ठाणे : शिळ-मुंब्रा, कळवा, भिवंडी परिसरात १ लाख ९३ हजार कायमस्वरूपी खंडित (पीडी) वीज मीटरचे थकबाकीदार असून त्यापैकी केवळ १ हजार ७०० थकबाकीदारांनी विलासराव देशमुख अभय योजनेत थकीत रक्कम भरल्याची बाब समोर आली आहे. उर्वरित थकबाकीदारांनी अद्याप थकीत रक्कम भरलेली नसून या थकीत रक्कमेची वसूली करण्यावर टोरंट कंपनीने भर देण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून ३१ ऑगस्टपर्यंत लागू असलेल्या अभय योजनेंतर्गत थकीत रक्कम भरण्याचे आवाहन टोरंट कंपनीने केले आहे. या मुदतीत रक्कम भरली नाहीतर संबंधितांवर कारवाई करण्याचा इशारा कंपनीने दिला आहे. हेही वाचा >>> Maharashtra News Live: पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस, जाणून घ्या महाराष्ट्रातील सर्व घडामोडी एकाच क्लिकवर शिळ-मुंब्रा, कळवा, भिवंडी परिसरात टोरंट कंपनीने वीज वितरण आणि वीज देयक वसुलीचे काम करते. या भागात मोठ्याप्रमाणात कायमस्वरूपी खंडित (पीडी) मीटरचे थकबाकीदार असल्याचे समोर आले आहे.शिळ-मुंब्रा, कळवा परिसरात सुमारे १ लाख १० हजार ग्राहकांकडे एकूण ३५९ कोटी रुपयांपेक्षा जास्त थकबाकी आहे. त्यापैकी १ हजार ५० ग्राहकांनी अभय योजनेंतर्गत थकबाकी भरली आहे. त्याचप्रमाणे भिवंडीत सुमारे ८३ हजार कायमस्वरूपी खंडित (पीडी) मीटरचे थकबाकीदार असून त्यांच्याकडे एकूण १ हजार १०० कोटी रुपयांपेक्षा जास्त थकबाकी आहे. त्यापैकी आतापर्यंत केवळ ६५० ग्राहकांनी अभय योजनेअंतर्गत थकबाकी भरली आहे. अभय योजना मार्च-२२ मध्ये महावितरणने कायमस्वरूपी खंडित (पीडी) मीटरची जुनी महावितरणची थकबाकी असलेल्या ग्राहकांसाठी विलासराव देशमुख अभय योजना लागू केली. ही योजना महावितरणची पीडी थकबाकी असलेल्या ग्राहकांना शंभर टक्के व्याज माफी देते. या योजनेद्वारे, ग्राहक केवळ मूळ रक्कम भरून त्यांच्या जमा झालेल्या थकबाकीतून मुक्त होऊ शकतात. या योजनेचा टोरंट पॉवर कंपनीने जनता दरबार तसेच इतर माध्यमातून प्रचार केला आहे. तरीही या योजनेस थकबाकीदारांचा कमी प्रतिसाद मिळाला आहे. ही योजनेची मुदत ३१ ऑगस्ट रोजी संपत असून ग्राहकांनी पुढे येऊन या योजनाचा लाभ घेण्याचे आवाहन टोरंट कंपनीने केला आहे. मूळ रकमेवर १० % सवलतीसह संपूर्ण व्याज माफी देणारी अशी योजना पुन्हा कधीही येणार नाही, असे कंपनीने म्हटले आहे. थकबाकीदारांना इशारा टोरंट कंपनीने ग्राहकांना ताकीदही दिली आहे की योजना पूर्ण झाल्यानंतर, जमा झालेली जुनी महावितरण थकबाकी, मीटर न घेण्याचे कारण सांगून वीजचोरी करणाऱ्या ग्राहकांवर टोरंट पॉवर नियमांनुसार कठोर कारवाई करेल, असे कंपनीने स्पष्ट केले आहे.