scorecardresearch

उत्तरप्रदेशातील सराफा व्यापाराची ११ लाख रुपयांची फसवणूक

उत्तरप्रदेशातील एका सराफा व्यापाऱ्याची काही भामट्यांनी ११ लाख रुपयांची फसणवूक केल्याचा प्रकार कळवा भागात उघडकीस आला आहे.

उत्तरप्रदेशातील सराफा व्यापाराची ११ लाख रुपयांची फसवणूक
प्रतिनिधिक छायाचित्र/लोकसत्ता

ठाणे: उत्तरप्रदेशातील एका सराफा व्यापाऱ्याची काही भामट्यांनी ११ लाख रुपयांची फसणवूक केल्याचा प्रकार कळवा भागात उघडकीस आला आहे. या व्यापाऱ्याला भामट्यांनी एक किलो सोन्याच्या बदल्यात ११ लाख रुपयांची मागणी केली होती. त्यामुळे हा व्यापारी या व्यवहारासाठी कळवा येथे आला होता. याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

फसवणूक झालेला ३३ वर्षीय सराफा व्यापारी हा उत्तरप्रदेश येथील हापुड जिल्ह्यात राहतो. तेथून ते संपूर्ण देशभरात सराफाचा व्यापार करत असतात. सुमारे दोन वर्षांपूर्वी त्यांची ओळख मुंबईतील संजीव नाईक या व्यक्तीसोबत झाली होती. त्यावेळी त्यांनी संजीव याला सोने खरेदी करायचे असल्याचे सांगितले होते. संजीवने त्यांना ठाण्यातील काहीजण सोन्याची विक्री करत असल्याचे सांगितले. तसेच सुनील आणि ईश्वर नावाच्या व्यक्तींचा मोबाईल क्रमांक दिला. सुमारे दीड वर्षांपासून त्यांचे या दोघांशी मोबाईल संभाषणाद्वारे व्यवसायिक चर्चा सुरू होती. २९ नोव्हेंबरला व्यापाऱ्याने सुनीलला एक किलो सोने खरेदी करायचे असल्याचे सांगितले. सुनीलने एक किलो सोन्याच्या बदल्यात त्यांना रोकड घेऊन ठाण्यात बोलावले. दुसऱ्याच दिवशी व्यापारी त्यांच्या दोन मित्रांसह ११ लाख रुपये घेऊन विमानाने मुंबईत आले.

हेही वाचा >>> डोंबिवलीत बुलेट चालकांचा धुमाकूळ, बुलेटच्या धडकेत आजोबा, नातू गंभीर जखमी

त्यानंतर गुरुवारी सकाळी ११ वाजता सुनीलने त्यांना संपर्क साधून कळवा नाका येथे बोलावले. व्यापारी आणि त्याचे मित्र कळवा नाका येथे उबर कारने त्याठिकाणी आले असता, सुनीलने त्याचा आणखी एक साथिदार सुधीर हा कळवा नाक्याला भेटणार असल्याचे सांगितले. सुधीर त्यांना भेटला. त्याने त्याच्याकडे असलेल्या बॅगेतील सोन्याची बिस्किटे त्यांना दाखविली. मी रस्त्यात व्यवहार करणार नसून कार्यालयात येऊनच पैसे देणार असल्याचे त्यांनी सुनीलला संपर्क करून सांगितले. त्यानंतर सुधीरने त्या व्यापाऱ्याला कार्यालयात नेतो असे सांगितले. त्यांची कार कळवा येथील सहकार शाळेजवळ आली असता, सुधीरने कार थांबवून व्यापाऱ्याकडून त्यांची पैशांची बॅग घेतली. तसेच पैसे मोजण्याचा बहाणा केला. त्याचवेळी मागून एक कार आली. त्यातून दोन व्यक्ती कारमधून उतरले. त्यांच्या हातात लाठी होती. तसेच डोक्यावर पोलिसांचे चिन्ह असलेली टोपी होती. त्यांनी सुधीरला पकडून त्यांच्या वाहनात बसविले. व्यापारी आणि त्यांच्या मित्रांनी त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला असता, भामट्यांनी लाठीने त्यांना ढकलून दिले. तसेच ते कारने पुढे निघून गेले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर व्यापाऱ्याने याप्रकरणी कळवा पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्याआधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-12-2022 at 15:34 IST

संबंधित बातम्या