कल्याण – नोकरीच्या शोधात असलेल्या एका महिलेला ऑनलाईन माध्यमातून विविध गुंतवणूक योजनांमध्ये गुंतवणूक करण्यास सांगून भामट्यांनी या महिलेची १३ लाख ९३ हजार रुपयांची फसवणूक केली आहे. या महिलेच्या तक्रारीवरून कोळसेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे.
नजमा मुकादम (३३) असे तक्रारदार महिलेचे नाव आहे. पतीसह नोकरीनिमित्त ती पुणे येथे राहते. काही काळासाठी ती कल्याणमधील आपल्या आईच्या घरी राहण्यास आली आहे. जानेवारी, फेब्रुवारी या कालावधीत हा फसवणुकीचा प्रकार घडला.




हेही वाचा – ठाणे : भरधाव कारच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू
नोकरीची गरज होती त्यावेळी या महिलेने आपली शैक्षणिक आणि इतर माहिती नोकरी डाॅट काॅम संकेतस्थळावर स्थापित केली होती. त्या माहितीचा आधार घेऊन एक दिवस एका भामट्याने नजमा यांना संपर्क केला. आपणास नोकरीसाठीची विचारणा होण्याची शक्यता असल्याने नजमाने भामट्याबरोबर बोलणे सुरू केले. नजमाला काही विषयांवर परीक्षण लिहिण्यास सांगण्यात आले. त्याचे मानधन तिला ऑनलाईन माध्यमातून मिळू लागले. विविध प्रकारच्या जुळण्या पाठवून महिला, पुरुष भामटे नजमा यांना पाच हजारांपासून ते सात लाखांपर्यंत भरणा करण्यास सांगू लागले. एवढी रक्कम भरणा केली तर त्यावर एवढे व्याज मिळेल, असे आश्वासन नजमा यांना देण्यात येऊ लागले.
मोठी रक्कम अडकून पडल्याने नजमा यांनी जवळील, कर्ज काढून, बँकेतील ठेव रकमा मोडून दोन महिन्यांच्या कालावधीत १३ लाख ९४ हजारांची रक्कम भरणा केली. भरलेल्या रकमा परत मिळण्याचे आश्वासन भामट्यांनी नजमाला दिले होते. प्राप्तिकराची चार लाखांहून अधिक रक्कम नजमा मुकादमला भरण्यास सांगण्यात आले. त्यावेळी ही रक्कम सरकारला भरावी लागते. आपली भामटे फसवणूक करत आहेत, याची जाणीव झाल्यानंतर आणि भरणा केलेली मूळ रक्कम नाहीच त्यावरील वाढीव व्याज न मिळाल्याने आपली फसवणूक भामट्यांनी केल्याने नजमा यांनी बुधवारी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार केली. माहिती व तंत्रज्ञान कायद्याने पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.