राज्यात प्रामुख्याने पुण्या-मुंबईत करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने लोकांच्या मनात संसर्गाबाबत अनाठायी भीती निर्माण झाली आहे. मात्र, ज्येष्ठ नागरिकही या आजारावर यशस्वीरित्या मात करु शकतात, हे एका १०६ वर्षांच्या आजीबाईंनी दाखवून दिलं आहे.

आनंदीबाई पाटील (वय १०६) या आजीबाईंना काही दिवसांपूर्वी करोनाची लागण झाली होती. त्यानंतर उपचारांसाठी त्यांना कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या सावळाराम कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या ठिकाणी यशस्वी उपचार घेतल्यानंतर आनंदीबीई या पूर्णपणे बऱ्या झाल्या आहेत. सर्व रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्जही देण्यात आला आहे.

वयाची शंभरी पार केलेल्या आजीबाईंच्या या धैर्याला आणि इच्छाशक्तीला सोशल मीडियातून अनेकांनी सलाम केला आहे. डॉ. राहुल घुले यांनी या आजीबाईंच्या डिस्चार्ज कार्डसह फोटो ट्विटरवरुन पोस्ट केला आहे. या फोटोत त्या स्मितहास्त करताना दिसत आहेत. त्यामुळे या ट्विटला प्रतिसाद देताना अनेक नेटकऱ्यांनी डॉक्टरांना धन्यवाद दिले आहेत. आपल्याला चांगल्या सेवेची गरज आहे नफेखोर सेवेची नाही, असंही एकानं म्हटलं आहे.