खासगी रुग्णालयांतील सशुल्क लसीकरणाला शून्य प्रतिसाद; केवळ नवी मुंबईत व्यवस्था

जयेश सामंत, लोकसत्ता

ठाणे : देशातील बडय़ा उद्योग समूहांशी संबंधित असलेल्या रुग्णालयांनी आपले वजन खर्ची घालत थेट लस उत्पादक कंपन्यांकडून साठा मिळवून मुंबई, नवी मुंबईत आतापर्यंत २० पेक्षा अधिक ठिकाणी खासगी लसीकरणाचा मार्ग प्रशस्त केला आहे. मात्र, ठाणे, कल्याण-डोंबिवली या शहरांना अजूनही सशुल्क लसीकरणाची प्रतीक्षा आहे. ठाणे जिल्ह्य़ातील १५ पेक्षा अधिक रुग्णालयांनी १ मे पासून लस उत्पादक कंपन्यांकडे लशींसाठी पाठपुरावा सुरू केला असून यापैकी एकाही रुग्णालयाला उत्पादकांकडून प्रतिसाद मिळालेला नाही.

खासगी रुग्णालयांच्या पदरी सतत निराशा येत असल्याने ठाणे जिल्ह्य़ातील तीन हजारांपेक्षा अधिक लघुउद्योजकांनी आपल्या कामगारांना लस मिळावी असे साकडे थेट उत्पादक कंपन्यांना घातले आहे. यासाठी त्यांनी जम्बो लसीकरण केंद्रे सुरू करण्याची तयारीही दर्शवली आहे.  केंद्र सरकारच्या नव्या लसपुरवठा धोरणाचा फायदा उचलत मुंबईस्थित काही बडय़ा रुग्णालयांनी थेट उत्पादकांकडून लशींचा पुरवठा मिळविण्यास सुरुवात केली आहे. काही खासगी रुग्णालयांनी खासगी कंपन्यांशी करार करून त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी सशुल्क लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. नवी मुंबईतही अपोलो रुग्णालयामार्फत दररोज तीन केंद्रावर एक हजार जणांचे सशुल्क लसीकरण केले जाते.

ठाण्याला लागून असलेल्या या शहरांमध्ये सशुल्क लसीकरणाचा मार्ग दिवसेंदिवस प्रशस्त होत असताना ठाणे, कल्याण डोंबिवली यासारख्या जिल्ह्य़ातील मोठय़ा शहरांमधील एकाही खासगी रुग्णालयाला सशुल्क लसीकरणासाठी उत्पादक कंपन्यांकडून दाद दिली जात नसल्याचे समोर येत आहे.  मध्यंतरी ठाण्यातील वर्तकनगर परिसरातील एका रुग्णालयात बडय़ा उद्योग समूहाच्या पुढाकाराने कंपनीतील कर्मचारी, अधिकारी वर्गासाठी लसीकरणाची सुविधा सुरू केली होती. हा एकमेव अपवाद वगळता जिल्ह्य़ातील १५ पेक्षा अधिक रुग्णालयांच्या मागणीला उत्पादक कंपन्यांकडून प्रतिसाद देखील मिळत नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ठाणे महापालिकेची एकूण ४७ लसीकरण केंद्रे आहेत. तर, शहरात १४ खासगी रुग्णालयात लसीकरण केंद्रे आहेत. लस तुटवडय़ामुळे पालिकेची अनेक लसीकरण केंद्रे बंद ठेवण्यात आली आहेत. जिल्ह्य़ातही वेगळी परिस्थिती नाही. नवी मुंबईचा अपवाद वगळता संपूर्ण जिल्ह्य़ात सर्वच खासगी रुग्णालयांमधील लसीकरण बंद झाले आहे.

लघुउद्योजकांची धडपड

एकाही खासगी रुग्णालयाला लशींचा पुरवठा होत नसल्याने अखेर जिल्ह्य़ातील वेगवेगळया लघुउद्योजक संघटनांनी उत्पादक कंपन्यांशी संपर्क साधून सशुल्क लसपुरवठा करण्याची विनंती केली आहे. ठाणे जिल्ह्य़ात लघु आणि मध्यम स्वरूपाचे पाच हजारांपेक्षा अधिक कंपन्या असून त्यामधून हजारोंच्या संख्येने कर्मचारी काम करतात. ठाणे आणि आसपासच्या परिसरातील लघुउद्योजक संघटनेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ठाणे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनने (टिस्सा) आपल्या सदस्य असलेल्या ३२०० लघुउद्योगांमधील ३० हजारांपेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना सशुल्क लशींचा पुरवठा केला जावा, अशी मागणी दोन्ही लस उत्पादक कंपन्यांकडे नोंदवली आहे, अशी माहिती टिस्साचे खजिनदार तसेच ठाणे व्यापारोद्योग महासंघाचे सचिव भावेश मारु यांनी ‘लोकसत्ता’ला दिली. मात्र, अजूनही उत्पादक कंपन्यांकडून उत्तर मिळालेले नाही, असे ते म्हणाले.

मुंबई, नवी मुंबईच्या धर्तीवर ठाणे, डोंबिवली, कल्याण परिसरात सशुल्क लसीकरण सुरू व्हावे यासाठी आपण काही रुग्णालयांशी चर्चा करत आहोत. मुंबई, नवी मुंबईतील खासगी रुग्णालयांना प्रयोगिक तत्त्वावर त्यांची लसीकरण केंद्र ठाणे जिल्ह्य़ात सुरु करता येतील. त्यासाठी आवश्यक जागा आणि इतर सुविधांचा पुरवठा कशाप्रकारे उपलब्ध करून देता येईल यावर चर्चा सुरू आहे.

– डॉ.श्रीकांत शिंदे, खासदार, कल्याण