26 September 2020

News Flash

‘झोपू’ संशयितांना आता ‘लाचलुतपत’ चा बडगा ?

अभियंत्यांची ही लाचखोरी नंतर सीडीत बंदिस्त करण्यात आली.

लाचखोर अभियंत्यांविरोधातील तक्रारीनंतर पोलिसांच्या पालिकेत फेऱ्या

कल्याण-डोंबिवली पालिकेतील माजी शहर अभियंता पाटीलबुवा कारभारी उगले, कार्यकारी अभियंता दीपक भोसले हे एका ठेकेदाराकडून विकासकामाची नस्ती मंजूर करण्याच्या बदल्यात पैसे घेत असल्याचे वृत्त गुरुवारी प्रसिद्ध होताच, पालिकेत खळबळ उडाली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने पालिकेत भेट देऊन घडलेल्या घटनेचा आढावा घेतला असल्याचे समजते. या प्रकरणातील दोषी तिन्ही अभियंते आणि या अधिकाऱ्यांची पाठराखण करणाऱ्या अधिकाऱ्यावर तातडीने कारवाई करण्यात यावी, अशी मागणी एका जागरूक नागरिकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक सतीश माथूर यांच्याकडे केली आहे.

या लाचखोरीप्रकरणी राज्याचे मुख्य सचिव, नगरविकास सचिव, ठाणे पोलीस आयुक्त यांच्याकडे तक्रारी करण्यात आल्या आहेत. महापालिकेच्या स्थापनेपासून पालिकेला भ्रष्टाचाराचा विळखा आहे. पालिकेतील अधिकारी, कर्मचारी, त्यानंतर नगरसेवक अशी अखंड साखळी अनेक वर्षे पालिकेत विकासकामे करताना त्या बदल्यात ठेकेदाराकडून लाच घेण्याची कामे करीत आहेत. गेल्या पंचवीस वर्षांत पालिकेतील सुमारे २५ ते ३० कर्मचारी, अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेताना पकडले आहेत. उपायुक्त, कार्यकारी अभियंता दर्जाच्या अधिकाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे.

असे असताना तात्कालीन शहर अभियंता पाटीलबुवा उगले, कार्यकारी अभियंता दीपक भोसले हे एका ठेकेदाराकडून कामाच्या बदल्यात पैसे घेत असल्याचे एका ठेकेदाराने गुप्त छायाचित्रण करून आपल्या कॅमेऱ्यात कैद केले. अभियंत्यांची ही लाचखोरी नंतर सीडीत बंदिस्त करण्यात आली. एका पालिका कर्मचाऱ्याला ही लाचखोरी सहन न झाल्याने त्याने याप्रकरणी नाव गुलदस्त्यात ठेवून मुख्यमंत्री, नगरविकास विभागाकडे तक्रारी केल्या होत्या.

या सीडीची चर्चा कल्याण-डोंबिवलीत सुरू झाल्यानंतर, या सीडीमध्ये उगले, भोसले हे एका ठेकेदाराकडून कामाच्या बदल्यात लाच घेत असल्याचे उघड झाले. पालिकेतील लाचखोरीची ही कीड कायमची नष्ट करण्यासाठी उगले, भोसले या दोन्ही अभियंत्यांना आयुक्तांनी तातडीने निलंबित करावे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या सीडीची तपासणी करून या दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी दक्ष नागरिक कौस्तुभ गोखले यांनी ‘एसीबी’कडे केली आहे. या लाचखोर अभियंत्यांची पालिकेतील कोणाही पदाधिकारी, अधिकाऱ्याने पाठराखण केली तर त्यांनाही या सगळ्या प्रकरणात सहआरोपी करण्यात यावे, असे तक्रारीत म्हटले आहे. या दोषी अभियंत्यांवर कारवाई करण्यासाठी पालिका प्रशासन, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने टाळाटाळ केली, तर याप्रकरणी उच्च न्यायालयात दाद मागण्यात येईल, असे तक्रारदाराने सूचित केले आहे.

पालिकेच्या झोपडपट्टी पुनर्वसन योजना घोटाळ्यात तात्कालीन शहर अभियंता पाटीलबुवा उगले हे दुसऱ्या क्रमांकाचे आरोपी आहेत. बाजारपेठ पोलीस ठाण्यात याप्रकरणी प्राथमिक तपासणी अहवाल दाखल करण्यात आला आहे. ‘झोपु’ घोटाळ्याचा गुन्हा दाखल झाल्यानंतर प्रशासनाने उगले यांना रजेवर पाठविले होते. आयुक्त ई. रवींद्रन या लाचखोरीच्या प्रकरणात काय भूमिका घेतात, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे. या लाचखोरीच्या प्रकरणी एकही पालिका अधिकारी उघडपणे प्रतिक्रिया देण्यास तयार नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 1, 2016 3:27 am

Web Title: zopu yojana scam in kdmc 3
Next Stories
1 वेशीवरचे गावपाडे : जंगलाचे राखणदार..
2 सहज सफर : शनिच्या सानिध्यात निसर्गसफर
3 प्रासंगिक : कलेचा आनंदी आविष्कार..!
Just Now!
X