मीरा-भाईंदर महापालिका अधिकारी, ठेकेदारावर गुन्हा दाखल

भाईंदर : मीरा रोडच्या शीतल नगर परीसरातील नाल्यात पडून एका ३७ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. या नाल्यावर झाकण नसल्याने या प्रकरणी  संबंधित पालिका अधिकारी आणि ठेकेदाराविरोधात मीरा रोड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

मीरा रोड येथील शीतल नगर परिसरातून ३१ जुले रोजी शहनाज खान हा घरी परतण्यास निघाला होता. पावसामुळे रस्त्यावर पाणी साचल्याने तो लगतच्या पालिकेने बांधलेल्या नाल्यावरून जात होता. मात्र नाल्याची झाकणे उघडी असल्याने रात्रीच्या अंधारात त्याचा तोल जाऊन तो नाल्यात पडला. पाण्याचा प्रवाह सुरु असल्याने तसेच मार लागल्याने युवकाचा जागीच मृत्यू झाला. अग्निशमन दलाच्या जवानांनी त्याचा मृतदेह बाहेर काढला. या प्रकरणी मीरा रोड पोलिस ठाण्यात संबंधित अधिकारी आणि ठेकेदार भावेश यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वारंवार मृत्यू, पण कारवाई शून्य

मीरा-भाईंदर शहरात साधारण एकूण ४ हजारांहून अधिक नाल्याची झाकणे आहेत. परंतु बांधकाम विभागाच्या दुर्लक्षपणामुळे ही झाकणे मोडकळीस किंवा नष्ट होतात. अनेक वेळा तक्रार करूनही त्यावर लक्ष दिले जात नसल्यामुळे दरवर्षी साधारण ३ ते ४ नागरिकांनाचा झाकण नसलेल्या नाल्यात पडून मृत्यू होतो. मात्र त्यांच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या अधिकारी आणि ठेकेदारावर कारवाई झाली नसल्याचे आरोप सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात आले आहेत.

या प्रकरणाची चौकशी करण्यात आली असून त्याचा अहवाल आल्यावर कारवाई करण्यात येईल.

– डॉ. विजय राठोड, आयुक्त, महापालिका