मद्यविक्रीबंदीमुळे कमी झालेले काम व आर्थिक चणचणीमुळे हॉटेलचालकांकडून कपात

सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय आणि राज्य महामार्गालगत ५०० मीटर अंतरापर्यंत मद्य विक्रीला बंदी केल्याने वसईतील हॉटेल व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत. कमी झालेले काम व आर्थिक चणचण यामुळे ४० बीअर बार आणि रेस्टॉरंट्समधील १४०० कर्मचाऱ्यांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे. हॉटेल व्यावसायिकांप्रमाणेच किराणा, भाजीपाला आणि चिकन पुरवठादारांच्या धंद्यालाही आर्थिक फटका बसला आहे.

१ एप्रिलपासून लागू झालेल्या राष्ट्रीय आणि राज्य महामार्गालगतच्या ५०० मीटर परिसरातील दारूबंदीमुळे ४० मद्यविक्री करणारी हॉटेल्स व २०हून अधिक बीअर शॉप्स आणि वाइन शॉप्स बंद झाले. मद्यपान करण्यासाठी हॉटेलमध्ये येणारे ग्राहक कमी झाल्याने काम आणि आर्थिक मोबदलाही कमी झाला. त्यामुळे प्रत्येक हॉटेलमधील किमान २५ ते ३० जणांना कमी करण्यात आले.

किरकोळ विक्रेत्यांवरही परिणाम

स्थानिक पुरवठादारांकडून या हॉटेलना दररोज किराणा, भाजीपाला आणि मासे, अंडी, चिकन-मटणचा पुरवठा केला जातो. मद्य नसल्याने बार ओस पडली असून त्यांचा धंदा मंदावला आहे. त्यामुळे या पुरवठादारांकडून घेण्यात येणाऱ्या मालात घट झाली आहे. वसईच्या पापडी येथील स्टेटस हॉटेलात दररोज सव्वाशे ते दीडशे किलो चिकन लागायचे. आता केवळ पंधरा ते वीस किलो चिकन मागविण्यात येते. हीच गत भाजीपाला विक्रेते, अंडी पुरवठादार यांची होत आहे.

काही हॉटेलचालकांनी कर्जावर हॉटेल सुरू केले आहे. त्यांना कर्ज फेडणे कठीण जाणार आहे. सध्या या निर्णयामध्ये बदल होण्याच्या आशेवर हॉटेल व्यावसायिक तग धरून आहेत. काही हॉटेल कर्मचाऱ्यांनी अध्र्या पगारावर कामावर ठेवण्याची विनंती केली होती. पण धंदाच नसल्याने त्यांना कामावर ठेवण्यात आले नाही. त्यामुळे काहींना रजा देऊन तर काहींना कायमस्वरूपी कामावरून कमी करण्यात आले आहे.

प्रकाश हेगडे, अध्यक्ष, वसई तालुका हॉटेल असोसिएशन