15 July 2020

News Flash

पालिकेच्या शून्य कचरा मोहिमेचा  ‘कचरा’

पेटय़ा हटवल्यानंतरही ढीग कायम

पेटय़ा हटवल्यानंतरही ढीग कायम

रोशनी खोत, लोकसत्ता

डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आखलेल्या शून्य कचरा मोहिमेचा पहिल्या काही दिवसांतच फज्जा उडाल्याचे चित्र जागोजागी दिसू लागले आहे. नागरिकांनी घरातच कचऱ्याचे ओला आणि सुका अशाप्रकारे वर्गीकरण करावे यासाठी महापालिकेने काही दिवसांपासून शहरातील कचरापेटय़ा हटविल्या आहेत. या नियमांचे जे रहिवाशी पालन करणार नाहीत त्यांना दंड आकारला जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे. असे असतानाही कल्याण-डोंबिवलीकर पालिकेचे ऐकायला तयार नाहीत असे चित्र आहे.

ओला आणि सुका कचऱ्याचे घरातच वर्गीकरण करावे या आवाहनाला कल्याण-डोंबिवलीतील अनेक भागांमध्ये रहिवाशांनी केराची टोपली दाखवली आहे. ज्या ठिकाणी कचरापेटय़ांची जागा निश्चित केली होती, तेथेच कचरा रिकामा केला जात असल्याने शहरात जागोजागी कचऱ्याचे ढीग दिसू लागले आहेत. करोनाकाळात बेशिस्त नागरिकांना शोधून त्यांना दंड आकारणीची नवी मोहीम आता पालिकेस हाती घ्यावी लागत आहे.

चाळींत गाडय़ाच येत नाहीत

शहरांमधील गृहसंकुलांमध्येच शून्य कचरा मोहिमेसाठी नियोजन करण्यात आले आहे. शहरांतील चाळीच्या ठिकाणी मात्र गैरसोयी आहेत. शहरातील अनेक ठिकाणी चाळींमध्ये कचरा संकलनासाठी गाडय़ाच येत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे कचरापेटय़ा असलेल्या ठिकाणीच कचरा टाकावा लागत असल्याची माहिती डोंबिवली शहरातील चाळीत राहणाऱ्या नागरिकांनी दिली.

पालिका हतबल

ओल्या कचऱ्याचे पालिकेच्या वतीने रोज संकलन केले जाणार आहे. यात सुका कचरा आठवडय़ातून एका दिवशी संकलित केला जाणार आहे. या प्रक्रियेमुळे शहरातील कचऱ्याची विल्हेवाट लावणे सोपे जाणार आहे. कचरा संकलनाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी महापालिका प्रशासनाने शहरातील कचरापेटय़ा हटवल्या आहेत. तसेच उघडय़ावर कचरा टाकल्यास दंड आकरण्यात येणार असून यावर लक्ष ठेवण्यासाठी महापालिका प्रशासनाने पथकेही नेमली आहेत. तरीही काही नागरिकांची बेशिस्ती कायम आहे. गाडय़ांमध्ये कचरा टाकण्याऐवजी कचरापेटय़ा असलेल्या ठिकाणीच कचरा टाकत असल्याचे चित्र आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 26, 2020 5:40 am

Web Title: zero waste campaign unsuccessful in kalyan dombivli zws 70
Next Stories
1 उल्हासनगरात व्यापाऱ्यांवर पुन्हा कारवाई
2 संक्रमित नसताना ६० दिवसांचा बंदिवास
3 रिक्षा भाडेवाढीची टांगती तलवार?
Just Now!
X