पदार्थ, त्यांचे प्रकार जवळपास सर्वत्र सारखेच मिळत असले तरी खाण्याची जागा, त्याची रचना यामुळे त्या ठिकाणाचे आकर्षण अधिक वाढते. उदरभरण आणि समाधान या दोन्ही गोष्टींचा मेळ साधत काही हॉटेल, फूड कॉर्नर खवय्यांना आपल्याकडे आकर्षित करत आहेत. नव्या कल्याणमधील ‘यम्मी बाइट’ हे कॉर्नर यापैकीच एक आहे.

नव्या कल्याणमधील ‘यम्मी बाइट’ हे असेच एक नवे कॉर्नर सध्या बरेच लोकप्रिय आहे. परिसरातील खवय्यांची तिथे गर्दी असते. खडकपाडा मार्गावरून सरळ जाताना रस्त्याच्या उजव्या बाजूला या आकर्षक रंगीबेरंगी दुकानाकडे सहज कुणाचेही लक्ष जाते. पिवळ्या आणि काळ्या रंगात रंगलेल्या या दुकानाची बांधणी अगदी सरळ-सोप्प्या पद्धतीने करण्यात आली आहे. जितकी सोपी या दुकानाची बांधणी आहे, तितकीच कठीण येथे मिळणाऱ्या पदार्थाची यादी आहे. पिझ्झा पासून ते सँडविचपर्यंत सारेच पदार्थ येथे अगदी माफक दरात उपलब्ध आहेत. मात्र यादीतील जंत्री पाहून नवखे खवय्ये गांगरून जातात. मग शेजारचा एखादा पूर्वानुभवी त्यांना ‘हे ट्राय करून पाहा, ते खाऊन पाहा’ अशा टिप्स देतो.

यम्मी बाइटस् या दुकानात एकूण ८ प्रकारचे पिझ्झा, ४ प्रकारचे पास्ता, ७ प्रकारचे सँडविच, ४-५ प्रकारचे सब-सँडविच, विविध प्रकारचे बर्गर आणि फ्रेंच फ्राईज मिळतात. येथे मिळणारे पिझ्झा आणि सब-सँडविच ही या दुकानाची खासियत आहे. ऑरिगॅनो आणि चीजयुक्त मार्गरिटा पिझ्झा, कांदा, सिमला मिरची, टॉमेटोयुक्त व्हेज क्रन्च पिझ्झा किंवा पनीर, अ‍ॅलपिनो, ऑलिव्ह, सिमला मिरची, मशरूम, बेबीकॉर्नयुक्त हवायिन पिझ्झा असे विविध प्रकारचे पिझ्झा या दुकानाच उपलब्ध आहेत. टॉमेटो सॉस, पनीर, ब्रॉकोली, मशरूम युक्त एग्झॉटिका या पिझ्झाला खवय्यांनी विशेष दाद दिली आहे. ‘यम्मी बाइटस्’मध्ये मिळणाऱ्या प्रत्येक पदार्थामध्ये वापरला जाणारा सॉस याच दुकानामध्ये तयार केला जातो. दिवसाला साधारण एक ते दीड किलो सॉस इथे बनवला जातो. येथे मिळणारे पिझ्झा हे शेजवान सॉस आणि तंदुरी सॉस अशा दोन प्रकारच्या सॉसमध्ये तयार केले जातात. आलू पॅटी, चीज आणि वेगवेगळ्या सॉसचा वापर करून तयार केले जाणाऱ्या सब सँडविचाही खप चांगला होतो. दुकानात दोन प्रकारच्या सॉसमध्ये पास्ता तयार केला जातो. अरबिता पास्ता हा लाल रंगाच्या सॉसमध्ये तर व्हाइट सॉस पास्ता हा सफेद रंगाच्या सॉसमध्ये तयार केला जातो. ‘यम्मी बाइटस्’मध्ये मिळणारे सँडविचही आकाराने बरेच मोठे आणि चीजयुक्त असते. पिझ्झा-बर्गरपासून पास्ता, फ्राइजपर्यंत सर्वच पदार्थ हे १५० रुपयांच्या आतच मिळतात. त्यामुळे अगदी कमी पैशात प्रत्येक खवय्या भरपेट खाऊन जातो. आशीष हलपतराव आणि दीपक पवार या दोन मित्रांनी एकत्र येऊन काही महिन्यांपूर्वी ‘यम्मी बाइटस्’ हे दुकान उघडले आहे. आमच्या इथल्या पदार्थाची चव हेच आमच्या व्यवसायाचे भांडवल आहे. त्यामुळे एकदा खाऊन गेलेली व्यक्ती पुन्हा पुन्हा इथे येते. तसेच इतरांकडेही आमची शिफारस करते. त्यामुळेच ‘यम्मी बाइटस्’ इतके लोकप्रिय होऊ शकले, असे त्यांनी सांगितले.

यम्मी बाइटस्

*  कुठे?-  अमृतपार्क दुकानासमोर, वायलेनगर,  खडकपाडा, कल्याण (प.)

* कधी? – दुपारी ३.३० ते रात्री ११.३०