News Flash

वर्सोवामध्ये तरुणाची दगडाने ठेचून हत्या

तरुणाचा मृतदेह झुडपात टाकून दिला असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला.

संग्रहित छायाचित्र

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर वर्सोवा येथे झुडपात पोलिसांना आढळून आलेल्या २३ वर्षीय तरुणाच्या मृतदेहाची ओळख पटविण्यात यश आले आहे. तरुणाची ओळख पटू नये यासाठी मारेकऱ्यांनी तरुणाचा चेहरा विद्रूप करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु काशिमीरा पोलिसांनी अथक प्रयत्न करून त्याची ओळख पटवली आहे. शिवशंकर चौरसिया असे या तरुणाचे नाव असून तो मुंबईतील वांद्रे परिसरात पानाचे दुकान चालवत होता. त्याची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली होती.

वर्सोवा येथे अज्ञात तरुणाचा मृतदेह झुडपात टाकून दिला असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. परंतु हत्या करणाऱ्यांनी तरुणाच्या चेहऱ्यावर दगडांनी आघात केले असल्याने मृतदेहाची ओळख पटत नव्हती.

पोलिसांनी आसपासच्या सर्व पोलीस ठाण्यांमध्ये मृतदेहाची माहिती पाठवली. या वेळी वांद्रे पालीस ठाण्यात शिवशंकर चौरसिया हा २३ वर्षीय तरुण हरवल्याची तक्रार दाखल असल्याचे त्यांना समजले. पोलिसांनी दोन्ही व्यक्तींची वर्णने तपासली असता ती जुळत असल्याचे दिसून आले.

काशिमीरा पोलिसांनी चौरसिया याच्या पालकांना मृतदेहाची ओळख पटवण्यास आणले असता हातावर गोंदवलेल्या चिन्हांवरून त्यांनी मृतदेहाची ओळख पटवली. शिवशंकर सकाळी अकराच्या सुमारास घरातून निघाला तो पुन्हा परतला नव्हता. पोलीस त्याच्या मोबाइलवरील कॉलच्या आधारे मारेकऱ्यांचा शोध घेत असून त्याच्या मित्रांकडेही चौकशी करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 29, 2016 1:01 am

Web Title: young man murdered in versova
Next Stories
1 ठाण्यात विविधरंगी लोकांकिका उलगडल्या..
2 सीकेपी बँकेची सहा कोटी  ९२ लाखांची फसवणूक
3 ‘लोकसत्ता लोकांकिके’चं ‘पयलं नमन’ आज ठाण्यात
Just Now!
X