भगवान मंडलिक

कोळे गाव प्रभागातील रहिवाशांची कल्याण-डोंबिवली प्रशासनाकडे तक्रार

कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीतील २७ गावांमधील कोळे गाव प्रभागातील पालिकेची एक मालमत्ता गावातील तरुणांनी ताब्यात घेऊन तिथे व्यायामशाळा सुरू केली आहे. मात्र याची खबरच पालिका प्रशासनाला नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

कोळेच्या नगरसेविका शैलजा भोईर काही महिन्यांपासून पालिका स्तरावर प्रयत्नशील आहेत. त्यांच्या सूचना वा पत्रांची दखल प्रशासनाकडून घेतली गेलेली नाही.

१ जून २०१५ पूर्वी कल्याण डोंबिवली पालिकेत येण्यापूर्वी २७ गावांमध्ये जिल्हा परिषदेचे प्रशासन होते. ग्रामपंचायतींच्या माध्यमातून गावांचा कारभार पाहिला जात होता. कोळेतील ग्रामपंचायतीच्या वास्तुची पडझड झाल्यामुळे जिल्हा परिषदेने २०१४ मध्ये १० लाख रुपयांचा निधी कोळे ग्रामपंचायतीला उपलब्ध करून दिला. या निधीतून ग्रामस्थ लालचंद भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली एक हजार चौरस फुटाच्या क्षेत्रावर प्रशस्त ग्रामपंचायत कार्यालय बांधण्यात आले.

ग्रामपंचायतीची नवीन इमारत बांधून पूर्ण झाल्यानंतर जून २०१५ मध्ये २७ गावे पालिकेत समाविष्ट करण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या २७ गावांमधील सर्व मालमत्ता पालिकेकडे वर्ग झाल्या.

ही नवीन वास्तूही पालिकेत वर्ग झाली. जुन्या ग्रामंचायत कार्यालयात तात्पुरते पालिकेचे कार्यालय सुरू करण्यात आले होते. हे कार्यालय कोळे जिल्हा परिषदेच्या कार्यालयात नवीन वास्तुची उभारणी होईपर्यंत स्थलांतरित करण्यात आले होते. नवीन वास्तू बांधून पूर्ण झाल्यावर त्याला लालचंद भोईर यांनी कुलूप लावले. चाव्या पालिकेकडे हस्तांतरित केल्या.

कोळे प्रभागाच्या नगरसेविका शैलजा भोईर यांनी पालिका आयुक्त, ‘ई’ प्रभाग अधिकारी यांना गेल्या तीन वर्षांत अनेक पत्र देऊन कोळेतील नवीन ग्रामपंचायतीची वास्तू ताब्यात घ्या म्हणून पत्रव्यवहार केला.

गेल्या दीड वर्षांपूर्वी कोळे गावातील तरुणांनी ग्रामपंचायतीच्या नवीन वास्तुला लावलेले कुलूप तोडून त्या वास्तूत व्यायाम शाळा सुरू केली. या शाळेकडून पालिकेला भाडे मिळत नसल्याचे समजते. या गंभीर विषयाकडे पालिका अधिकारी लक्ष देत नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. या वास्तूत पालिकेने वीज मीटरचीही व्यवस्था करण्यात आले आहे.

२७ गावांचे ग्रामपंचायतीमधून मिळालेले सर्व दप्तर प्रभाग कार्यालयांमध्ये पडून आहे. ही दप्तरे मालमत्ता विभागाकडे पाठवा म्हणून सतत प्रभाग अधिकाऱ्यांना तगादा लावण्यात येत आहे. त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नाही. कागदोपत्री माहिती मालमत्ता विभागाला प्रभागाकडून प्राप्त होत नसल्यामुळे मालमत्ता ताब्यात घेण्याचा विषय रखडला आहे. त्याचा फटका कोळेसारख्या मालमत्तांना बसत आहे.

-अमित पंडित, सहाय्यक आयुक्त, मालमत्ता विभाग, कडोंमपा.