विरार : चिंचोटी धबधब्यात पावसाळी सहलीचा आनंद लुटण्यासाठी आलेल्या एका तरुणाचा बुडून मृत्यू झाला. पराग सोरिया (३५) असे या तरुणाचे नाव आहे. चिंचोटी धबधब्यावर पावसाचा आनंद लुटण्यासाठी मुंबई, ठाणे, पालघर परिसरातील शेकडो पर्यटक येत आहेत. यंदा सर्व पर्यटनस्थळांवर बंदी घालण्यात आली आहे. टाळेबंदी असतानाही चिंचोटी धबधब्यावर सहलीसाठी नायगाव येथून मित्रांचा समूह मंगळवारी दुपारी येथे आला होता. दुपारचे जेवण झाल्यानंतर यातील पराग हा पोहण्यासाठी पाण्यात उतरला होता. पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडू लागला. त्याला वाचवण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण पाण्यात बुडाल्याने त्याचा मृत्यू झाला. पर्यटकांना चिंचोटी धबधब्याची भौगोलिक रचना माहिती नसल्यामुळे त्यांना पाण्याच्या खोलीचा अंदाज येत नाही. परिणामी, पर्यटक पाण्यात उतरतात आणि बुडतात. यामुळे या परिसरात पोलिसांची गस्त वाढवावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

खाडीत पोहायला गेलेला तरुण बुडाला

भाईंदर : भाईंदर पश्चिम परिसरातील खाडीवर पोहायला गेलेला ३२ वर्षीय तरुण वाहून गेला असल्याचे समोर आले आहे. पोलीस आणि अग्निशमन दलाकडून या तरुणाचा शोध सुरू आहे. भाईंदर पश्चिम परिसरातील खाडी परिसरात तीन तरुण पोहण्याकरिता गेले होते. यापैकी दशरथ बाबू मुनिराज हा तरुण वाहून गेला. खाडीजवळ रो-रो जेट्टीचे अर्धवट काम सुरू आहे. त्यामुळे जेट्टीवर नेहमीच अनेक युवक फिरायला येत असतात. परंतु हा तरुण जेट्टीवरून पाण्यात पोहायला गेला असता वाहून गेला असल्याचे नागरिकांनी सांगितले. घटनास्थळी पोलीस आणि मनपा अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले असून त्याला खाडीत शोधण्याचा प्रयत्न करत असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांनी सांगितले.