चित्रफितीमुळे प्रकार उघडकीस; अदखलपात्र गुन्ह्यची नोंद

वसईत एका वाहतूक पोलिसाला मोटारसायकस्वाराने भर रस्त्यात बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. सोमवारी हा प्रकार घडला असला तरी गुरुवारी या मारहाणीची चित्रफीत समाजमाध्यमावर प्रसारित झाल्यानंतर हा प्रकार समोर आला. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे, मात्र त्याला अद्याप अटक करण्यात आली नाही.

वसई पश्चिमेच्या पार्वती क्रॉस येथे वसई वाहतूक पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी काळू मुंडे हे तैनात होते. सोमवारी संध्याकाळी सातच्या सुमारास ते कार्यरत असताना एक दुचाकीस्वार सिग्नल तोडून पुढे गेला. त्याला मुंडे यांनी अडवण्याचा प्रयत्न केला. त्यात हा दुचाकीस्वार तोल जाऊन खाली पडला. हे पाहून अन्य दुचाकीस्वार सोहेल मेनन पुढे आला आणि त्याने मुंडे यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

मुंडे यांच्याशी शाब्दिक बाचाबाची होताच त्याने मुंडे यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. भर रस्त्यात ही मारहाण सुरू होती मात्र कुणी पोलिसांच्या मदतीला आले नाही. मुंडे यांनी तक्रार दिल्यानंतर माणिकपूर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला होता.

गुरुवारी या मारहाणीची चित्रफीत प्रसारित झाल्यानंतर हा प्रकार समोर आला आणि सर्वत्र संतापाची लाट पसरली. वसई वाहतूक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संपत पाटील यांनी या चित्रफितीची दखल घेऊन तक्रार दाखल केली आणि मेनन याच्यावर शासकीय कामात अडथळा, मारहाण आदी गुन्हे दाखल केले. सोहेल हा इस्टेट एजंट आहे. तो फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

वाहतूक पोलीस मुंडे यांने सुरवातीला बाचाबाची झाली एवढेच सांगितल्याने अदखलपात्र गुन्हा दाखल केला. पण चित्रफित पाहिल्यानंतर या घटनेची गंभीरता लक्षात आली असे माणिकपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांनी सांगितले. आम्ही त्याच्या मोबाईल फोन ट्रेसिंगवर टाकला असून लवकरात लवकर त्याला अटक करू असे सांगितले.

त्याघटनेच्या आठवणी ताज्या

काही वर्षांपूर्वी वसई स्थानक परिसरातील हॉटेल ऋषिकेशसमोर एका रिक्षाचालकाने अनिल ऐतवडेकर या वाहतूक पोलिसाच्या अंगावर रॉकेल ओतून त्याला जिवंत जाळले होते. आजच्या या प्रकरणानंतर या घटनेच्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्य. पोलिसांवर हल्लय़ाचा हा प्रकार गंभीर असून सर्व संताप व्यक्त होत आहे.