ठाणे : कळवा येथील महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल असलेल्या तरुणीने डॉक्टरसोबत वाद घालून त्यांच्यावर हल्ला केल्याचा प्रकार गुरुवारी उघडकीस आला आहे. याप्रकरणी महिलेविरोधात कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, याप्रकारानंतर शुक्रवारी सकाळी या महिलेने एका बाळालाही जन्म दिलेला आहे.

घोडबंदर येथील मानपाडा भागात एक २० वर्षीय तरुणी राहते. ती गर्भवती असल्याने उपचासाठी तिला छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गुरुवारी रात्री तेथील निवासी डॉक्टर धनश्री केळकर (२८) या तिचा रक्तदाब तपासत होत्या. मात्र, तपासणीसाठी ती महिला सहकार्य करत नव्हती. त्यामुळे धनश्री आणि महिलेत वाद सुरू झाले. त्यावेळी महिलेने धनश्री यांच्या चेहऱ्यावर लाथ मारली. तसेच रक्तदाब तपासणीचे यंत्र त्यांच्या अंगावर फेकून मारले. या मारहाणीत धनश्री यांच्या डोक्याला आणि नाकाला गंभीर दुखापत झाली. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी तरुणीविरोधात कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकारानंतर शुक्रवारी महिलेने एका बाळालाही जन्म दिलेला आहे.