योग शिक्षकांना तीन महिन्यांपासून नियुक्ती आदेश नसल्याने पेच

भगवान मंडलिक
कल्याण : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत ठाणे जिल्ह्य़ातील प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि केंद्राच्या हद्दीतील गावांमध्ये जिल्हा आरोग्य विभागाच्या पुढाकाराने मागील तीन वर्षांपासून योग प्रशिक्षण सुरू करण्यात आले होते. जिल्ह्य़ातील पाच तालुक्यांमध्ये २३ योग शिक्षकांची या प्रशिक्षण कामासाठी नियुक्ती करण्यात आली होती. मागील तीन महिन्यांपासून (जून) योग शिक्षकांना जिल्हा आरोग्य विभागाकडून नियुक्तीचे आदेश देण्यात येत नसल्याने योग वर्ग बंद पडले आहेत.

नियुक्तीची मुदत संपली असली तरी आम्ही योग वर्ग घेण्यास तयार आहोत. प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर हे वर्ग घेतले जावेत किंवा नाही ते कळवा आणि नियुक्तीचे आदेश द्या, अशी मागणी योग शिक्षक गेल्या तीन महिन्यांपासून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनीष रेंघे, योग वर्ग जिल्हा समन्वयक अमोल वाघ यांना संपर्क करून करत आहेत. ‘तुमचे आदेश दोन दिवसांत काढतो, आम्ही येथे रिकामे बसलेलो नाही’, अशा स्वरूपाची उत्तरे या अधिकाऱ्यांकडून योग शिक्षकांना दिली जात आहेत, असे काही शिक्षकांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

योग शिक्षकांमध्ये जिल्हा परिषदेतील शिक्षक, सेवाभावी कार्यकर्ते, निवृत्त शिक्षक काम करीत आहेत. त्यांना महिन्यातून चार योग प्रशिक्षण वर्ग आरोग्य केंद्रात घेण्याच्या सूचना आहेत. प्रत्येक तासिकेचे ५०० रुपये मानधन शिक्षकांना दिले जाते. आवडीने हे काम योग शिक्षक करीत आहेत. मागील साडेतीन महिन्यांपासून योगाच्या ३२ तासिका झाल्या नाहीत, असे योग शिक्षकांनी सांगितले.

नियुक्ती आदेश नाही

ठाणे जिल्हा आरोग्य विभागाने १४ जून २०२१ रोजी योग शिक्षकांची एक बैठक ठाणे येथे घेतली. या बैठकीत योग शिक्षकांनी नियमित वर्ग सुरू करावेत, अशी मागणी केली. दोन दिवसांत तुमच्या नियुक्तीचे आदेश दिले जातील, असे या बैठकीत योग शिक्षकांना सांगण्यात आले. तासिकांचे ५०० रुपयांप्रमाणे मानधन शिक्षकांच्या खात्यात जमा केले आहे. नियुक्तीचे आदेश मिळाले की योग वर्ग सुरू करू, असा निर्णय योग शिक्षकांनी घेतला. बैठक होऊन तीन महिने उलटले तरी जिल्हा आरोग्य विभागाकडून नियुक्ती आदेश देण्यात येत नसल्याने योग शिक्षक वर्ग घेण्यास तयार नाहीत. आरोग्य केंद्र कर्मचारी, गाव-पाडय़ातील रहिवासी योग वर्ग कधी सुरू होतात, या प्रतीक्षेत आहेत. नियुक्ती आदेश नसताना काम सुरू केले तर पुन्हा आरोग्य अधिकारी मानधन देण्यात अडचणी आणतील, अशी भीती योग शिक्षकांना आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनीष रेंघे यांना सतत संपर्क केला. लघुसंदेश पाठविला. ते बैठकीत व्यग्र असल्याने त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

ठाणे जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावरील योग वर्ग सुरू आहेत. योग शिक्षकांच्या नियुक्तीचे आदेश काढण्यात आले आहेत. त्यांना लवकरच ते आदेश मिळतील.

– अमोल वाघ, जिल्हा समन्वयक, योग प्रशिक्षण वर्ग, जिल्हा आरोग्य विभाग, ठाणे