कल्याण : इंग्लंडमध्ये डॉक्टर असल्याचे सांगत कल्याणमधील एका तरुणीला लग्नाची मागणी घालून एका तरुणाने या तरुणीकडून १६ लाख रुपये उकळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कल्याण येथील खडकपाडा भागात ही तरुणी राहते. ती नवी मुंबईतील एका कॉर्पोरेट कार्यालयात नोकरी करते. या तरुणीने विवाह नोंदणी संकेतस्थळावर नोंदणी केली आहे. यातून प्रकाश शर्मा नावाची व्यक्ती तिच्या संपर्कात आली. त्याने इंग्लंडमध्ये डॉक्टर असल्याचे सांगितले होते. या तरुणीने उच्चशिक्षित जोडीदार मिळतोय म्हणून त्याच्यासोबत विवाहाची तयारी दर्शविली होती. तसेच त्यांचे नियमित संभाषण सुरू झाले. जानेवारी महिन्यात भारतात परत येणार असल्याचे त्याने सांगितले होते. त्याप्रमाणे तो नवी दिल्ली विमानतळावर आला. त्या वेळी त्याने तिला संपर्क करून विमानतळावर सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी पकडले असल्याचे सांगितले. आपल्याकडे भरपूर सोने आहे. त्यांना पैसे द्यावे लागणार आहेत. असे सांगून त्याने तिच्याकडून टप्प्याटप्प्याने असे एकूण १६ लाख रुपये काढून घेतले. ही रक्कम दिल्यानंतर तिने त्याच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याच्याकडून प्रतिसाद मिळत नव्हता. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तिने याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार केली.