१६ वर्षांच्या मुलाच्या नेतृत्वाखालील दरोडेखोरांच्या टोळीतील ४ अटकेतूह्ण

कल्याण येथील शहाड परिसरात चोरीच्या उद्देशातून प्रिया दरवडे (२२) या तरुणीची हत्या करणाऱ्या चार जणांच्या टोळीला जेरबंद करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, या परिसरात दरोडय़ांचा उच्छाद मांडणाऱ्या या टोळीचा म्होरक्या एक १६ वर्षांचा मुलगा असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. या मुलाने स्वत:ची टोळी निर्माण करून गेल्या काही दिवसांपासून शहाड परिसरात खून आणि दरोडय़ाचे सत्र सुरू केले होते, अशी माहिती ठाण्याचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी दिली. या टोळीने प्रियासह एका सुरक्षारक्षकाचा खून केला तर तीन सुरक्षारक्षकांवर जीवघेणा हल्ला केल्याचेही त्यांनी सांगितले.

कल्याण येथील शहाड भागातील साईराम सोसायटीत राहणाऱ्या प्रिया दरवडे या तरुणीची गेल्या आठवडय़ात हत्या झाली होती. तसेच मारेकऱ्यांनी घरातून सोन्याचे दागिने, मोबाइल असा ऐवज चोरून नेला होता. या प्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेच्या चार दिवस आधी शहाड परिसरात चोरटय़ांनी एका सुरक्षारक्षकाचा खून तर तीन सुरक्षारक्षकांवर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याच्या घटना घडल्या होत्या. या सर्व घटनांमुळे शहाड परिसरात सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले होते. या सर्व प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन ठाणे मध्यवर्ती गुन्हे अन्वेषण शाखेला समांतर तपास करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार या शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास घेवारे यांच्या पथकाने चार जणांच्या टोळीला अटक केली, अशी माहिती पोलीस आयुक्त सिंग यांनी दिली. या टोळीमध्ये एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलाचा समावेश असून तोच या टोळीचा म्होरक्या असल्याचे समोर आले आहे. तसेच चोरीच्या उद्देशातून तोच गुन्ह्य़ांचे कट रचत असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. त्याचप्रमाणे कल्याण परिसरातच चौघे राहत असल्यामुळे त्या भागाची त्यांना बरीचशी माहिती होती. त्यामुळे त्यांनी गुन्हा करण्यासाठी कल्याण परिसराची निवड केली होती, असेही सिंग यांनी सांगितले.

टोळीच्या कारवाया८ एप्रिलला रात्री दीड वाजता शहाड येथील मोहने रोडवरील सिद्धिविनायक डेव्हलपर्सच्या कॉम्प्लेक्समधील सुरक्षारक्षक दीपककुमार महतू व संजय यादव या दोघांवर जीवघेणा हल्ला.

९ एप्रिलला रात्री १२.३० वाजता शहाड येथील लेबर कॅम्पमधील सुरक्षारक्षक दीपक भोईर यांची हत्या. मृतदेह वाळूच्या ढिगाऱ्याखाली पुरला.

१० एप्रिलला पहाटे तीन वाजता शहाड येथील मंगेशी पॅरेडाइजचे बांधकाम साइडवरील सुरक्षारक्षक संजय बाकेलाल यांच्यावर जीवघेणा हल्ला.

१३ एप्रिलला रात्री दीड वाजता शहाड येथील साईराम सोसायटीत रहाणाऱ्या प्रिया दरवडे या तरुणीची हत्या.एखाद्या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्य़ात अल्पवयीन मुलाचा सहभाग असल्याचे समोर आले तर त्याच्याविरोधात इतर आरोपींप्रमाणे न्यायालयामध्ये खटला चालविण्यासंबंधीचा नवा कायदा केंद्र सरकारने केला आहे. शहाडमधील गुन्ह्य़ांचे गांभीर्य लक्षात घेऊन केंद्र शासनाच्या नव्या कायद्याच्या आधारे या गुन्ह्य़ातील १६ वर्षीय मुलाचा खटला इतर आरोपींप्रमाणे चालविण्यासाठी न्यायालयाकडे मागणी करणार आहोत.

– परमबीर सिंग, पोलीस आयुक्त, ठाणे