वसई : नालासोपारा येथील वालईपाडय़ात सापडलेल्या विकास बावधाने या तरुणाच्या निर्घृण हत्येचा छडा लावण्यात तुळींज पोलिसांना यश आले आहे. प्रेमसंबंधातून ही हत्या झाल्याचे उघडकीस आले आहे. तुळींज पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून अवघ्या ३६ तासांत एका आरोपीला अटक केली. आरोपीचे विकासच्या प्रेयसीवर एकतर्फी प्रेम होते. त्याला विकासचा अडथळा वाटत असल्याने त्याने त्याची हत्या केली.

नालासोपारा पूर्वेच्या नालेश्वर नगर येथील वालईपाडय़ाच्या जंगलात सोमवारी संध्याकाळी पोलिसांनी विकास बावधाने (१९) या तरुणाचा छिन्नविच्छिन्न अवस्थेमधील मृतदेह सापडला होता. या मृतदेहाचे धड आणि शिर धारदार शस्त्राने कापून वेगळे करण्यात आले होते. घटनास्थळी सापडलेल्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावरून त्याची ओळख पटली होती.

ही निर्घृण हत्या असल्याने तुळींज पोलिसांनी तपासासाठी विशेष पथक स्थापन केले होते. विकास बावधाने हा मूळचा सातारा जिल्ह्य़ातील पाटण तालुक्यात राहणारा होता. तो मुंबईच्या एका प्रसिद्ध हलवायाच्या दुकानात कामाला होता. त्याचे सोपारा येथील नात्यातील एका मुलीवर प्रेम होते. या मुलीवर विश्वास बावधने (२२) हा तरुणही एकतर्फी प्रेम करत होता. त्याला विकासचा अडथळा वाटत होता आणि त्यामुळे त्याने विकासची हत्या करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्याने साताऱ्याहून चाकू आणला होता. सोमवारी त्याने विकासला फोन करून नालासोपारा येथे भेटण्यासाठी बोलावले. या प्रकरणाची चर्चा करण्यासाठी त्याला रिक्षात बसून वालईपाडय़ाच्या निर्जन जागेत नेले आणि तेथे त्याची हत्या केली.

पोलिसांच्या पथकाने कराड येथून आरोपी विश्वासला अटक केली. या हत्येत आणखी कुणाचा सहभाग होता का याचा पोलीस तपास करीत आहेत. ही प्रेम प्रकरणातून झालेली हत्या असल्याची माहिती नालासोपारा विभागाचे उपअधीक्षक दत्ता तोटेवाड यांनी दिली. आरोपीला अटक केली असून त्याची चौकशी सुरू असल्याचे ते म्हणाले. तुळींज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॅनियल बेन, पोलीस निरीक्षक अप्पासाहेब लेंगरे यांच्या पथकाने तपास करून अवघ्या ३६ तासांत आरोपीला गजाआड करण्यात यश मिळवले आहे.