ठाणे जिल्ह्यातील महत्वाचं शहर म्हणून ओळख असलेल्या अंबरनाथ शहरात गेल्या काही दिवसांपासून करोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत चिंताजनक वाढ होताना दिसत आहे. सोमवारी शहरातील तब्बल १३० जणांचे अहवाल पॉजिटीव्ह आल्यामुळे एकच खळबळ माजली आहे. आतापर्यंत १२६९ जणांना करोनाची लागण झाली असून तब्बल ३१ जणांनी या विषाणूचा सामना करताना आपले प्राण गमावले आहेत.

पॉजिटीव्ह आढळणाऱ्या १३० रुग्णांपैकी बहुतांश रुग्ण हे याआधी करोनाबाधित व्यक्तींच्या संपर्कात आलेले आहेत. शहरातील ४७३ नागरिकांवर सध्या विविध रुग्णालयात उपचार सुरु असून २३४ जणांना होम क्वारंटाइन करण्यात आलं आहे. ५३१ लोकं करोनावर यशस्वीरित्या मात करत पुन्हा घरी परतले आहेत. अद्याप २८३ रुग्णांचे अहवाल येणं बाकी असल्यामुळे आगामी दिवसांमध्ये करोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.

दरम्यान शहरातील करोनाग्रस्त रुग्णांची वाढती संख्या पाहता स्थानिक प्रशासनाने, अंबरनाथ शहरात लॉकडाउन घोषित केलं आहे. यासंबंधी आदेश जारी करण्यात आला आहे. यानुसार मंगळवारपासून हा लॉकडाउन लागू होणार आहे. यादरम्यान शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकानं बंद राहणार आहेत. अंबरनाथ नगरपरिषदेकडून यासंबंधी अधिकृत आदेश जारी करण्यात आला आहे. आदेश सांगण्यात आलं आहे त्याप्रमाणे अंबरनाथ नगरपरिषद हद्दीत करोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढल्याने येथे आरोग्य विषयक आणि आपत्तीजनक परिस्थिती उद्भवलेली असून यासाठी अंबरनाथ नगरपरिषद प्रादूर्भाव टाळण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करत आहे. करोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्याच्या हेतूने सदर विषाणूंची संक्रमणाची साखळी तोडणं आवश्यक आहे. सदर साखळी तोडण्याच्या अनुषंगाने शहरातील गर्दी कमी करणं गरजेचं आहे. त्यामुळे करोना महामारीतून होणारी जीवितहानी आणि वित्तहानी टाळण्यासाठी उपाययोजना करणं अत्यावश्यक आहे.

करोनाचा फैलाव टाळण्यासाठी शहरातील गर्दी कमी करण्याच्या उद्धेशाने शहरातील सर्व अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकानं बंद राहणार आहेत. दूध, फळे, पालेभाज्या यांची घरपोच सेवा व दवाखाने सुरु असणार आहे. २३ जून ते ३० जून दरम्यान ही सर्व दुकानं बंद असणार असून नागरिकांनी गर्दी टाळण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. नियमांचं उल्लंघन करणाऱ्यावंर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.