श्री कला मंडळाचा वर्धापन दिन साजरा
ज्येष्ठ शास्त्रीय संगीत गायिका आरती अंकलीकर-टिकेकर यांच्या दोन शिष्या भक्ती पिळणकर आणि स्वरूपा बर्वे यांनी अडीच तास भजन, गवळण, भारूड, नाटय़गीते आदी हृदयाचा ठाव घेणारी गाणी सादर करून रविवारची संध्याकाळ मंत्रमुग्ध केली. आपल्या गायनातून दोघींनी गुरू आरती अंकलीकर यांच्याकडून मिळत असलेल्या आलाप, रागदारीचा गाण्याच्या वेळी सुयोग्य उपयोग करत मैफल रंगवली. निमित्त होते कल्याणमधील आधारवाडी येथील श्री कला मंडळाच्या वर्धापन दिन कार्यक्रमाचे.
बालक विद्यामंदिरातील सभागृहात आयोजित या मैफलीत आरती अंकलीकर यांच्याकडे गुरुकुल पद्धतीने शास्त्रीय शिक्षणाचे धडे घेत असलेल्या शिष्या भक्ती आणि स्वरूपा यांनी दर्दी रसिकांच्या उपस्थितीत सादर केलेली गाणी रसिकांच्या हदयाचा ठाव घेऊन गेली. गणेशाला नमन करणाऱ्या ‘पंचतुंड नररुंडमालधर पार्वतीश आधी नमतो’ या नांदीने गायन कार्यक्रमाला सुरुवात झाली. त्यानंतर संत चोखामेळ्याचे पांडुरंगाप्रति भाव व्यक्त करणारा ‘अबीर गुलाल उधळीत रंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग’, ‘ऋतुराज आज वनी आला, ‘माझे माहेर पंढरी, ‘हे श्याम सुंदरा, ‘सावळा नंदाचा मूल खोटा गे’, ‘मी राधिका, मी प्रेमिका, ‘हे सुरांनो चंद्र व्हा, चांदण्याचे कोष माझ्या प्रियकराला पोहचवा’, ‘जिवलगा कधी रे येशील तू’, ‘बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल’ अशी एकापेक्षा सरस गाणी भक्ती आणि स्वरूपाने सादर केली. या सर्व गाण्यांचे निरूपण निवेदिका विदुला बुधकर करीत होत्या.
या गाण्यांना संवादिनीवर जयंत फडके, तबल्यावर चार्वाक जगताप, तालसाथ ओंकार जोशी देत होते. त्यामुळे निरूपण, गाणी आणि तालसुरात रंगलेला हा कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला. स्वरूपा आणि भक्तीने कार्यक्रम एका टिपेला नेऊन ठेवलेला असतानाच, निवेदिका विदुला बुधकर यांनी संत नामदेवाचा ‘विठ्ठल आवडी प्रेम भावो’ हा अभंग सादर करून रसिकांना वेगळ्या भावरंगात नेले.
ताल -सुरांचा गजर सुरू असतानाच, भक्ती आणि स्वरूपा यांनी विठ्ठलाच्या भेटीसाठी आतुर झालेल्या संत कान्होपात्राचे भाव ‘अगा वैखुंठीचा राया, अगा विठ्ठल सखाया’ हा अभंग आणि तराणा सादर करून याच भैरवीने भक्तिरसात रंगलेल्या या कार्यक्रमाची सांगता केली.