नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सतर्क असणाऱ्या पोलिसांच्या कामाची वेळ ठरलेली नसते. त्यामुळे याचा परिणाम त्यांच्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यावर होतो. म्हणूनच मिळणाऱ्या वेळेत स्वास्थ्यावर लक्ष ठेवता यावे, तसेच मानसिक आरोग्य उत्तम राहावे यासाठी पोलिसांना योग आणि ध्यानधारणा शिबिरात मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
डोंबिवली लोहमार्ग पोलिसांनी या वर्गाचा लाभ घेतला असून मध्य, पश्चिम तसेच हार्बर रेल्वे मार्गावरील सर्व स्थानकांतील पोलिसांसाठी हे शिबीर राबविण्यात यावे, अशी मागणी ईगल ब्रिगेडचे संस्थापक विश्वनाथ बिवलकर यांनी मुंबई रेल्वेचे पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांच्याकडे केली होती. त्यांनी या उपक्रमाला मान्यता दिली. पोलिसांमध्ये एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होऊन कामाचा ताण हलका होण्यास मदत होणार आहे.
मुंबई रेल्वे पोलीस आयुक्त मधुकर पांडे, पोलीस साहाय्यक उपायुक्त राजेश्वरी रेडकर, रुपाली आंबोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ईगल ब्रिगेडच्या माध्यमातून लोहमार्ग पोलिसांना योग व ध्यानधारणेचे धडे दिले जाणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.