‘कट्टा गोलमेज’च्या निमित्ताने विविध पक्षांच्या युवा नेत्यांचे तरुणांना आवाहन; ‘लोकसत्ता ठाणे’च्या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांची गर्दी
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये घेतल्या जाणाऱ्या शहर नियोजनाच्या निर्णयांची पुरेशी माहिती लोकांपर्यंत पोहचत नसते. त्यामुळे सामान्य नागरिक अशा चांगल्या निर्णयांपासून अनभिज्ञ राहतात. महापालिकेचा प्रशासकीय कारभार समजून घेण्यासाठी आणि त्यामध्ये सकारात्मक बदल घडवण्यासाठी शहरातील तरुणांनी राजकारणात सक्रिय सहभाग नोंदवण्याची गरज ‘लोकसत्ता ठाणे’ आयोजित ‘कट्टा गोलमेज’ या कार्यक्रमात उपस्थित प्रमुख राजकीय पक्षांच्या युवा नेत्यांनी व्यक्त केली. या वेळी आरोग्य, रस्ते, शिक्षण, पाणीपुरवठा या सुविधांचा कार्यक्रम पक्षांनी कसा आखला आहे, याची माहिती घेण्याचा प्रयत्न उपस्थित महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी केला.
कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर विविध राजकीय पक्षांत काम करणाऱ्या युवा नेत्यांची शहर नियोजनासंबंधी नेमकी भूमिका विविध महाविद्यालयांमधील निमंत्रित विद्यार्थी प्रतिनिधींना जाणून घेता यावी, तसेच या माध्यमातून संवाद घडावा यासाठी ‘लोकसत्ता ठाणे’च्या वतीने ‘कट्टा गोलमेज’ या कार्यक्रमाचे आयोजन कल्याणच्या ब्राह्मण सोसायटी सभागृहात करण्यात आले होते. या कार्यक्रमास शिवसेनेकडून दीपेश म्हात्रे, भाजपचे रितेश फडके, काँग्रेसचे राकेश मुथा, राष्ट्रवादीचे सुभाष गायकवाड, मनसेचे सुनील प्रधान हे युवा नेते उपस्थित होते. या वेळी कल्याण शहरातील विविध महाविद्यालयांतील निमंत्रित विद्यार्थी प्रतिनिधींनी या ‘कट्टा गोलमेज’ला उपस्थिती लावली होती.
या वे ळी शहराच्या विकासात तरुणांच्या सहभागाचा विषय प्रामुख्याने चर्चिला गेला. कल्याण, डोंबिवली शहरातील कचरा, वाहतूक कोंडी, तसेच आरोग्यासंबंधी विविध प्रश्नांची सरबत्ती या वेळी उपस्थित विद्यार्थी प्रतिनिधींनी या नेत्यांवर केली. कचरा क्षेपणभूमीची क्षमता संपली असतानाही त्यावर कचरा टाकला जात आहे. शहरातील वाहतूक कोंडीमुळे अपघातग्रस्त व्यक्तीला रुग्णालयात नेण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत. रुग्णालयांना अवकळा आली असून अपेक्षित यंत्रणा आणि डॉक्टर, कर्मचाऱ्यांची उपलब्धता नाही, असे काही प्रश्न या वेळी विद्यार्थ्यांनी उपस्थित केले. या वेळी सत्ताधारी शिवसेना पक्षाचे दीपेश म्हात्रे यांनी महापालिकेकडून या समस्या सोडविण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचे विवेचन केले. कचऱ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी नव्या क्षेपणभूमीचा पर्याय अवलंबला जात असल्याचे त्यांनी सांगितले. कल्याण, डोंबिवली ही शहरे वाहतूक कोंडीमुक्त व्हावीत यासाठी प्रयत्न सुरू असले तरी सध्या सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांचा मोठा अडथळा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

‘मनसेचा विकास आराखडा तयार’

मनसेकडून नाशिक शहराच्या विकासाचा डंका पिटला जात असताना कुंभमेळा नसताना असा विकास इतक्या जलदगतीने कल्याण-डोंबिवली शहरात करणे शक्य आहे का, असा सवाल विद्यार्थ्यांनी केला. त्यावर शहराच्या नेमक्या समस्यांची आम्हाला कल्पना असून त्यावरील उपायांचा आराखडा तयार आहे, असे वक्तव्य मनसेचे युवा नेते सुनील प्रधान यांनी केले.

‘स्मार्ट सिटीने चांगल्या सुविधा’
भाजपच्या वतीने सुरू असलेल्या स्मार्ट सीटीतून तरुणांना नेमके काय मिळणार आहे याविषयी विचारलेल्या प्रश्नांवर भाजपच्या रितेश फडके यांनी चांगल्या दर्जाच्या सुविधा शहराला मिळू शकणार असल्याचे सांगितले.

काँग्रेस, राष्ट्रवादी ‘मार्केटिंग’मध्ये कमी
राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या मागील निवडणुकांमध्ये पराभवाची कारणे विद्यार्थ्यांनी विचारली त्यावर राष्ट्रवादीचे राकेश मुथा आणि सुभाष गायकवाड यांनी सोशल माध्यमातून सुरू असलेल्या ‘मार्केटिंग’मध्ये कमी पडल्याची कबुली दिली.