News Flash

श्वान, कोंबडय़ांच्या शोधात येऊरमध्ये बिबटय़ाचे ‘सीमोल्लंघन’

येऊर टेकडीवर असणाऱ्या श्वानकेंद्रामुळे बिबटय़ा खाद्याच्या शोधात मानवी वस्तीत येऊ शकतात

स्थानिक ग्रामस्थ, फेरफटका मारण्यास येणाऱ्यांमध्ये दहशत

मुरबाड येथील ग्रामस्थांच्या जीवावर उठलेल्या नरभक्षक बिबटय़ाला गोळ्या घालून ठार करण्यात आल्याने एकीकडे प्राणिप्रेमींमध्ये हळहळ व्यक्त होत असतानाच येऊरच्या खोल जंगलात वावरणारा बिबटय़ा गेल्या पंधरवडय़ापासून आदिवासी पाडय़ावर नियमितपणे दर्शन देऊ लागल्याने येथील ग्रामस्थ आणि सकाळ-सायंकाळच्या वेळेत फेरफटका मारावयास येणारे पादचारी कमालीचे धास्तावले आहेत. या आदिवासी पाडय़ावरील कुत्रे, मांजरी, कोंबडय़ा, बकऱ्या असे पाळीव प्राणी वरचेवर नाहीसे होऊ लागले असून येऊर परिसरातील बेकायदा श्वानकेंद्रामुळे या भागात मुरबाडची पुनरावृत्ती घडण्याची भीती व्यक्त केली जाऊ लागली आहे.

येऊर टेकडीवर असणाऱ्या श्वानकेंद्रामुळे बिबटय़ा खाद्याच्या शोधात मानवी वस्तीत येऊ शकतात, असे वृत्त लोकसत्ता ठाणेने यापूर्वीच प्रसिद्ध केले आहे. यासंबंधी पर्यावरण संस्था वारंवार तक्रारी आणि पाठपुरावा करूनही बेकायदा श्वान केंद्राविरोधात अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. मुरबाड येथील गावांमधून शिरून मानवांना लक्ष्य करणाऱ्या बिबटय़ाला ठार करण्यासाठी जय्यत तयारी करणारे वन विभागाचे अधिकारी येऊरमधील या संभाव्य धोक्याकडे करत असलेल्या दुर्लक्षामुळे प्राणीप्रेमी संघटनांमधून तीव्र स्वरूपाचे नाराजी व्यक्त होत आहे.

येऊर येथील पाटोणापाडा परिसरात गेल्या पंधरा दिवसांपासून स्थानिकांनी अनेक वेळा बिबटय़ा वसाहतीच्या अत्यंत जवळ आला असल्याचे पाहिले आहे. बिबटय़ा पाटोणापाडा बस स्थानकाजवळ, पाडय़ात फिरताना आणि वनह्द्दी निदर्शनासाठी बांधलेल्या भिंतीवर बसलेला काही गावकऱ्यांच्या पाहण्यात आला आहे. याशिवाय आदिवासी पाडय़ांवरील पाळीव प्राणी नाहीसे होत असल्याचे प्रमाण वाढत असल्याने या बिबटय़ाचे वास्तव्य मानवी वस्तीलगतच असल्याची भीती गावकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. मागील आठवडय़ात पाडय़ावरील राणी नावाच्या श्वानावर बिबटय़ाने झडप घालून तिला जखमी केले होते. बिबटय़ाच्या वारंवार होणाऱ्या हल्ल्यामुळे येऊरमधील नागरिक, लहान मुलांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. येऊरमध्ये जंगल परिसराच्याजवळच काही श्वानकेंद्रे आहेत. श्वानांच्या वासावरून, भुंकण्यावरून आपले भक्ष्य पकडण्यासाठी बिबटय़ा गावात येत असल्याचे येऊर एन्व्हायर्नमेंटल सोसायटीचे रोहित जोशी यांनी सांगितले.

नागरिकांनी काय काळजी घ्यावी?

  • आदिवासी पाडय़ावर शौचालयाची सोय नसल्याने उघडय़ावर शौचास जाताना अनेकदा बिबटय़ाच्या हल्ल्याचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे महापालिकेकडे मागणी करून शौचालयाची सोय गावात होणे आवश्यक आहे.
  • लहान मुलांनी एकटय़ाने जंगलात फिरू नये.
  • रात्रीच्या वेळी पाडय़ावर फिरताना बॅटरी, काठी सोबत ठेवावी.
  • बिबटय़ा दिसल्यास दगड मारून त्याच्यावर हल्ला करू नये.
  • घराजवळ स्वच्छता ठेवावी, अडगळ ठेवू नये.
  • पाडय़ावरील रस्त्यावर विजेचे खांब असावेत.

येऊरमधील श्वानकेंद्रांवर कारवाई व्हावी यासाठी पर्यावरणप्रेमींनी केलेल्या मागणीकडेदेखील वनविभागाचे दुर्लक्ष होत आहे. श्वानघरांमुळे वन्यजीवांना धोका असल्याने संबंधित खासगी श्वानघरांविषयी निर्णय घेण्याचे मागणीपत्र संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या संचालकांकडे पाठवण्यात आले होते. मात्र या संदर्भात कोणत्याही प्रकारचे उत्तर मिळालेले नाही.

 -मित आशर, अ‍ॅनिमल वेल्फेअर ऑफिसर

येऊरमधील जंगलाच्या जवळच हे पाडे आहेत. बिबटय़ाचे मानवी वस्तीत येणे साहजिक आहे. बिबटय़ाचे दिसणे किंवा प्राण्यांवर हल्ला करणे हे यापूर्वीही घडले होते. पावसाळ्यानंतर सर्वत्र हिरवाई असते. श्वान, कोंबडय़ा, बकऱ्या यासारखे प्राणी गावातच असतात. आपल्या भक्ष्याच्या शोधात बिबटे गावात येत आहेत. दोन ते तीन महिन्यानंतर बिबटय़ाचे वास्तव्य मानवी वस्तीत दिसणार नाही. नागरिकांनी पुरेशी काळजी घेतल्यास नागरिकांच्या जीवाला धोका संभवत नाही. नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही.

 -कृष्णा तिवारी, फॉरेस्ट अँड वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन सोसायटी, ठाणे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 12, 2016 1:54 am

Web Title: yeur tiger migration to find dogs and hen
Next Stories
1 ठाणे महापालिका मुख्यालयाची अखेर दुरुस्ती
2 वसाहतीचे ठाणे : मध्यवर्ती ठाण्यातले टुमदार संकुल
3 ठाण्यात बालिकेवर लैंगिक अत्याचार
Just Now!
X