमांच्या पलीकडे वनविभागाची मजल गेली नाही. बाजूलाच असलेला टिकूजिनीवाडी परिसर पर्यटकांना आकर्षित करत असला तरी अपुऱ्या सोईसुविधांमुळे ठाणेकर पर्यटक या ठिकाणी न जाणेच पसंत करतात. १९५६ साली मानपाडा विभाग खासगी मालकीचा होता. शासनाने तत्कालीन मालकाला पत्र पाठवून शासनाच्या अखत्यारीत हा विभाग करण्यात आला. १९७५ साली मानपाडा केंद्र तयार करण्यात आले. विशेष म्हणजे कायद्यानुसार मानपाडा हे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा भाग नाही. असे असतानाही मानपाडा विभागाला पर्यटनक्षेत्र होण्याचे वरदान मिळते आणि येऊर विभाग शासनातर्फे डावलण्यात येतो. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पर्यटकांसाठी रात्रीच्या वेळी चांदण्याची सफर, दुर्बिणीच्या साहाय्याने जैवविविधतेचा अभ्यास, प्राणी-पक्ष्यांचे छायाचित्रण असे उपक्रम आयोजित केले जातात. मानपाडा हे पर्यटनकेंद्र जाहीर झाल्यापासून येथे अशा प्रकारचे कोणतेही उपक्रम आयोजित करण्यात आलेले नाहीत.

योजना बदलाची अपेक्षा

शासनाच्या वतीने दहा वर्षांची योजना ठरल्यावर या योजनेप्रमाणे वनविभागाला काम करावे लागते. मात्र या दहा वर्षांमध्ये एखाद्या मुद्दय़ाबद्दल निर्णय घ्यायचा असल्यास योजना बदल म्हणजेच ‘डेविडेशन प्रपोजल’ची तरतूद करण्यात आली आहे. या तरतूदीनुसार योजनेत बदल करता येऊ शकतो. मात्र हा बदल करण्यासाठी शासनाकडे ठोस कारणांची पूर्तता करावी लागते. या कारणांना शास्त्रीय संशोधनाचा आधार लागतो. २०१३ साली येऊर पर्यटन क्षेत्र नसल्याची शासनाने योजना जाहीर केली. याचाच अर्थ २०२३ पर्यंत येऊर पर्यटनक्षेत्र होईल अशी आशा करणे फोल ठरेल. मात्र योजना बदलाच्या प्रकल्पाचा आधार घेऊन काही संशोधकांनी येऊरला पर्यटन क्षेत्र जाहीर करण्यासाठीच्या संशोधनाचे दाखले शासनापुढे जाहीर केले तर काही वर्षांत येऊरची दारे पर्यटनासाठी खुली होतील. असे झाल्यास वनविभाग, शासन, पर्यावरण संस्था यांच्या एकत्रित कृतीतून येऊरच्या नैसर्गिक पर्यटनाचा आनंद ठाणेकरांसोबत मुंबईतील नागरिकांनाही घेता येईल. यामुळे तलावांचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाणे शहराला येऊर पर्यटनाचे शहर ही नवी ओळख प्राप्त होईल हे निश्चित.

पर्यटन क्षेत्र जाहीर करण्यासाठीचे निकष
पर्यटन क्षेत्र जाहीर करण्यासाठी संबंधित ठिकाणी पर्यटकांचा प्रतिसाद मोठय़ा प्रमाणात मिळणे अपेक्षित असते. जंगल ठिकाणी पर्यटन क्षेत्र जाहीर करण्यासाठी जंगलात जैवविविधता मुबलक प्रमाणात असावी लागते. पर्यटनासाठी लागणाऱ्या सुविधांसाठी संबंधित क्षेत्र योग्य असावे लागते. या निकषांवर जंगल ठिकाणचे पर्यटनक्षेत्र जाहीर केले जाते. पर्यटनक्षेत्रासंबंधीच्या या निकषांबाबत येऊर परिपूर्ण ठरते. पावसाळ्यात या ठिकाणी बहरणारे सूक्ष्मजीव, स्थलांतर होऊन येणारे पक्षी, जंगलामध्ये असणारी विविध प्रकारची झाडे यामुळे येऊरमधील प्रत्येक ठिकाण पाहण्यासारखे असते. येऊरगावाच्या आसपास सागाची झाडे मोठय़ा प्रमाणात आहेत. याशिवाय विविध जातींचे वृक्ष येथे असल्याने वृक्ष सफर, मशरुम ट्रेल, स्पायडर ट्रेल, बटरफ्लाय ट्रेल असे उपक्रम येऊरमध्ये आयोजित केले जाऊ शकतात. या उपक्रमांना हौशी प्राणीमित्र हजेरी लावतील.