भाविकांनी अभिषेकासाठी आणलेले दुध अडीचशे श्वानांना पाजले

महाशिवरात्रीनिमित्त ठाणे, कल्याण येथील अनेक शिवमंदिरातील पिंडीवर हजारो लिटर दुधाचा अभिषेक करण्यात आला. एकीकडे भक्तगण रांगा लावून देवाला प्रसन्न करण्यासाठी मंदिरांमध्ये दुधाचा अभिषेक करत असताना डोंबिवलीत मात्र काही अवलिये पिंडीवर अभिषेकासाठी नेले जाणारे दूध गोळा करण्याच्या कामात गुंतले होते. प्लँट अ‍ॅण्ड अ‍ॅनिमल वेल्फेअर सोसायटी आणि रोटरॅक्ट क्लब ऑफ डोंबिवली सन सिटी या संस्थांचे सदस्य असलेल्या तरुणांनी एकत्र येऊन या दिवशी मंदिराच्या आवारात भाविकांकडून तब्बल ९० लिटर दूध जमा केले. या वेळी अभिषेक केलेले दूध गाळून तेही गोळा करण्यात आले. त्यानंतर हे दूध अडीचशे श्वानांना देऊन त्यांच्या आहाराची व्यवस्था या कार्यकर्त्यांनी केली. तसेच काही दूध अनाथ आश्रमात देण्यात आले, तर काही मांजरांना देण्यात आले.

महाशिवरात्री दिवशी अनेक शिवमंदिरात पिंडीवर दुधाचा अभिषेक झाल्यावर मोठय़ा प्रमाणावर दुधाची नासाडी होत असते. हे थांबवण्यासाठी भाविकांच्या श्रद्धेला धक्का न पोहचवता या तरुणांनी हा उपक्रम राबविला. मुक्या प्राण्यांना दूध पाजले तर खऱ्या अर्थाने ते देवापर्यंत पोहचेल, असा आशय असणारे फलक घेऊन हे डोंबिवलीकर तरुण विविध शिवमंदिर परिसरात उभे होते. याच ठिकाणी दूध जमा करण्यासाठी पिंप ठेवण्यात आले होते. मंदिरात रांगा लावून असलेल्या भविकांकडून विनंती करून दूध गोळा केले जात होते. तसेच काही ठिकाणी पिंडीवर अभिषेक केलेले दूध गाळण लावून पुजाऱ्यांच्या मदतीने गोळा करण्यात आले. यानंतर गोळा केलेले दूध सावरकर मार्ग, फडके मार्ग, गार्डन, ठाकुर्ली मार्ग, नेहरू मैदान परिसर, टिळकनगर, संकेश्वर, मानपाडा शिवमंदिर या ठिकाणी तरुणांनी महाशिवरात्री दिवशी श्वानांना दूध देऊ केले. याव्यतिरिक्त काही मांजरांनादेखील दूध देण्यात आले.

तरुणांनी मंदिरात अभिषेकासाठी येणाऱ्या भाविकांशी संवाद साधला. विशेष म्हणजे आपले दान सत्कारणी लागेल याची जाणीव झालेल्या अनेक भाविकांनी अभिषेकासाठी आणलेले दूध श्वानांसाठी या तरुणांकडे दिले. जमा झालेल्या ९० लिटर दुधापैकी २० ते २५ लिटर दूध डोंबिवलीतील जननी आशीष अनाथालयात पोहचवण्यात आले. मंदिराच्या संस्थानिक आणि पुजाऱ्यांनीसुद्धा तरुणांच्या या उपक्रमाला सहकार्य केले.

गेल्या वर्षी समाजमाध्यमांवर महाशिवरात्री दिवशी होणारी दुधाची नासाडीविषयी ऐकले होते. या दिवशी होणाऱ्या दुधाचा नाश टाळण्यासाठी काहीतरी करावे या उद्देशाने रोटरॅक्ट क्लबच्या सहकार्याने हा उपाय योजला. अनपेक्षितरीत्या पुजारी आणि भाविकांनी या उपक्रमाला उत्तम प्रतिसाद दिला. पुढील वर्षीदेखील महाशिवरात्रीला असा उपक्रम राबवणार आहोत.

– नीलेश भणगे, संस्थापक, प्लँट अ‍ॅण्ड अ‍ॅनिमल वेल्फेअर सोसायटी

(((   भाविकांकडून गोळा केलेले दूध श्वानांना देण्यात आले.   ))