कल्याण- मुसळधार पावसात, ढोल ताशांच्या गजरात कल्याण, डोंबिवलीतील भाविकांनी शनिवारी वाजत गाजत ११ हजार ५४७ गौरी-गणपतींचे विसर्जन केले. १५ सार्वजनिक मंडळांनी गणेश मूर्तीचे विसर्जन केले.
दुपारी १२ वाजल्यापासून सुरू झालेला मुसळधार पाऊस थांबत नसल्याने गणेश भक्तांनी सायंकाळी भरपावसात वाजत गाजत गणपती विसर्जन मिरवणुकांना सुरूवात केली. रस्तोरस्ती ‘गणपती बाप्पा मोरया’ चा जयघोष सुरू होता.
हेही वाचा >>> कोल्हापुर सह जिल्ह्यात ३ लाखांहून अधिक मूर्तींचे पर्यावरण पूरक विसर्जन
दुर्गाडी किल्ला गणेश घाट, काळा तलाव, गौरीपाडा तलाव, आधारवाडी तुरुंग तलाव, डोंबिवलीत गणेशघाट, गणेशनगर घाट, देवीचापाडा घाट अशा ६८ नैसर्गिक जलस्त्रोतांच्या ठिकाणी, तसेच शहराच्या भागात पालिकेने रस्तोरस्ती ६८ कृत्रिम तलाव तयार केले होते. या ठिकाणी भाविकांनी गणपतीचे विसर्जन केले.
पालिकेच्या १० प्रभागांमध्ये कृत्रिम तलाव तयार करण्यात आले आहेत. डोंबिवलीत कलारंग प्रतिष्ठानच्या सामुहिक गणेश विसर्जन मिरवणुकीला घरगुती गणेश भक्तांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मुसळधार पाऊस, गणपतीच्या मिरवणुका सायंकाळी सुरू होणार असल्याने रस्त्यांवरील वाहनांची वर्दळ कमी होती. शहरातील मुख्य, वर्दळीच्या रस्त्यांवर पोलीस, वाहतूक पोलीस तैनात होते.
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 11 thousand gauri ganpati immersed in kalyan dombivli zws