पोलिसांकडून अपहरणकर्त्यां महिलेसह पाच जणांना अटक
विरारमधील अपहरण करण्यात आलेल्या कविता बाडला या तरुणीची हत्या ३० लाखांच्या खंडणीसाठी तिच्या अपहरणकर्त्यांनी केल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी अपहरणकर्त्यां महिलेसह पाच जणांना अटक केली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी हा कविताच्या कार्यालयातील सहकारी होता. सराफाची मुलगी असलेल्या कविताचे अपहरण केले तर खूप पैसे मिळतील, या लालसेपोटी त्याने हे कृत्य केले.
२७ वर्षीय कविता बाडला विरारमध्ये राहत होती. एका खासगी मार्केटिंग कंपनीत कामाला असलेल्या कविताच्या वडिलांचे सराफाचे दुकान आहे. १५ मे रोजी कविता बाहेर गेली मात्र घरी परतली नाही. त्यामुळे तिचे वडील किशनलाल कोठारी यांनी ती बेपत्ता असल्याची तक्रार अर्नाळा पोलीस ठाण्यात नोंदवली. काही दिवसांनंतर कोठारी यांना अज्ञात व्यक्तीकडून दूरध्वनी येऊ लागले. ‘आम्ही कविताचे अपहरण केले असून तिच्या सुटकेसाठी ३० लाख रुपये आणि तीन किलो सोने द्यावे,’ अशी मागणी अपहरणकर्त्यांनी केली. अपहरणकर्ते कविताच्याच मोबाइलवरून तिच्या वडिलांना खंडणीसाठी धमकावत होते.
दरम्यान, डहाणूच्या कासा रोडवरील साखरा घाटीत एका सुटकेसमध्ये एका तरुणीचा मृतदेह आढळून आला होता. हा मृतदेह कविताचाच असल्याचे निष्पन्न झाले. पालघच्या पोलीस अधीक्षिका शारदा राऊत यांनी स्वत: या प्रकरणाचा तपास हाती घेतला आणि अपहरणकर्त्यांना पकडण्यासाठी कंबर कसली. कविताचा मृतदेह सापडल्याची खबर पोलिसांनी बाहेर कुठेही कळू दिली नाही.
अपहरणकर्ते पैसे घेऊन मनोर, वापी या ठिकाणी महामार्गावर बोलावत होते. पोलिसांनी त्यानुसार सापळा रचला होता. गुरुवारी अपहरणकर्त्यांनी तलासरी येथे पैसे घेऊन बोलावले. त्यानुसार कविताचे वडील पैसे घेऊन गेले आणि अपहरकर्त्यांना पैसे दिले. त्यांच्या मागावर असलेल्या पोलिसांनी पाठलाग करून आरोपींना महामार्गावरच अटक केली. मुख्य आरोपी मोहितकुमार भगत (२५) याच्यासह त्याचे साथीदार रामअवतार शर्मा (२६), शिवकुमार शर्मा (२५), मनीष वीरेंद्र सिंग (३६), अनिता रवी (३५) या सर्वाना अटक करण्यात आली. त्यांना २६ मेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

कार्यालयीन सहकाऱ्याकडूनच अपहरण
कविता एका मार्केटिंग कंपनीत कामाला होती. त्या कंपनीत आरोपी मोहित भगत हासुद्धा कामाला होता. कविता ही सराफाची मुलगी आहे हे मोहितला माहीत होते. त्यामुळे तिचे अपहरण करून ३० लाख रुपयांची खंडणी मागायची, अशी योजना मोहितने आखली आणि आपल्या साथीदारांना सोबत घेतले. त्यांना प्रत्येकी ५ लाख रुपये देण्याचे आमिष दाखवले. १५ मे रोजी पैसे घेण्याच्या बहाण्याने कविताला बोलावले आणि तिची हत्या केली. त्यानंतर तिचा मृतदेह सुटकेसमध्ये भरून डहाणू्च्या कासा येथील घाटात फेकून दिला. कविता ही विवाहित असून पतीपासून विभक्त झाली होती. तिच्याच साथीदाराने पैशांच्या लालसेपोटी तिचे अपहरण करून हत्या केली. या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी पालघर पोलीस अधीक्षिका शारदा राऊत, अतिरिक्त पोलीस अधीक्षक योगेश कुमार, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने, पोलीस उपनिरीक्षक सचिन चव्हाण आदींनी मोहिमेत भाग घेतला होता.